Wednesday, March 19, 2025

रंगभान

मला मोहित करतात रंग, त्यांच्या छटा, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, सारंकाही. जगातले आणि आयुष्यातले रंग सारखेच असं वाटलं तेव्हा कळलं की एकेका आयुष्यानेच जग रंगीत होत राहातं, कधी प्रेमाने लाल, दुःखाने काळं किंवा स्थैऱ्याने पांढरंही. कोणताच रंग नसलेला 'ना'रंगी रंग जसा पाण्याला असतो तसा तुम्हां-आम्हालाही तो निसर्गदत्त असतो. जिथे जन्मावं, ज्या स्थितीत राहावं, वाढावं तिथला रंग पांघरत राहतो आपण. तो रंग नक्की ल्यावा मात्र ल्यावा तो विवेकाच्या गाळण्यातून गाळून. असा विचार केला तर किती सहज वितळून जातो पदराखाली जपलेला खोटा अभिमान, माणसातली आणि खरंतर मनातली दरी लीलया भरून काढतात हे रंग... मात्र पूर्वसुरींच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की कळते की ह्या रंगांचं प्रयोजन फार व्यापक आहे, बघावा तसा पर्वत दिसावा तसेच हे रंगदेखील आहेत. सृष्टीच्या व्यापकतेचं वैभव हे रंगच तर दाखवतात. समुद्र आणि वाळवंटाचा रंग एक नाही म्हणूनच दोघांना त्यांचं-त्यांचं महत्त्व आहे, माहात्म्य आहे. ह्या रंगांकडे जेव्हा भौतिकदृष्ट्या बघतो तेव्हा खरंच अवाक् होऊन जातो. शरीरातल्या विशिष्ट पेशी दृष्याच्या रंगभानासाठी कारणीभूत ठरतात असं शास्त्र सांगतं. माणसा-माणसात त्यातले पुसटसे भेद आणि त्याचे आजारही सांगतं, ते खरं देखील आहे पण यावरून काही अंशांनी तरी माणसांची दृष्टी वेगळी असते हेच स्पष्ट होतं. हे कळल्यावर दृष्टी वेगळी असल्याने माणसांचा दृष्टिकोन वेगळा असणारच हे मनाला इतकं पटतं की मतभेदाची कित्येक कारणं समूळ मावळून जातात.

कोट्यावधी लोकांचं जीवन युगांपासून व्यापून राहिलेले धर्म म्हणे एका रंगाने दर्शविता येतात, हे रंगांचं केवढी माहात्म्य म्हणावं ! इथे आठवतो तो शाळेतला प्रयोग, प्रिझम मधून गेलेले सगळे रंग शेवटी पांढर्या रंगामधे परिणत होतात, तेचा वाटतं की शेवटी शुद्ध श्रद्धेच्या चौकटीतून गेलेले सगळेच रंग एकाच चैतन्यात मिसळणार आहेत. तेव्हा माझ्या रंगाचा मला अभिमान असला तरी दुसऱ्याच्या द्वेषाचं कारणच उरत नाही. म्हणून महत्व द्यायचं ते प्रत्येकाच्या स्वतंत्र असण्याला, दिसणं हे काळाच्या ओघात बदलत राहणारच असतं. शेवटी सगळे सारखाच श्वास घेतात, कुणाचा श्वास भगवा नसतो किंवा हिरवाही... जसा शब्दांसाठी अर्थ तसा रंगांसाठी भाव असतो. जे शब्दांतून सांगता येत नाही, अभिनयातून दाखवता येत नाही ते रंग दर्शवतात. कलाकाराच्या भावावस्थेपर्यंत नेणारी शिडी म्हणजे रंग. भान हरपून टाकणारे तसं भानावर आणणारेही रंगच. प्रत्येकाला आपलं आयुष्य बसवता येतं एखाद्या रंगामध्ये किंवा दोन-चार रंग मिसळून साकारलेल्या एखाद्या रंगामध्ये, मात्र त्याला धाडस हवं हे नक्की. नाही म्हटलं तरी आजच्या काळात प्रत्येकाच्या विचारांना एखादा रंग लागलेलाच असतो. अशा रंगांच्या छटा फार बोलक्या असतात. माणसाला अगदी सुरुवातीला चित्र काढता येत होतं पण तो तिथे थांबला नाही, पाना-फुलांच्या रसाने तो त्यामधे रंग भरू लागला, स्वतःचे क्षितिज स्वतः विस्तारू लागला. आजची परिस्थिती तशी फार वेगळी, पण हृदयाची तहान अगदी तिच. आयुष्यात रंग भरण्याची, आयुष्य रंगीत करण्याची. प्रत्येकाच्या मनातल्या रंगांना कर्माची जोड मिळतेच असं नाही, पण रंगांची ओढ मात्र कायम राहते, जशी मनात तशी इतिहासाच्या पानांवरही. कधी हातात नसलेले अनपेक्षित रंग उधळले जातात आणि नव्हत्याचं होतंदेखील होतं.

रस्त्याच्या कडेला फुलं विकून पोट भरण्याची ईच्छा उरात बाळगणाऱ्या मुलाच्या निरागस डोळ्यांत मला हेच रंग दिसतात किंवा त्याच्यासमोरून गाडीच्या खिडकीतून हात दाखवत जाणाऱ्या एखाद्या सोनूच्या डोळ्यातही अगदी तेचं रंग असतात. ए.सी.मधे बसलेल्या आणि रस्त्यावर झोपलेल्या माणसांच्या स्वप्नातही हेच रंग जाणवतात, खरंच माणसाचं अंतरंग इतकं रंगीत असतं का ? 


 -अनीश जोशी

No comments:

Post a Comment

Oscar Wilde: The Man Who Lived His Metaphor

  "All art is quite useless" this seemingly somewhat odd sentence is the most important sentence in the preface of a literary gem ...