Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Friday, February 27, 2026

हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति, मातीवर चढणे एक नवा थर अंती!

 


रक्ताच्या नात्यांमध्ये ईर्ष्या, अहंकार, अभिमान-दुराभिमान, अट्टाहास, मानापमान, ह्या सगळ्या गोष्टी आडव्या आल्या आणि रक्ताचं नातं बाजूला सारून कुरूक्षेत्रावर युध्द लढलं गेलं. द्रौपदीच्या वस्त्रहरणातल्या अनितीपासून ते महाभारताच्या नैतिक युध्दापर्यंत सारं काही त्या युद्धभूमीवर भस्म झालं. मागे उरलेल्या विचारांमधून प्रखरतेने जाणवणारी गोष्ट म्हणजे 'अंतः अस्ति प्रारंभः' अश्या अनेक चांगल्या-वाईट, खऱ्या-खोट्या, नैतिक-अनैतिक गोष्टी पुन्हा-पुन्हा घडत राहणार, पुन्हा-पुन्हा भस्म होत राहणार आणि आपल्याला नव्या नीतिमत्तेची जाणीव करून देत राहणार. ह्या टोकाच्या नैतिकते-अनैतिकतेला जोडणारी एक रेष असते, आणि ह्या रेषेवर आजपर्यंतचं आपलं अस्तित्व असतं.

ज्या विज्ञानाच्या जोरावर ह्या जगाचा कारभार सुरळीत चालू आहे त्याच विज्ञानात शक्यतांना निष्कर्षांपर्यंत आणि प्रयोगांना उपायांपर्यंत पोहोचवण्यासाठी, नैतिकता बाजूला ठेवून, तटस्थ आणि अमानुष प्रयोगांच्या निखाऱ्यावर चालावं लागलं. प्राण्यांवर-माणसांवर प्रयोग करणं, हे तेव्हाही अनैतिक होतं आणि आजही अनैतिक आहे; पण ही अनैतिकता त्या प्रयोगांच्या निखाऱ्यावर भस्म झाली आणि त्या राखेच्या थरावर आजचा वैज्ञानिक दृष्टिकोन आधारलेला आहे.

एकेकाळी या समाजाने स्त्रियांच्या मुलभूत हक्कांनादेखील अमान्य केलं होतं. स्त्रीवादाच्या प्रत्येक लाटेने, त्या क्षणापर्यंतच्या पितृसत्तेला मोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण ह्या पितृसत्तेचा भस्म होऊन मातीवर निर्माण झालेल्या प्रत्येक नव्या थरावर पुन्हा एकदा अन्यायाची-असमानतारूपी चिता स्त्रिवादाला भस्म करण्यासाठी रचली जात होती.

माणूस कायमच स्वतःला एखाद्या समुदायाशी जोडू पाहतो. त्याची हीच वृत्ती, त्याच्या कर्मांचा, निर्णयांचा, आवडी-निवडींचा पाया असते. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा पसारा हा त्याच्यासाठी, समाजासाठी कितीही व्यापक असला; तरीही माणसाच्या मृत्यूनंतर सारं काही अप्रासंगिक ठरतं. त्या व्यक्तीने जन्मभर केलेली नैतिक-अनैतिक कृत्ये, हे सारं त्या चितेवर भस्म होतं. मागे जी राख उरते ती म्हणजे त्या व्यक्तीचा मागे उरलेला विचार. ह्या विचारातून पुढच्या पिढ्यांचे विचार आकार घेऊ लागतात.

अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा शेवट जरी मातीमध्ये होत असला, तरी माती निसर्गनियमानुसार कधीच निरुपयोगी ठरत नसते. त्यातून कायम नवे विचार, नवी सुरूवात, नव्या कल्पनांचे अंकुर फुटतात. कारण त्या मातीत आजपर्यंतचे विचार-अविचार, आजपर्यंतचे अंत आणि आजपर्यंतचं भयाण वास्तव, हे सारं रूजलेलं असतं.

हजारो वर्षांपूर्वी पहिल्या मानवी सभ्यतेच्या खुणा मेसोपोटेमियामध्ये कोरल्या गेल्या. ही सभ्यता अनेक जन्म-मृत्यू, न्याय-अन्याय, प्रगती-अधोगती, समृध्दी-विनाश यांची साक्षीदार ठरली. पण त्या सभ्यतेबरोबर ही सारी स्थित्यंतरेही लयाला गेली. तिच्या अवशेषांवर मातीचे आणि नव्या सभ्यतांचे कैक थर चढत गेले. अस्तित्वात आलेली प्रत्येक गोष्ट कालांतराने भस्म होतं लिखित आहे. पण प्रत्येक आयुष्य भस्म होणार आहे आणि प्रत्येक विचार इतिहासजमा होणार आहे हे माहीत असूनही जगणं आणि विचार करणं थांबत नाही. 'कारण सारं काही निरर्थक आहे' ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचत असताना, 'अर्थपूर्ण'तेची प्रत्येक शक्यता पडताळून पाहणं अनिवार्य असतं. एक काळ असा होता, जेव्हा संशोधन करणं अनैतिक आणि रूढी-परंपरा नैतिक मानल्या जायच्या. आज 'संशोधन' ही सगळ्याची कसोटी मानली जाते आणि प्रत्येक रूढी-परंपरेची नैतिकता तपासून पाहिली जाते.

'नैतिकता आणि अनैतिकता' ह्यासुध्दा मानवी संकल्पना असल्याने त्यांचे नियम व्यक्तीपरत्वे, कालपरत्वे, संस्कृतीनुसार बदलत राहतात. हा बदल जसा अटळ आहे तसंच ह्या बदलणाऱ्या नीति-अनीतिचा शेवट होणेही अटळ आहे. ज्या पद्धतीने आजपर्यंत मातीवर चढलेल्या प्रत्येक नव्या थरातले नैतिकतेचे-अनैतिकतेचे कण वेचून आपल्याला नितीमत्ता शिकवली जाते, त्याच पध्दतीने वेचलेला प्रत्येक कण समाप्तीच्या अटळतेची जाणीव करून देतो.

नीति-अनीति चितेवर भस्म होते, मातीवर नवा थर चढतो, त्या थरातून पुन्हा नवी नीति-अनीति आकार घेते... थोडक्यात काय तर हे बदल, हे विनाशातून नावीन्याचं आणि नाविन्याच्या विनाशाचं चक्र कालचक्राच्या अधीन होतं, आहे आणि असणार आहे. ह्या बदलांचा काळप्रवाह सांगताना कुसुमाग्रज म्हणतात,

"हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति,

मातीवर चढणे एक नवा थर अंती"


-अनुष्का बिराजदार

Tuesday, December 16, 2025

लक्ष्मीकांत बेर्डे: एक अवलिया कलाकार

 


विनोदाचा जादूगार—ज्याच्या कलेचे चाहते साऱ्या जगभर पसरलेले —असा यशाला गवसणी घालूनही साधेपणाची शाल अंगावर पांघरून राहणारा, सरळ, गुणी आणि अपार मेहनती कलाकार म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या. त्यांच्या कार्याबद्दल लिहिताना मनात एकच प्रश्न घोळत राहतो—सुरुवात नक्की कुठून करावी? कारण त्यांची विनोदबुद्धी असो, निरभिमान व्यक्तिमत्त्व असो, की वेळेची अचूक जाण—योग्य क्षणी साधलेला खेळ आणि त्यावर उमटलेली प्रेक्षकांची टाळी—या साऱ्या गोष्टी विलक्षण आणि अविस्मरणीय आहेत.


कधी त्यांनी लोकांना दुःख विसरून मुक्तपणे हसायला भाग पाडलं, तर कधी नकळत डोळ्यांत पाणी आणलं; आणि कधी मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या प्रश्नांना स्पर्श करत विचार करायला लावलं. ते केवळ चित्रपटांपुरते सीमित राहिले नाहीत—अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आणि मग हा अवलिया कलाकार आपलाच कधी झाला, हे कळायच्या आतच तो आपल्या आयुष्याचा भाग बनून गेला. एका सामान्य घरातला मुलगा, केवळ आपल्या कलेवर अपार श्रद्धा ठेवून स्पर्धेच्या रणांगणात उतरतो आणि पाहता पाहता त्या लढ्याचा बादशाह बनतो—हेच तर लक्ष्या मामांच्या प्रवासाचं खरं सौंदर्य आहे. खरं तर हा सारा प्रवास शब्दांत बांधून ठेवणं कठीणच—कारण ही जादू शब्दांपलीकडची आहे.

 त्यांचं कुठलंही पात्र असो, प्रेक्षकांना ते नेहमी आपलंसं वाटत राहीलं. एखादा माणूस जेव्हा त्यांच्या कुठल्याही भूमिकेत गुंततो, तेव्हा ती भूमिका विसरूच शकत नाही. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला जणू शंभर नंबरी सोन्याचा तेजस्वी स्पर्श लाभलेला असतो. पण मला विशेष भावतं ते त्यांच्या धडाकेबाज चित्रपटांमधून उलगडणारं मित्रासाठीचं नितांत सुंदर प्रेम—राहून राहून वाटतं, आयुष्यात मलाही असा मित्र हवा! पडद्यावर दिसणारी त्यांची बनवाबनवीतली भूमिका, त्यातून साकारलेलं अफलातून मनोरंजन आणि जागा मिळवण्यासाठीची अविरत धडपड—या साऱ्यात सामान्य माणसाच्या जगण्याचा खरा संघर्ष ठळकपणे उमटतो. आणि म्हणूनच ते पाहताना आजही आपण नकळत त्यात रमून जातो. धुमधडाकासारख्या चित्रपटांतून त्यांनी एका मुलाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा आधार दिला—तोही हास्याच्या हलक्याशा स्पर्शातून मनापर्यंत पोहोचवत. वेगवेगळ्या रूपांत, कधी स्वतःच्या वडिलांनाही शेरास-सव्वा शेर ठरणारी चलाखी दाखवत, तर कधी तरुण पिढीच्या बदलत्या विचारांना चपखल उदाहरणांतून अधोरेखित करत, त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. साधा, सोपा वेष… पण त्यामागे दडलेली प्रभावी व्यक्तिरेखा—लक्ष्या मामांचा हा ठसा आजही लोकांच्या मनावर तसाच कोरला आहे.

