महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला, परंतु १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात, मुंबई येथे पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा झाला. २०२५ सालच्या जागतिक महिला दिनाची संकल्पना आहे – ‘सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी : हक्क, समानता, सक्षमीकरण.’
परंतु ही केवळ घोषणा नसून स्त्रीत्वाने संपूर्ण जगाला घातलेली साद आहे—एक परिवर्तनाची मागणी. स्त्री शक्तीच्या सन्मानासोबत त्या शक्तीच्या न्यायाची हाक. इतिहासाच्या कपाटात अनेक कथा दडल्या आहेत. काही स्त्रियांनी क्रांती घडवली, काहींनी विद्रोह केला, तर काहींनी सहनशीलतेच्या कडेलोटावरही आत्मसन्मान जपला. ऋग्वेदातील गार्गी, मैत्रेयी, राणी लक्ष्मीबाई, रोजा पार्क्स, मदर तेरेसा, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, मारिया क्युरी—अशा अनेक स्त्रिया जागतिक, राष्ट्रीय, शहरी, ग्रामीण स्तरावर आदर्श ठरल्या.
पण ८ मार्च हा दिवस फक्त या महान स्त्रियांना स्मरण्याचा आहे का? की नवीन उदाहरण घडवण्याची प्रेरणा घेण्याचा?
मला वाटते—दोन्हीही नाही.
या ओळखींच्या पलीकडे असलेल्या प्रत्येक स्त्रीला तिचे स्त्रीत्व मुक्तपणे जगता यावे, हाच या दिवसाचा खरा अर्थ. नेहमीप्रमाणे यावर्षीही ८ मार्च हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाईल, पण या आनंदाच्या पलिकडेही एक कटू वास्तव आहे. आजही अनेक स्त्रिया अन्याय सहन करत आहेत, आत्मसन्मानाच्या आणि स्वातंत्र्याच्या एका खोल दीर्घ श्वासाची याचना करत आहेत. हे चित्र बदलायला किती काळ लागेल, हे काळच ठरवेल.
परंतु मला ठाऊक आहे की, काही पुरुषी क्रौर्याच्या पलीकडेही एक पुरुषी करुणेचा उजेड आहे. त्या पुरुषी ममत्त्वासाठी माझा हा लेख. स्त्रीत्वाच्या जाणिवेच्या शब्दांत अरुणा ढेरे म्हणतात—
"की हिला मातीचं बळ मिळो,
लहरी वादळाचं पिसाटपण
समजून रानावनात तगण्यासाठी...
की हिला पाखरांच्या संवादाचं सुख कळो...
वाढण्याच्या कळा सोसत पानांत येण्यासाठी...
ही होईल जर स्वतःच्या ओळखीइतकी खोल,
तर टिकवील आपोआपच स्वप्नांच्या शिरेशिरेतली ओल....”
एकीकडे मातीचं बळ आणि वादळाचं पिसाटपण अंगी रुजवणाऱ्या स्त्रीला, पाखरांच्या संवादाचं सुख कळण्याइतकी शांतीही मिळो. तिच्या स्वप्नाइतकीच तिला तिची खरी ओळखही कळो.
उत्सव होवो तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या कसोटीचाही—
ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचाही,
आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही.
-प्रतीक्षा ओंबळे
No comments:
Post a Comment