स्वतःवर तुटून पडलेल्या दुःखांचे डोंगर शांतपणे सहन करत, इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी दिवस-रात्र झटणारे लक्ष्या मामा मला माझ्या आयुष्यातील खरे नायक वाटतात. स्वतःची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी गरजूंच्या मदतीकडे कधीही पाठ फिरवली नाही—कारण त्यांच्या माणुसकीचा झरा कधी आटला नाही. सहकाऱ्यांच्या मते, लक्ष्या मामा मनापासून विचार करणारे, आपुलकीने काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या दृष्टीने लहान-मोठा असा कोणताच भेद नव्हता. दिग्दर्शक असो वा पडद्यामागे काम करणारा साधा कर्मचारी—सगळ्यांसाठी ते तितकेच मोलाचे होते.

आजही त्यांच्या आठवणींचे किस्से आमच्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा घरातील वडीलधाऱ्यांचे डोळे नकळत पाणावतात. आणि आमच्याही मनात एक हळवा विचार येतो—अनुभवता आलं असतं तर किती बरं झालं असतं! लक्ष्या मामा आज आपल्यात नसल्याची उणीव कायम मनात रेंगाळत राहते. पण म्हणतात ना—
जिन लम्हों को हम बयां नहीं कर पाते,
वही अक्सर हमें जीने का पैग़ाम दे जाते।
जो इंसान हमें कभी मिल नहीं पाए,
वही यादों में हमेशा के लिए समा जाते।

-शांभवी कुलकर्णी






Thursday, October 30, 2025

भारतीय सिनेमा के जन्मदाता - व्ही. शांताराम

 


बात है १९०१ की जब भारतीय सिनेमा ने अपने विकास और वृद्धि के लिए एक सुशील और सर्वगुणसंपन्न सुकुमार के लिए पुकार लगाई। तब सिनेमा की मंशा पूर्ण करने हेतु इस भारतवर्ष में जन्में वह यशोमान - जिनका नाम था शांताराम राजाराम वांकुंद्रे। मात्र १८ वर्ष की आयु में ही उन्होंने स्वयं को सिनेमा के विकासकार्य में समर्पित किया और उनकी मेहनत, श्रद्धा, विचारधारा से सिनेजगत का कायापलट हुआ। इसीलिए, उनको *'चित्रपति'* इस शीर्षक की उपाधि दी गयी। तथापि, अपने सह कलाकारों के लिए वह अण्णासाहब थे, दर्शकों के लिए प्यारे शांताराम बापू थे और सिनेविश्व और अपनी सिनेमा के लिए वह थे 'व्ही.शांताराम!'

व्ही.शांताराम जी ने हिंदी तथा मराठी सिनेजगत को अपने सपनों द्वारा जन्म दिया, विचारधाराओं द्वारा पालन-पोषण किया और परिश्रम द्वारा सफलता की ऊँचाई तक पहुँचाया। १९२७ तक उन्होने मूकफिल्मों द्वारा सिनेजगत के लिए अपना योगदान दर्शाया। किन्तु, जैसे एक माँ अपने बच्चे के जन्म के बाद उसे बोलना सिखाती है, उसी भांति व्ही.शांताराम जी ने मूकफिल्मों द्वारा भावना और संवाद, यानी शब्दों का गठबंधन किया और भारत की पहली मराठी सवाक चलचित्र : '''अयोध्येचा राजा' की १९३२ में निर्मिती प्रक्रिया पूर्ण कर उसकी प्रसिद्धि की। इसी फिल्म से मराठी सिनेजगत की सफलता का दौर शुरू हुआ। यह फिल्म प्रभात फिल्म कंपनी द्वारा निर्मित की गई थी। व्ही.शांताराम जी के साथ ही विष्णुपंत दामले, केशवराव धायबर, एस. फतेहलाल और इस. व्ही. कुलकर्णी यह भी इस सफलता के हिस्सेदार है।

इस फिल्म द्वारा उन्होंने स्वयं को योग्य निर्देशक सिद्ध किया; अपितु, वह हर कला के ज्ञाता थे। ऐसा कहा जाता है कि 'हरफन मौला, हरफन अधूरा', अर्थात हर काम काज आता है, किन्तु किसी एक में भी माहिर नहीं; लेकिन, इस कहावत को व्ही. शांताराम जी ने असत्य सिद्ध किया। वे सिनेक्षेत्र की हर एक कला के ज्ञाता भी थे, और उसमें निपुण भी थे। वे अभिनय, संगीत, पृष्ठभूमि, फिल्म प्रौद्योगिकी, लेखन, निर्मिती, आदि क्षेत्र में भी कुशल थे। उन्होंने कला के हर क्षेत्र में प्रवेश कर ज्ञान को अर्जित किया तथा इस कहावत को उन्होंने अपने कार्यसिद्धि से पुनः परिभाषित किया: 'हरफन मौला, हरफन सर्वगुणसंपन्न’।

'व्ही.शांताराम' इस महानुभाव ने हर तरह से सिनेमा को समृद्ध किया। इस कार्य को निरंतर रखने के लिए उन्होंने स्वयं की राजकमल कलामंदिर, इस निर्मित संस्था की स्थापना की। १९६२ में इनके सुपुत्र किरण शांताराम जी ने व्ही.शांताराम प्रोडक्शन्स प्राइवेट लिमिटेड की अलग से स्थापना की और फिल्में बनाने का कार्य निरंतर रखा। इस बैनर की पहचान थी कि, आरंभ में एक सुकुमारी सूर्योदय के समय विशाल सागर की गोद में खिलते हुए कमल के पुष्प से प्रगट होती है तथा अपने हाथों से समुद्र और एक पक्षी पर धन की वर्षा करती है। तब मुझे शांताराम बापूजी की याद आती है। इस कन्या की ही भांति, शांताराम बापू जी सूर्योदय के समय (जो भारतीय सिनेजगत के उदय और उन्नति को दर्शाता है) विशाल सागर (जो कलाविश्व की अखंडता दर्शाता है) की गोद में बसे हुए कमल पुष्प से (जो सिनेमा दर्शाता है) उस कन्या की भांति स्वयं शांताराम जी का जन्म होता है, और वह अपनी हाथों (भाग्य की रेखा) में बसी कला से धन अर्थात ज्ञान, समृद्धि, विचार, नवचेतना, आदि उस पक्षी की भांति ही श्रोतागण और दर्शकों पर वर्षा करते हैं।

-आर्यन पाध्ये

Tuesday, September 30, 2025

शब्द म्हणजे काय असतं?

 


शब्द – हा संवादाचा पाया, विचारांचा दरवाजा आणि भावनांचा सेतू आहे. माणसाच्या जगण्यात जे काही घडलं, ते शब्दांतूनच व्यक्त झालं. ज्ञान, संस्कार, इतिहास, साहित्य – या सगळ्याची किल्ली शब्दांतच दडलेली आहे. शब्दांतूनच आपण शिकतो, समजतो आणि जगतो. संतांची वाणी, कवींची कविता, लेखकांचे विचार – हे सारे आपल्या मनापर्यंत पोहोचले ते केवळ शब्दांच्या सामर्थ्यामुळे. शब्द हे मनाचे आरसे आहेत; तेवढेच ते मनाला उभारी देणारे किंवा जखमा करणारेही असतात. म्हणूनच शब्दांचा वापर नेहमी जपून, संयमाने आणि प्रेमाने करावा लागतो.

शब्द म्हणजे काय असतं?

बालपणीचे ते बोबडेपण,
मनामध्ये नात्यांची वीण –
तोच शब्द असतो ना?

शब्द देई ऊब जिवाला,
तोच कधी दूर लोटे मनाला –
तोच शब्द असतो ना?

शब्दामुळे उमलतं प्रेम,
शब्दामुळे साधला जातो नेम –
तोच शब्द असतो ना?

संवादाने वाट खुली होते,
विसंवादाने पोकळी निर्माण होते –
तोच शब्द असतो ना?

गोड शब्द माणसाला घडवतो,
कटू शब्द माणसाला मोडतो –
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे ऊब – झाकून घ्यावी किती?
शब्द म्हणजे राग – सहन करावा किती?
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे गालावरून सरकलेले मोरपिस,
शब्द म्हणजे अचानक बसलेली चापट –
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे हरणीच्या बेंबीतील कस्तुरी,
सुगंध त्याचा कधीच न संपणारा,
सदैव दरवळत राहणारा… दरवळत राहणारा…

-जुईली पवार

Tuesday, April 15, 2025

जगणं, जपणं आणि जिणं-कला

मानवाला खरं तर जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी आणि प्राणवायू एवढ्याच गोष्टी पुरेशा होत्या; पण तरीही प्राचीन गुहाचित्रांचे अवशेष आणि शिल्पकलेचे नमुने आजही सापडतात. म्हणजेच प्राचीन काळात ‘कला’ ही विरंगुळा होती. मानवाच्या उत्क्रांतीसोबत कलेचं महत्त्व वाढत गेलं. मनातील गुंतागुंतीच्या आणि उत्कट भावनांना दिलेलं मूर्त स्वरूप म्हणजे ‘कला’. ही कला त्याच्या जगण्याला अर्थ देऊ लागली, आणि पुढे ती त्याच्या अर्थार्जनाचं साधनदेखील बनली. पण इतक्या बदलांनंतरही कलेचा आत्मा तसाच राहिला — त्याच उत्कट भावना, तेच कौशल्य, निर्मितीतून मिळणारा आनंद आणि समाधानही तेच. आणि हा आनंद केवळ कलाकारापुरताच मर्यादित राहत नाही; तर त्या कलेची अनुभूती घेणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचतो. चित्रकलेपासून ते शिल्पकलेपर्यंत आणि संगीतापासून ते नृत्यकलेपर्यंत — प्रत्येक कलेचं एक शास्त्र आहे; पण त्या शास्त्राची चौकट होत नाही. प्रत्येक कलेचे काही नियम आहेत; पण त्या नियमांची बंधनं होत नाहीत. कारण, कला स्वच्छंद असते!

कला माणसाला व्यक्त व्हायला मदत करते, माणसातलं माणूसपण जपते, पर्यायाने माणसालाच जपते. कला ही कलाकारांची ओळख बनते आणि कलाकृतींमध्ये कलाकाराच्या भावनांची, माणूसपणाची, अस्तित्वाची, झलक दिसत राहते.  मनापासून कलेची साधना करणाऱ्या कलाकाराला जसं समाधान मिळतं, तसंच कलेचा मनापासून आदर करणाऱ्या कलासक्तालाही मिळतं. प्रेक्षक किंवा श्रोते होणं तसं सोपं; पण खऱ्या अर्थाने कलासक्त होणं कठीण. कोणत्याही कलेबद्दल आत्मीयता बाळगणं, त्यामागच्या कष्टांची जाण असणं, कलाकाराचा आणि त्याच्या कलाकृतीचा मनापासून आदर करणं' म्हणजे कलासक्त होणं.

अलीकडचीच एक घटना — सोशल मीडियावर Studio Ghibli स्टाईल AI-Generated Imagesना अचानक पेव फुटलं. Ghibli या जपानी ॲनिमेशन स्टुडिओचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे – प्रत्येक फ्रेम ही कलाकारांनी तासनतास घेतलेल्या मेहनतीतून साकारलेली असते आणि त्यातील बारकाव्यांमुळे प्रत्येक पात्राचं भावविश्व जिवंत झाल्याचं भासतं.

पण जिथे AIकडे भावना नाहीत, तिथे ह्या कृत्रिमतेला ‘कला’ म्हणावं का? ती केवळ नक्कल ठरते — आणि कलाकारांच्या कष्टांचा अपमानदेखील. अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला; पण खरे कलासक्त रसिक मात्र याला विरोध करत उभे राहिले. यामुळे सिद्ध झालं की कलेतील कृत्रिमता ही कलाकारालाही खटकते आणि कलासक्तालाही. कलाकार कलेला जिवंत ठेवतो, कला कलाकाराला जगवते, आणि कला माणसांच्या जगण्याला अर्थ देते.

ही जगण्या-जगवण्याची कला म्हणजे – मन रिझवणारा आणि कलासक्त रसिकांना थिजवणारा कौशल्यपूर्ण आविष्कार! म्हणूनच कलेमुळे जगणाऱ्या, कलेसाठी जगणाऱ्या आणि कलेला जीवन मानणाऱ्या, अशा सर्वांना — जागतिक कला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 


-अनुष्का बिराजदार.


Monday, March 31, 2025

डॉ. आनंदीबाई जोशी: भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरांचा प्रेरणादायी प्रवास

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी या केवळ भारतातील पहिल्या महिला डॉक्टर नव्हत्या, तर त्या शिक्षण, धैर्य आणि समाजसुधारणेच्या दिशेने घडलेल्या महत्त्वाच्या प्रवासाचे प्रतीक होत्या. 31 मार्च 1865 रोजी पुण्यात जन्मलेल्या आनंदीबाईंच्या जीवनप्रवासाने अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. त्या यमुना या नावाने जन्मल्या, मात्र विवाहानंतर त्यांचे नाव आनंदीबाई झाले. केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय स्त्री समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी मार्ग निर्माण केला.

त्यांच्या जीवनाची सुरुवात एका पारंपरिक कुटुंबात झाली, जिथे स्त्रियांनी शिक्षण घेणे दुर्मिळ होते. नऊव्या वर्षीच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला, जे स्वतः एक प्रगतिशील विचारांचे होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. चौदाव्या वर्षी मातृत्वसुख लाभले, मात्र मुलाच्या आजारपणात योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा धक्का त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी ठरवले की अशा परिस्थितीत अन्य कोणत्याही आईला जावे लागू नये, आणि त्यामुळेच त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला. त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणेच कठीण होते, आणि डॉक्टर होणे तर कल्पनेपलीकडचे होते. मात्र, गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिकण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्याकाळच्या मानसिकतेनुसार एका हिंदू स्त्रीने परदेशात जाऊन शिकणे हे समाजाला अजिबात मान्य नव्हते. लोकांनी टीका केली, विरोध केला, पण आनंदीबाईंनी निश्चय सोडला नाही. समाजाच्या विरोधाला न जुमानता त्या बोटीने एकट्याच अमेरिकेला रवाना झाल्या आणि सात समुद्र पार करत आपले शिक्षण पूर्ण केले. त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या आणि त्यांनी देशातील महिलांसाठी शिक्षण व आरोग्याच्या नव्या संधी निर्माण केल्या.

शिक्षणाच्या प्रवासात त्यांना अनेक अडथळे आले. अमेरिकेतील हवामानामुळे त्यांचे आरोग्य खालावत गेले. त्यांना क्षय झाला, पण तरीही त्या थांबल्या नाहीत. शिक्षण पूर्ण करून त्या भारतात परतल्या आणि आपल्या देशातील स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न पाहू लागल्या. दुर्दैवाने, त्यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि अवघ्या 22व्या वर्षीच त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांनी उभारलेला मार्ग पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरला. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की, स्वप्नं पाहणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांनी सामाजिक बंधनांना झुगारले, शिक्षणासाठी कठीण परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवले आणि अपयश आलं तरी मागे हटल्या नाहीत. त्यांची कथा हे दर्शवते की शिक्षण हीच खरी शक्ती आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी झगडावे लागते.

आज, त्यांच्या जयंती निमित्त आपण त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या धैर्याचा, मेहनतीचा आणि चिकाटीचा आदर्श घ्यायला हवा. त्यांनी निर्माण केलेला मार्ग आपण पुढे चालत राहिलो, तर भारतात आणखी असंख्य आनंदीबाई घडतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!


-मृण्मयी पाटस्कर


Wednesday, March 19, 2025

रंगभान

मला मोहित करतात रंग, त्यांच्या छटा, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, सारंकाही. जगातले आणि आयुष्यातले रंग सारखेच असं वाटलं तेव्हा कळलं की एकेका आयुष्यानेच जग रंगीत होत राहातं, कधी प्रेमाने लाल, दुःखाने काळं किंवा स्थैऱ्याने पांढरंही. कोणताच रंग नसलेला 'ना'रंगी रंग जसा पाण्याला असतो तसा तुम्हां-आम्हालाही तो निसर्गदत्त असतो. जिथे जन्मावं, ज्या स्थितीत राहावं, वाढावं तिथला रंग पांघरत राहतो आपण. तो रंग नक्की ल्यावा मात्र ल्यावा तो विवेकाच्या गाळण्यातून गाळून. असा विचार केला तर किती सहज वितळून जातो पदराखाली जपलेला खोटा अभिमान, माणसातली आणि खरंतर मनातली दरी लीलया भरून काढतात हे रंग... मात्र पूर्वसुरींच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की कळते की ह्या रंगांचं प्रयोजन फार व्यापक आहे, बघावा तसा पर्वत दिसावा तसेच हे रंगदेखील आहेत. सृष्टीच्या व्यापकतेचं वैभव हे रंगच तर दाखवतात. समुद्र आणि वाळवंटाचा रंग एक नाही म्हणूनच दोघांना त्यांचं-त्यांचं महत्त्व आहे, माहात्म्य आहे. ह्या रंगांकडे जेव्हा भौतिकदृष्ट्या बघतो तेव्हा खरंच अवाक् होऊन जातो. शरीरातल्या विशिष्ट पेशी दृष्याच्या रंगभानासाठी कारणीभूत ठरतात असं शास्त्र सांगतं. माणसा-माणसात त्यातले पुसटसे भेद आणि त्याचे आजारही सांगतं, ते खरं देखील आहे पण यावरून काही अंशांनी तरी माणसांची दृष्टी वेगळी असते हेच स्पष्ट होतं. हे कळल्यावर दृष्टी वेगळी असल्याने माणसांचा दृष्टिकोन वेगळा असणारच हे मनाला इतकं पटतं की मतभेदाची कित्येक कारणं समूळ मावळून जातात.

कोट्यावधी लोकांचं जीवन युगांपासून व्यापून राहिलेले धर्म म्हणे एका रंगाने दर्शविता येतात, हे रंगांचं केवढी माहात्म्य म्हणावं ! इथे आठवतो तो शाळेतला प्रयोग, प्रिझम मधून गेलेले सगळे रंग शेवटी पांढर्या रंगामधे परिणत होतात, तेचा वाटतं की शेवटी शुद्ध श्रद्धेच्या चौकटीतून गेलेले सगळेच रंग एकाच चैतन्यात मिसळणार आहेत. तेव्हा माझ्या रंगाचा मला अभिमान असला तरी दुसऱ्याच्या द्वेषाचं कारणच उरत नाही. म्हणून महत्व द्यायचं ते प्रत्येकाच्या स्वतंत्र असण्याला, दिसणं हे काळाच्या ओघात बदलत राहणारच असतं. शेवटी सगळे सारखाच श्वास घेतात, कुणाचा श्वास भगवा नसतो किंवा हिरवाही... जसा शब्दांसाठी अर्थ तसा रंगांसाठी भाव असतो. जे शब्दांतून सांगता येत नाही, अभिनयातून दाखवता येत नाही ते रंग दर्शवतात. कलाकाराच्या भावावस्थेपर्यंत नेणारी शिडी म्हणजे रंग. भान हरपून टाकणारे तसं भानावर आणणारेही रंगच. प्रत्येकाला आपलं आयुष्य बसवता येतं एखाद्या रंगामध्ये किंवा दोन-चार रंग मिसळून साकारलेल्या एखाद्या रंगामध्ये, मात्र त्याला धाडस हवं हे नक्की. नाही म्हटलं तरी आजच्या काळात प्रत्येकाच्या विचारांना एखादा रंग लागलेलाच असतो. अशा रंगांच्या छटा फार बोलक्या असतात. माणसाला अगदी सुरुवातीला चित्र काढता येत होतं पण तो तिथे थांबला नाही, पाना-फुलांच्या रसाने तो त्यामधे रंग भरू लागला, स्वतःचे क्षितिज स्वतः विस्तारू लागला. आजची परिस्थिती तशी फार वेगळी, पण हृदयाची तहान अगदी तिच. आयुष्यात रंग भरण्याची, आयुष्य रंगीत करण्याची. प्रत्येकाच्या मनातल्या रंगांना कर्माची जोड मिळतेच असं नाही, पण रंगांची ओढ मात्र कायम राहते, जशी मनात तशी इतिहासाच्या पानांवरही. कधी हातात नसलेले अनपेक्षित रंग उधळले जातात आणि नव्हत्याचं होतंदेखील होतं.

रस्त्याच्या कडेला फुलं विकून पोट भरण्याची ईच्छा उरात बाळगणाऱ्या मुलाच्या निरागस डोळ्यांत मला हेच रंग दिसतात किंवा त्याच्यासमोरून गाडीच्या खिडकीतून हात दाखवत जाणाऱ्या एखाद्या सोनूच्या डोळ्यातही अगदी तेचं रंग असतात. ए.सी.मधे बसलेल्या आणि रस्त्यावर झोपलेल्या माणसांच्या स्वप्नातही हेच रंग जाणवतात, खरंच माणसाचं अंतरंग इतकं रंगीत असतं का ? 


 -अनीश जोशी

Saturday, March 8, 2025

जागतिक महिला दिन!


हा केवळ उत्सव नाही, तर इतिहासाच्या पानांवर ठसठशीत उमटलेली एक खूण आहे—स्त्रियांनी मिळवलेल्या यशाची, स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची आणि अजूनही चालू असलेल्या संघर्षाची! या उत्सवाची सुरुवात रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे. ८ मार्च ही तारीख निवडण्यामागे खास कारण आहे. १९०८ मध्ये १५०० महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरून मोर्चा काढला होता. रशियातील महिलांनी ‘महिला दिवस’ साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता. तर युरोपमध्येही महिलांनी ८ मार्च रोजी शांतीच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.

महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला, परंतु १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात, मुंबई येथे पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा झाला. २०२५ सालच्या जागतिक महिला दिनाची संकल्पना आहे – ‘सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी : हक्क, समानता, सक्षमीकरण.’

परंतु ही केवळ घोषणा नसून स्त्रीत्वाने संपूर्ण जगाला घातलेली साद आहे—एक परिवर्तनाची मागणी. स्त्री शक्तीच्या सन्मानासोबत त्या शक्तीच्या न्यायाची हाक. इतिहासाच्या कपाटात अनेक कथा दडल्या आहेत. काही स्त्रियांनी क्रांती घडवली, काहींनी विद्रोह केला, तर काहींनी सहनशीलतेच्या कडेलोटावरही आत्मसन्मान जपला. ऋग्वेदातील गार्गी, मैत्रेयी, राणी लक्ष्मीबाई, रोजा पार्क्स, मदर तेरेसा, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, मारिया क्युरी—अशा अनेक स्त्रिया जागतिक, राष्ट्रीय, शहरी, ग्रामीण स्तरावर आदर्श ठरल्या.

पण ८ मार्च हा दिवस फक्त या महान स्त्रियांना स्मरण्याचा आहे का? की नवीन उदाहरण घडवण्याची प्रेरणा घेण्याचा?

मला वाटते—दोन्हीही नाही.

या ओळखींच्या पलीकडे असलेल्या प्रत्येक स्त्रीला तिचे स्त्रीत्व मुक्तपणे जगता यावे, हाच या दिवसाचा खरा अर्थ. नेहमीप्रमाणे यावर्षीही ८ मार्च हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाईल, पण या आनंदाच्या पलिकडेही एक कटू वास्तव आहे. आजही अनेक स्त्रिया अन्याय सहन करत आहेत, आत्मसन्मानाच्या आणि स्वातंत्र्याच्या एका खोल दीर्घ श्वासाची याचना करत आहेत. हे चित्र बदलायला किती काळ लागेल, हे काळच ठरवेल.

परंतु मला ठाऊक आहे की, काही पुरुषी क्रौर्याच्या पलीकडेही एक पुरुषी करुणेचा उजेड आहे. त्या पुरुषी ममत्त्वासाठी माझा हा लेख. स्त्रीत्वाच्या जाणिवेच्या शब्दांत अरुणा ढेरे म्हणतात—

"की हिला मातीचं बळ मिळो,

लहरी वादळाचं पिसाटपण

समजून रानावनात तगण्यासाठी...

की हिला पाखरांच्या संवादाचं सुख कळो...

वाढण्याच्या कळा सोसत पानांत येण्यासाठी...

ही होईल जर स्वतःच्या ओळखीइतकी खोल,

तर टिकवील आपोआपच स्वप्नांच्या शिरेशिरेतली ओल....”

एकीकडे मातीचं बळ आणि वादळाचं पिसाटपण अंगी रुजवणाऱ्या स्त्रीला, पाखरांच्या संवादाचं सुख कळण्याइतकी शांतीही मिळो. तिच्या स्वप्नाइतकीच तिला तिची खरी ओळखही कळो.

उत्सव होवो तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या कसोटीचाही—

ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचाही,

आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही.


-प्रतीक्षा ओंबळे

Sunday, February 9, 2025

करुणापुरुष बाबा आमटे


हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती!

गुरू ठाकूर यांच्या या उक्तीप्रमाणे, ज्यांनी आपले तन, मन, धन आणि संपूर्ण जीवन निराधारांसाठी, उपेक्षितांसाठी अर्पण केले, ते थोर मानवतावादी व परिवर्तनवादी समाजसेवक, ऋषितुल्य बाबा आमटे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख. खांडववनाचे रूपांतर नंदनवनात करणारे उतुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे! त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका समृद्ध घरात झाला. दारात सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही, त्यांना अगदी लहानपणापासून गरीब आणि उपेक्षितांच्या परिस्थितीची जाणीव होती.

१९३४ मध्ये त्यांनी बी.ए. पदवी मिळवल्यानंतर, १९३६ मध्ये ते एल.एल.बी. झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकार्यास सुरुवात केली. एका पावसाळी रात्री घरी परतत असताना, त्यांना कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेला एक रुग्ण दिसतो आणि हा ध्येयवेडा तरुण कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार करतो. आपल्या पत्नीला आपल्या ध्येयाविषयी कल्पना देतो आणि कुष्ठरोगासंदर्भात विविध पुस्तके वाचतो, सखोल अभ्यास करतो, कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयात विनोबा भावे यांच्या साहाय्याने प्रवेश मिळवतो आणि त्यांच्यावर उपचार करतो. काही दिवसांनी त्यांना असे लक्षात येते की, आपण कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी स्वतः वैद्यकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथील अभ्यास वर्गात पंडित नेहरूंच्या शिफारशीवर प्रवेश घेतात आणि कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार करण्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करतात.

कुष्ठरोगासंबंधित लसीची स्वतःच्या शरीरावर चाचणी करून घेतात. केवळ असामान्य माणूसच असे धाडस करू शकतो. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असून समाजात अजूनही कुष्ठरोगाबाबत गैरसमज आहेत, परंतू बाबा आमटे यांची ही जिद्द आणि सेवा आजही मार्गदर्शक ठरते. पुढे जाऊन त्यांनी १९५० मध्ये वरोडा आणि भोवतालच्या ६० गावांमध्ये ४,००० रुग्णांवर उपचार केले. केवळ उपचार करणे हे पुरेसे नाही, ही जाणीव त्यांना झाली आणि त्यातूनच आनंदवन उभारण्याची प्रेरणा मिळाली. राज्य सरकारकडून वरोडा जवळील भागात ५० एकर पडीक जमीन त्यांना मिळाली. अतिशय अडचणीची, किचकट जागा. पाण्याचा अभाव. अशातच दोन मुले, पत्नी साधनाताई, एक लंगडी गाय, एक कुत्रा, १४ रुपये रोख आणि ५० एकर नापिक जमीन असा त्यांचा संसार सुरू झाला.

ते दिवस अतिशय भयानक होते. जंगलातील पशूंचा त्रास, अन्नधान्याचा तुटवडा या सर्व संकटांवर मात करत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन एक विहीर खोदली आणि १९५१ मध्ये विनोबा भावे यांच्या शुभहस्ते आनंदवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध आव्हाने पेलत बाबांनी कालांतराने कुष्ठरोग्यांच्या मदतीने सहा विहिरी खोदल्या, जमीन साफ केली, पिकांची लागवड केली आणि आनंदवनाचे रूपच पालटले. आनंदवन हे नुसते उपचार केंद्रच नव्हते, तर ते आत्मनिर्भर व मानवतावादी माणूस घडवण्याचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. माझ्या मते ते केवळ एक संस्थान नसून बाबांनी तयार केलेले आत्मनिर्भरतेचे एक मॉडेल आहे, जे भारतातील अन्य ठिकाणीही वापरले जाऊ शकते! आनंदवनासोबतच, कुष्ठरोग निर्मूलन अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण, आदिवासी हक्क इत्यादी असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामात पत्नी साधनाताई यांची अनमोल साथ त्यांना मिळाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच, त्यांच्या पुनर्वसन आणि स्वयंपूर्णतेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

सामाजिक कार्यासोबतच, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित कसदार, प्रेरणादायी व वास्तववादी साहित्यनिर्मिती केली. 'ज्वाला आणि फुले' हा त्यांचा काव्यसंग्रह याचे उत्तम उदाहरण. बाबा आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला नि:स्वार्थ समाजकार्याचा वारसा दिला. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीव संरक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये मोलाचे योगदान दिले. तर डॉ. विकास व भारती आमटे यांनी आनंदवनाचा विस्तार करण्यात भरीव कामगिरी केली. बाबांना रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसं पाहिलं, तर क्षणभरच असतं माणसाचं आयुष्य. त्यातही बहुतेक जण स्वतःपुरतेच जगत असतात; पण बाबा आमटे यांसारखी काही थोर माणसं एका आयुष्यातच हजारो जिवांना एक नवीन जीवन देऊन जातात. खरंच, आधार नसलेल्यांचे आभाळ बनण्यासाठी मन आकाशाएवढे विशाल असावे लागते. ९ फेब्रुवारी २००८ रोजी या महात्म्याने जगाचा निरोप घेतला. माझ्या मते, बाबा आमटे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दररोज हजारो लोकांना लाखोवेळा प्रेरणा देतो. आयुष्यात सर्वोत्तम आनंद म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी कृत्यं करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे बाबांचं जीवन खूप प्रभावीपणे शिकवून जातं! 


"कोंडलेल्या वादळांच्या

ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या

येथूनी निघतील वाटा...!"


विनम्र अभिवादन.


-आर्य सोनवणे

Friday, January 3, 2025

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान देणाऱ्या असीमा चॅटर्जी असोत किंवा लढाऊ विमान एकट्याने चालवणाऱ्या अवनी चतुर्वेदी असोत, आता असे एकही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी आपल्या कामगिरीची छाप पाडलेली नाही. महिलांना यशस्वी होण्यासाठी आणि पंख पसरून उडण्यासाठी आभाळ खुले करून देणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतातील स्त्रियांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत पेटवली.

माणूस हा जगातील एकमेव विचार करणारा प्राणी आहे. परंतु माणसाच्या बुद्धीला ज्ञानाची सांगड नसेल तर तो माणूस म्हणून ओळखला जाऊ शकतो का? असा प्रश्न सावित्रीबाई फुले आपल्या "त्यास मानव म्हणावे का?" या कवितेतून विचारतात. त्या म्हणतात:

ज्ञान नाही, विद्या नाही  

ते घेण्याची गोडी नाही  

बुद्धी असूनही चालत नाही  

त्यास मानव म्हणावे का?

या ओळींतून स्पष्ट होते की माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी जर काही उपयोगी असेल, तर तो विद्या-धर्म आहे. विद्या देणारा आणि विद्या घेणारा यांच्या एकत्रिकरणातूनच एक चांगला माणूस घडतो. विद्या देणारा हा धैर्यशील असतो, तर विद्या घेणारा शक्तिशाली व शहाणा बनतो. हा विचार समाजाला पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म शिक्षणाच्या अभावाच्या काळात ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. शिक्षणाच्या प्रकाशाचा अभाव असलेल्या त्या काळात सावित्रीबाईंनी भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण बऱ्याचदा म्हणतो, "आम्ही सावित्रीच्या लेकी, सावित्रीची मुलं," परंतु खरोखरच आपण सावित्रीबाईंच्या विचारांवर चालतो का? आजच्या युवा पिढीतील प्रयत्नांची आणि संयमाची कमतरता पाहता असे वाटते की संघर्षाच्या भीतीने जर सावित्रीबाईंनी त्यांचे ध्येय अर्धवट सोडले असते, तर आज आपल्या घरात शिक्षणाची गंगा वाहिलीच नसती. त्या काळात मुलींचा जन्म नकोसा वाटत असताना सावित्रीबाईंनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्त्रियांना सक्षम आणि स्वावलंबी बनवले. पण आजही काही लोक शिक्षणाप्रती असलेल्या बेजबाबदारपणामुळे आणि समाजातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाटते की सावित्रीबाईंच्या कष्टांची आणि त्यागाची आपल्याला खरोखर जाणीव आहे का?

तरीही, सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कमलादेवी चट्टोपाध्याय, मेधा पाटकर, चित्रा नाईक, शाहीन मिस्त्री यांसारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्तींनी समाजातील दुष्ट रूढी-परंपरांना नाकारले आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील अनेकांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदावर पोहोचल्या आणि गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक झाल्या, तसेच मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही कार्यरत राहिल्या. सावित्रीबाईंच्या विचारांनीच आज मी माझे विचार लेखणीद्वारे मुक्तपणे मांडू शकते. त्यामुळे असं वाटतं:

सावित्रीचा घेऊनी वसा, गाठतो आम्ही उंच शिखरे  

दुष्ट परंपरेचा पिंजरा तोडूनी, मुक्त झाली पाखरे


ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला वंदन आणि शतकोटी प्रणाम!


- श्रुती शिंदे

Thursday, October 31, 2024

राष्ट्रीय एकता दिवस


एक काठी असेल तर ती सहज मोडता येते; परंतु काठ्यांचा गठ्ठा तितक्‍या सहजतेने मोडता येत नाही. लहानपणापासूनच अशा छोट्या गोष्टींतून आपल्यात एकीचे बळ खोलवर रुजवले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी याच एकीच्या बळाचा वापर करून भारतातील विविध संस्थानांना एकत्र केले आणि जणू एका शिल्पकाराप्रमाणे भारताला नव्या रूपात घडवले. सरदार वल्लभभाई पटेल (भारताचे लोहपुरुष) यांनी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने त्यांनी विभाजन संपवून भारताला एकसंध राष्ट्र बनवण्यास मदत केली. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा त्याच्या विविधतेतून निर्माण झाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने या विविधतेचे परिवर्तन विषमतेत नव्हे, तर एकतेत करण्याचा ध्यास वल्लभभाईंनी उरी बाळगला, आणि समर्थपणे या विविधतेतून राष्ट्रात एकता निर्माण केली. आपल्यामधील भाषिक, पारंपरिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक विविधतेत बंधुत्वाची भावना टिकवण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो.


आपल्या भारतीय संविधानाची उद्देशिका देखील याच मूल्यांची पायाभरणी करते आणि लोकांमध्ये निर्धार, समानता, आणि विश्वास या तत्त्वांचा पाया घालते. भारताचे नागरिक म्हणून या मूल्यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या मनात स्वतःच्या संस्कृतीचा गर्व असलाच पाहिजे; परंतु त्याचबरोबर दुसऱ्याच्या संस्कृतीचा आदर आणि सन्मान बाळगण्याची भावना हवी. मात्र, राष्ट्रीय एकता दिवस साजरा करत असताना आपल्याला प्रश्न विचारण्याची गरज आहे – आजच्या काळात एकता या संकल्पनेचा अर्थ काहीसा बदलला आहे का? एकता साजरी करत असताना, ती खऱ्या अर्थाने अंमलात येत आहे का, की केवळ प्रतीके उरली आहेत? विविधतेतून एकता साधण्याचा उद्देश जोपासण्यासाठी आज आपल्या समाजात समजूतदारपणा, सहिष्णुता, आणि सर्वांचा समान आदर वाढवण्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे हेच खरे तर राष्ट्रीय एकात्मतेची खरी परीक्षा आहे.


-आर्यन पाध्ये

Sunday, October 20, 2024

बोलतो मराठी, जपतो मराठी

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके.. 

   संत ज्ञानेश्वरांचे हे वचन आपण वर्षानुवर्षे वाचत ऐकत आलोय आणि इतक्या वर्षांपूर्वी आपल्या संतांचा या भाषेवरचा विश्वास आज जगाला मान्य करावा लागत आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वाचकहो बातमी आली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि सगळ्या मराठी भाषिक लोकांनी तो आनंद जगाला दाखवूनही दिला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि प्रधानमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हा 2013 पासून चालत आलेला संघर्ष शेवटी ३ ऑक्टोबर २०२४ ला विजयावर आपले नाव कोरून थांबला आहे. आता प्रवास सुरू झालाय विजयानंतरचा.. 

   मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे मराठी भाषिकांवर खूप मोठी जबाबदारी आली आहे. हा दर्जा टिकवण्याची..! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मागच्या २००० वर्षांचा मराठी भाषेचा इतिहास पाहिला आणि अभ्यासला गेला आणि तो दर्जा राखण्यासाठी आपल्याला इथून पुढे काम करावे लागणार आहे.

   एखादी भाषा अभिजात भाषा ठरण्यासाठी जी काही नियमने आहेत त्यामध्ये प्रमुख अट अशी आहे की त्या भाषेला कुठूनही उसना न घेतलेला असा साहित्यिक वारसा हवा आणि असा खूप प्रबळ वारसा मराठी भाषेच्या नशिबी आहे. मराठी भाषा अभिजात भाषा आहे या बद्दल कुणाच्याच मनात शंका नव्हती. हा संघर्ष होता आपल्या विश्वासाला ठोस पाठिंबा मिळण्यासाठीचा. आता आपल्याला काय करायचंय..? तर मराठी भाषेचं मराठीपण टिकवायचं आहे..! मराठी मध्ये इतर भाषांमधले शब्द यावेत पण त्यांनी मराठी भाषेला गिळू नये. मराठी मध्ये भाषाशुद्धीचे प्रयत्न या आधीच झालेले आहेत. आपण त्यावरून आदर्श घेऊन ती भाषाशुद्धी अंगीकृत करायला हवी.आपल्या रोजच्या बोलण्यात जरि आपण मराठी प्रतिशब्दांचा वापर करीत बोललो तरी मराठी भाषेचा गोडवा टिकवण्यासाठी ते पुरेसं असेल. जितका अभिमान आपल्याला आज वाटतो आहे तितकीच जास्त जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे याची जाणीव आपल्याला हवी. लक्षात ठेवायची गोष्ट एकच की संघर्षाने विजय मिळतातंच.. मिळालेलं वैभव टिकवणं हा खरा पराक्रम!


-Darsh Samant

Sunday, September 22, 2024

जागतिक नदी दिवस: एक पाऊल नदी संवर्धनाच्या दिशेने

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा 'जागतिक नदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. महत्वाचे म्हणजे आपल्या देशात अनेक नद्यांचे वाढदिवस देखील साजरे केले जातात.  जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव देणारे मार्क अँजेलो यांनी ब्रिटिश कोलंबिया मधल्या अनेक नद्या स्वच्छ केल्या. ते नेहमी म्हणायचे की "कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही" त्यांचं हे वाक्य आजही महत्वाचे वाटते.

नदी ही देशाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावत असते. माणसाच्या अनेक महत्वाच्या दैनंदिन गरजा ह्या बहुधा नदीवर देखील अवलंबून असतात. प्रत्येक सजीव प्राण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे पाण्याला  जीवन म्हटलं जात. भारत देशात 100 हुन अधिक मुख्य नद्या तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. जगातील कतार, युएई, मालदीव, बहरीन, कुवेत ह्या देशांमध्ये नदी वाहत नाही. परंतु भारतात अनेक नद्या आहेत व या नद्या फक्त आपल्याला पिण्यासाठीच पाणी देत नाहीत, तर पिकांनाही त्यांच्या द्वारे पाणी दिले जाते. राज्यातील भीमा, मिठी, मुळा, मुठा, पवना,गोदावरी अश्या एकूण 53 नद्या ह्या प्रदूषित झाल्याचे प्रदूषित मंडळाच्या अहवालात दिले आले आहे. मुख्यता हे प्रदूषण रोखण्यासाठी हरित लवादाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने 2018 मध्ये नदी पुनरुज्जीवन समिती स्थापन केली आहे व या समितीमार्फत राज्यातील प्रदूषित नद्यांचा कृती आराखडा तयार करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले आहे.

देशातील अनेक महत्वाच्या नाद्यांसोबत अनेक महत्वाच्या गोष्टी देखील जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे नदीचे पुरातन काळापासून मानवी जीवनाशी व संपूर्ण सजीव सृष्टीशी एक महत्वाचे नाते जोडले गेले आहे. आपण आत्तापर्यंत असे ऐकले आहे की भारतातील अनेक नद्या एकाच दिशेने वाहतात म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि बहुतांश नड्यांचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडेच असतो परंतु आपल्या देशातील नर्मदा ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

एकंदरीत भारतातील व जगातील अनेक नाद्यांचा विविध पद्धतीचा इतिहास आहे. नदी जगली तर गाव जगेल असं म्हटलं जात त्यामुळे नदी जगवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. आजच्या ह्या जागतिक नदी दिवसाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने नदी संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलूया.

-Ramesh Kachare

Thursday, August 29, 2024

राष्ट्रीय क्रीडा दिवस

 

नमस्कार! 

आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

खरंतर खेळ आणि आपलं अगदी लहानपणापासूनच घट्ट जोडलेलं असतं. आपण सगळेचजण लहानपणापासूनच वेगवेगळे खेळ खेळत असतो पण असे ही काही जण असतात ज्यांच्यासाठी खेळ हा फक्त  स्वतःच्या आनंदासाठी खेळण्याचं साधन नसून तो खेळ ही त्यांची करिअरची वाट बनून जाते. आणि त्यातूनच नवनवीन खेळाडू तयार होत असतात जे क्रीडाक्षेत्रात स्वतःचं मोलाचं योगदान देतात. हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी मला आठवतात,

कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती,

कोशिश करने वालों की हार नहीं होती! 

आणि ह्या ओळींना सार्थ ठरवणारी कामगिरी भारताच्या क्रीडापटूंनी करून दाखवली. ह्यावर्षीच्या म्हणजेच २०२४ ऑलिंपिक्स मध्ये आत्तापर्यंत भारतीय क्रिडापटूंनी आपले सर्वस्व पणाला लावून ६ पदकं आपल्या नावावर केली आहेत.  आणि म्हणूनच आजचा दिवस हा 'ऑलिंपिकवीरांची' म्हणजेच अशा क्रीडापटूंची आठवण काढल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ज्यांनी भारताचे नाव जगभरात उंचावले आणि म्हणूनच त्यांच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न!

राष्ट्रीय क्रीडा दिवस हा दरवर्षी  २९ ऑगस्ट रोजी  हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी  भारतामध्ये साजरा केला जातो. हा दिवस १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या ह्या अलौकिक कार्यासाठी त्यांना येणाऱ्या पिढ्यांनी ही कायम लक्षात ठेवावे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भविष्यात ही अनेक क्रीडापटू असे घडावेत असा ह्या मागचा उद्देश आहे. आता ऑलिंपिक स्पर्धा आणि भारत यांचं नेहमीच एकमेकांशी गहिरं नातं राहिलेलं आहे. भारतात अनेकांच्या डोळ्यांत ऑलिंपिक्स च्या सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचं स्वप्न आजही दिसतं. भारताला ऑलिंपिक्स मध्ये सर्वात पहिल्यांदा म्हणजेच १९५२ साली कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव ह्यांनी पुरुषांच्या फ्रीस्टाइल बँटमवेट प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले. तसंच २००० साल च्या ऑलिंपिक खेळांमध्ये, कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला ठरली. तेव्हापासून जी परंपरा सुरू ती अगदी आजतागायत टिकली आहे. नीरज चोप्रा, मीराबाई चानू, पि.व्ही. सिंधू ते अगदी आत्ता याच वर्षी पार पडलेल्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये मनू भाकर, सरबजोत सिंग, स्वप्नील कुसळे, इत्यादी क्रीडापटूंनी हा समृद्ध वारसा सुरू ठेवल्याचे पहायला मिळते. 

भारतामध्ये खेळासाठीची जिद्द आपल्याला अनेकांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळेच पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारतातील विविध खेळाडू आपल्याला उमेदीने सहभागी होताना दिसतात. मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०२४ हे वर्ष तर क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरलेली आहे. ऑलिंपिक्स मधील कामगिरी सोबतच भारताने क्रिकेटच्या दुनियेतला एक महत्वपूर्ण किताब म्हणजे ' टी-ट्वेंटी विश्वकप' देखील आपल्या नावे केला आणि हे सुवर्णक्षण आजही प्रत्येकाला आनंदून टाकतात. 

आज क्रीडा दिनाच्या दिवशी ह्या साऱ्याचा आढावा घेताना असं लक्षात येतं की भारताला खेळाची एक समृद्ध पार्श्वभूमी लाभलेली आहे. इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खेळ खेळायला, पहायला, त्याचा आनंद लुटायला आवडतो आणि हेच येणाऱ्या पिढ्यांना खेळांची गोडी लावतोय. इथे सचिन तेंडुलकर , विराट कोहली , महेंद्र सिंह धोनी, पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल हे भारतीय खेळाडूच नाहीत तर मेस्सी, रोनाल्डो, गेल असे अनेक भारताबाहेरील खेळाडू देखील त्यांच्या खेळातील प्राविण्याने भुरळ पाडतात. इथे खेळाच्या दुनियेतल्या अनेक उच्च किताबांना गवसणी घालण्याचं स्वप्नं, ध्येय अनेकांच्या मनात आहे फक्त त्यांना गरज आहे प्रोत्साहनाची‌. प्रत्येक खेळाडूला त्याचा विश्वास वाढवणारा एक प्रोत्साहनाचा हात त्यांच्या पाठीवर हवा असतो आणि तोच विश्वास आपण आपल्या भारत देशासाठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर दाखवला तर येणाऱ्या काळात असे अनेकानेक खेळाडू घडतील. यशस्वी खेळाडू जे मेडल प्राप्त करतात अशांची आपण दखल घेतोच पण त्यापलीकडे जाऊन इच्छा, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर ऑलिंपिक सारख्या मोठ्या प्लॅटफाॅर्मवर जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पण काही कारणाने मेडल हुकलेल्या ही प्रत्येक खेळाडूचं कौतुक आपण करू शकलो तर यश आणि अपयशाच्या चौकटीपलीकडे जाऊन आपण खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडू ला मान प्राप्त होईल‌. ज्याने त्यांना धीर मिळेल, त्यांची उमेद वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि येणाऱ्या काळात क्रीडाक्षेत्र उत्तरोत्तर समृध्द होत जाईल. त्यामुळे आपल्यातल्या ही खेळाडू ला नेहमी जीवंत ठेऊयात आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देऊन आपलं क्रीडाक्षेत्र प्रतीचं महत्वाचे योगदान नोंदवूयात ! 

-Manali Deshpande

Wednesday, March 27, 2024

जागतिक रंगभूमी दिन


 

प्रिय रंगभूमी,

शिर - साष्टांग दंडवत. 

जशी कृष्णासाठी राधा त्याची गुरू, त्याची मैत्रीण, त्याची प्रेयसी, त्याची हितचिंतक आणि आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती तशीच अनेक कलाकारांसाठी, रसिकांसाठी तू आहेस. आई आणि गुरू होऊन तू कित्येक कलाकार घडवलेस, मैत्रिणीप्रमाणे त्यांची साथ दिलीस, मार्गदर्शकाप्रमाणे त्यांच्या प्रगतीचा पाया रचलास आणि प्रेयसी म्हणून तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडलेस. 

        खूप वर्षांपूर्वी मी तुला विचारले होते की तुझं नाव "रंगभूमी" असं का आहे गं? तेव्हा तू म्हणालीस, "जसं तुझ्या जगातल्या आकाशामध्ये तू रंगांची उधळण बघतेस आणि हरखून जातेस तसं माझ्या जगात बघ! माझ्या जगातली तर भूमी सुद्धा रंगांची आहे."

       खरं आहे गं! ऊन पावसाच्या खेळामधून विविध रंगी इंद्रधनु एका क्षितिजाला दुसऱ्या क्षितिजाशी जोडते तसेच विविध रसांची निर्मिती ही एका कलाकाराला प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडते. यातून कधी हास्याचे फवारे फुलतात, तर कधी अश्रूंच्या धारा लागतात. कधी स्वरतालांची मैफिल सजते, तर कधी सामाजिक प्रश्नाने अस्वस्थता येते. तू कधी प्रेक्षकांना लहान मुलांप्रमाणे जादूच्या नगरीत फिरवतेस तर कधी जगाच्या वास्तवतेचे भान देतेस.

       पडद्यामागील कलाकार, रंगमंचावरील नट आणि प्रेक्षागृहातील प्रेक्षक यांच्या उत्तम समीकरणातून नवरसांची उधळण होते आणि एखाद्या प्रयोगाची कलाकृतीमध्ये निर्मिती होते. एखादी संकल्पना आपण वाचतो, ऐकतो त्यापेक्षा जेव्हा आपण प्रत्यक्ष सादरीकरणातून बघतो, तेव्हा ती जास्त भावते कारण आपण ती समक्ष अनुभवतो आणि त्यात आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याची ताकदही असते.

          दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त वयाची चिरतरूण आहेस तू. तुझ्या जगामध्ये तू स्थळकाळाचे भान हरपवतेस. स्वत्व विसरायला भाग पाडतेस तर कधी परकाया प्रवेशही करून घेतेस.

      "आत्मविरोधी कुतूहलधरा" या उक्तीप्रमाणे कधी कधी स्वतःचे नाव ही ओळख विसरून तुझ्या जगातलं नाव हीच एखाद्याची ओळख बनते. अशा ओळखीमुळे लोक कधी राग राग करतात, कधी हळहळतात, तर कधी तुझ्या जगातले क्षण आठवून खळखळून हसतात. थोडक्यात तू जसं मनोरंजनाचे काम करतेस तसेच समाजप्रबोधनाचेही काम करतेस.

       सिनेमा सारख्या माध्यमाला रिटेक चा पर्याय असतो. पण रंगमंचाच्या प्रवासामध्ये रिटेक सारखे परतीचे दोर कापलेले असतात. म्हणून तुझ्यावर सादर होणारी प्रत्येक कृती हा उत्स्फूर्त "प्रयोग" असतो. हा प्रयोग कलाकृती म्हणून जरी प्रेक्षकांना स्वर्गानुभव देत असला तरीही कलाकाराला तू ही जाणीव करून देतेस - की प्रत्येक वेळी इथे काहीतरी नाविन्यपूर्ण घडणार आहे. म्हणून कलाकराला माहिती असते की प्रत्येक सादरीकरण हा एक प्रयोग आहे. यामुळे त्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात. बघ ना, माणसातून कलाकार निर्माण करण्याचे काम तर तू केलेसच; पण कलाकारातून माणूस घडवण्याचे कामही तू किती सहज करून गेलीस!!

      समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली, पण तुझ्या झालेल्या मंथनातून बाहेर आलेल्या रत्नांची मोजदाद करणे केवळ अशक्य. परंतु इथे फक्त कलाकार रुपी रत्नांनाच महत्त्व न देता छोट्यातले छोटे काम करणाऱ्यालाही तेवढेच महत्त्व असते. तिसरी घंटा वाजवणाऱ्यापासून ते लेखक - दिग्दर्शकापर्यंत सर्वांनाच तू त्या कलाकृतीचा अविभाज्य भाग बनवतेस.

       जसं भूमी एका बीजापासून गगनचुंबी वृक्षापर्यंतच्या प्रवासाची साक्ष आणि साथ देत असते तसेच तू अनेक कलाकृतींची, अनेक कलाकारांची आणि अनेक रसिकांची ही साथ आणि साक्ष देत आली आहेस.

     अनादी कालापासून चालत आलेला तुझा प्रवास अनंत काळापर्यंत चालतच राहणार आहे. आजच्या रंगभूमी दिनानिमित्त हे कृतज्ञता पुष्प, हे रंगभूमी तुला आणि तुझे आराध्य दैवत नटरंगाला अर्पित करते.

              ।। आत्मविरोधी कुतूहलधरा

                  नमन नटवरा विस्मयकारा ।।

     

तुझीच रसिका, 

चैत्राली


- Chaitrali Tuljapurkar

Monday, March 25, 2024

प्रिय व.पु. यांस,


 प्रिय व.पु.,

हॅपी बर्थडे..

     गाणी ऐकत असताना एखादं गाणं अगदी अचानक हाताशी मिळावं आणि नंतर ते गाणं आपलं कायमचं  फेवरेट होऊन जावं,मला तुम्ही भेटलात अगदी तसे. म्हणजे मला व.पु. माहीतच नव्हते असेही नाही अगदी; पण रोज नजरेसमोर असणाऱ्या एखाद्या गोष्टीची खूप दुर्लक्षित बाजू कधीतरी नजरेत यावी आणि “ अरेच्चा..! हे आपल्याला आधी का नाही मिळालं..?”  असं वाटावं, माझ्यासोबत अगदी तसंच झालं. तुमच्या ‘बदली’ कथेमुळे मला तुम्ही माहीत होतात. कधीतरी काम करत असताना मी प्लेबॅकला तुमचा ‘जे के मालवणकरही’ ऐकला होता. त्यामुळे विनोदी कथाकार म्हणून तुमची ओळख झाली होती. मराठी वाचक म्हणून जितके व.पु.माहित हवे तेवढे मला माहित होतेच; पण मी तुमचा फॅन झालो ते म्हणजे तुम्ही 62 व्या नाट्य संमेलनात घेतलेली वसंतरावांची मुलाखत ऐकून. मराठी संगीत नाटकाची वैभवाची वाटचाल वसंतरावांनी फार ओघवत्या भाषेत अशी सांगितली की ऐकणाऱ्याने केवळ मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावं. एखाद्या गोष्टीचा एवढा थोर व्यासंग करणाऱ्या सागरासारख्या थोर माणसाला एक मुलाखतकार म्हणून तुम्ही तेवढ्याच समृद्धतेने बोलतं केलं की समुद्रमंथन झाल्यासारखं वसंतरावांनी मराठी नाट्यसृष्टीची रंगभूमीची वैभवाची ती वर्षे अशी मौक्तिकांसारखी उलगडून दाखवली. वसंतरावांना ऐकून मी भारावलो होतोच; पण मी त्याहून भारावलो होतो तुमचा अभ्यास पाहून. तेव्हा जाणलं की, व.पु.म्हणजे कोणी सामान्य माणूस, साहित्यिक नाही. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा सगळे व.पु.वाचून काढायचे असं मनाशी ठरवलं. तो खयाल मनात तसाच राहिला आणि वेळ मात्र किनाऱ्याच्या वाळूसारखा भुरभुर उडून गेला आणि मनाशी ठरवलेलं तसंच राहिलं.

     काळ सरकत राहिला आणि मला सुलेखन करण्याची लहर आली. लिहू काय..? काय लिहू..? विचार करतानाच मीडियावर कुठेतरी वाचलं, ‘ अश्रू स्वतःची वकिली करतात. वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत.’  म्हटलं, “ कसलं भारीय हे..!” आणि खाली नाव पाहिलं तर तुमचं.मला काय आनंद झाला सांगू..? मला बऱ्याच मोठ्या काळाच्या खंडानंतर माझा हरवलेला दोस्त सापडला जणू. तेव्हापासून मी नियमित तुमचं लिखाण वाचत असतो आणि क्षणाक्षणाला आणखी वपुमय होत जातो. 

     खरं सांगू वपु..? ही माणसं तुम्हाला आपला ‘पार्टनर’ म्हणतात. म्हणजे त्यांनी तुमचे लिखाण तेवढे वाचले तर ते म्हणोत भले. मी मात्र तुम्हाला माझ्या जगण्याच्या महाभारतातला श्रीकृष्ण मानतो. तुम्ही ‘आपण सारे अर्जुन’ असे म्हणत असला तरीही..! कारण आपण सारे अर्जुन वाचत असताना तुम्ही मला सगळं काही त्या कृष्णाच्या ममतेनेच शिकवताय असा भास होतो. 

      माझी जात पडली लेखकाची. या जातीला जगण्यासाठी लागतात माणसं. मध्यमवर्गातली,उच्चभ्रू, नाल्या शेजारी पत्र्याच्या खोपटात राहणारी, पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात मटण खाणारी, बस स्टँडवर काखेत पिशवी मारून उभी असणारी, नोकरीवर जाणारी,दरबारी कानडा ऐकत माना डोलवणारी, संध्याकाळी बागेतल्या बाकावर बसणारी अशी सगळी माणसं. आता एवढी माणसं बघत बसायची म्हणजे वेळ किती जायचा..? अशावेळी मी तुमचेच एखादं पुस्तक वाचतो किंवा चाळतो तरी म्हणजे अशा खूप माणसांपैकी कुणाचा तरी एखादा छोटासा पैलू सापडतो. ‘आपण सारे अर्जुन’ मध्ये तुम्हीच म्हणता की त्या 50 पुस्तकांमधून वेध घेतला फक्त माणसाचा. ते अगदी खरं आहे मला वाटतं. माणूस समजून घेण्यासाठी माणूसपणाच्या पलीकडे जावं लागतं आणि तुम्ही त्या स्थानी पोहोचलात. म्हणजे माणूस तुम्हाला समजलाय किंवा तुम्ही माणूस जाणलाय.

तुम्ही खूप थोर जगलात व.पु.आणि तसं थोर लिहिलंतंही. मलाही वाटतं की लिहावं खूप चांगलं. असंच माणसांवर.. पण लेखक म्हणून मला आत्ताच्या काळात एवढे मुक्त लिहायचं म्हटल्यास दोनदा विचार करावा लागतो. तुमचा काळ खरंच लेखकांसाठी किंवा कलाकारांसाठी सुखाचा म्हणावा असा. त्याकाळी माणूस जाणला जायचा केवळ त्याच्या कलेने आणि अंगभूत गुणांनी. आज मात्र माणसाला माणूस किंवा कलाकार म्हणून बघताना समाजाच्या किंवा रसिकांच्या नजरेवर चढतात वेगवेगळ्या विविध नजरांचे चष्मे. त्यातून माणसाची कला पाहिलीच जात नाही. कलाकार म्हणून आणखी काय सांगू व्यथा..? हो..! भावना..! ही आणखी एक नाजूक कण्याची बाई. कस्पटाच्या धक्क्यानेही दुखावणारी. एवढेच सांगा वपु.. आम्ही लिहिताना मुक्तपणानं लिहावं का नाही..? की सात आभाळ भेदत जाऊन, ब्रह्मांडाच्या गणितांशी खेळणाऱ्या आपल्या कलासक्त मनाच्या पाखराला घालायचा तथाकथित 'समाजजाणिवेचा' पिंजरा...? सांगा. हे एवढं निस्तरून लिहायला जमलं ना तर मीही होईन लोकांचा पार्टनर...

कळावे,

तुमचाच एक अर्जुन


- Darsh Samant 

Tuesday, February 27, 2024

माझी मराठी

माझी मराठी

माझी भाषा माझी आई 
अर्थ भावनांना देई l 
तिच्या राहावे ऋणात
होऊ नये उतराई ll 

     फक्त मराठी नाही! तर जी आपली मातृभाषा आहे अशी मराठी भाषा ! "संस्कृत" जी पूर्वी देवभाषा होती, अशा संस्कृत नंतर जिचा जन्म झाला ती म्हणजे प्राकृत; माझी मराठी भाषा! आज उपलब्ध असलेले मराठी भाषेतील पहिले वाक्य म्हणजे "श्री चामुण्डराये करवियले." हे वाक्य म्हैसूर जवळ श्रवण - बेळगोळ येथील शिलालेखात आपल्याला आढळून येते. हा लेख इ. स. शके ९८३ म्हणजे ज्ञानेश्वरीपूर्वी ३०७ वर्षी कोरला गेला .
     मराठी भाषेच्या साहित्य परंपरेचा विचार केला जातो त्या वेळी बघणाऱ्याचे डोळे, ऐकणाऱ्याचे कान, घेणाऱ्याचे हात कमी पडतात; कारण अत्युच्च साहित्य परंपरा लाभलेली माझी मराठी सढळ हाताने जो तिचे लेणे लेऊ इच्छितो त्याच्याकडे येते.
     संपूर्ण मराठी भाषेत लिहिला गेलेला सर्वात प्रारंभी चा ग्रंथ म्हणजे "विवेकसिंधू." हा ग्रंथ लिहिणारे मुकुंदराज मराठीचे आद्यग्रंथकार ठरतात. संपूर्ण मराठी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ इ. स. ११८८ मध्ये त्यांनी लिहिला. 
     मराठी भाषा एक अशी भाषा आहे l जी अत्यंत लवचिक आहे. "वळवावी तशी वळते ती माझी मराठी भाषा..!" असं म्हणताना मन अभिमानाने भरून येतं. आज कोणत्याच भाषेची असणार नाहीत इतकी रूपे मराठीची पाहायला मिळतात. तिचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येक ठिकाणी ती त्या त्या लोकांची होऊन जाते. 
   खेड्या पाड्यातील रांगडी , अशुद्ध , अपभ्रंश असलेली भाषा असो, कोल्हापुरी ठसक्यात बोलली जाते ती मराठी असो, किंवा मालवणी / कोकणी अशा गोड स्वरात बोलली जाते ती मराठी असो शेवटी असते ती आपली मराठीच! आपली मराठी इतकी श्रेष्ठ आहे की तिची रूपे जरी वेगवेगळी असली ना, तरी एकमेकांच्या मनातील भावना पोहोचवण्याचं काम आपली मराठी करत राहते. 
   पूर्वी मराठी भाषेला राजभाषेचा मान प्राप्त नव्हता पण तो आज काही प्रमाणात मिळाला आहे. इतकंच नाही तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये मातृस्थानी, मायबोली, मातृभाषा म्हणून माझी मराठी स्थित आहे. कारण आईची भाषाच वेगळी असते. कधी ती नजरेतून बोलते, कधी बोलण्यातून तर कधी स्पर्शातून व्यक्त होते. म्हणूनच तर तिला मातृभाषा म्हणतात! जी पोटातून येते ती मातृभाषा, कळवळ्याची भाषा; आणि जी ओठातून येते ती व्यावहारिक भाषा! 
      आपल्या संस्कृतीमध्ये, इतिहासामध्ये जे संतमहात्मे होऊन गेले त्या सर्वांनी देखील मातृस्वरूप मराठीची अत्यंत मनोभावे सेवा केली आहे. ज्ञानोबा माऊली आपल्या मराठी भाषेचा गौरव करताना लिहितात, 
माझ्या मराठीचीया बोलू कवतुके l परी अमृता तेंही पैजा जिंके l ऐशीं अक्षरें रसिकें l मेळवीन ll
माझी मराठी भाषा इतकी श्रेष्ठ आहे की तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. गोडीच्या बाबतीत माझी मराठी "अमृताला" पैजेवर, प्रतिज्ञेवर जिंकू शकते. अशा तऱ्हेची रस, अलंकारयुक्त अमृतमधुर शब्दांची रचना केवळ मराठीत करता येते. अशी आपली मराठी!
       असं सगळं असताना आज आपल्या मराठी भाषेची होत असलेली गळचेपी आपण शांतपणे पाहणे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आजच्या काळात अगदी "शिक्षण" क्षेत्रातही मराठी भाषेला मानाचे स्थान मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय! खरंतर पूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या शिक्षणतज्ज्ञांनीही सांगितलंय की ज्ञान मिळण्यासाठी आपली मातृभाषाच उत्तम! परंतु हे आपल्याला समजणार केव्हा? 
मराठी भाषेची गळचेपी थांबवायची असेल तर आधी मराठी शाळांची अधोगती थांबवायला हवी तरच आपल्याला अधिकार आहे," लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " म्हणण्याचा! यासाठी इतर भाषांचा राग, अपमान करण्याची गरज नाही. फक्त आपल्या मातृभाषेचा, मायबोलीचा, मराठी भाषेचा विसर कधीही पडून देऊ नका. आपली भाषा सामर्थ्यवान आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण मराठीचा जास्तीतजास्त वापर केला पाहिजे. तेव्हाच आपण अभिमानाने सांगू की ही मातृभाषा माझी मराठी आहे !!! 
शेवटी फक्त इतकेच ,
माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले 
तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले ll 
धन्यवाद !!
 - वादसभा सदस्य पूर्वा शिवप्रसाद काणे

And Then There Was Her: The Queen of Crime

  Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latt...