Thursday, July 24, 2025

इतिहासाचे साक्षीदार ते जागतिक वारसा...

 


"शिवरायांचे आठवावे रूप l शिवरायांचा आठवावा प्रताप l 

शिवरायांचा आठवावा साक्षेप l भूमंडळी ll"

समर्थांच्या या ओळी सार्थ करणारी घटना गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याकडे घडली. युनेस्को (UNESCO) म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. या संघटनेने 'मराठा लष्करी लँडस्केप' (Maratha Military Landscapes) या नावाने महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांची निवड जागतिक वारसा स्थळांच्या यादी मध्ये केली. ही यादी ४७ व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात जाहीर करण्यात आली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला असा 'शिवनेरी', महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला 'तोरणा', महाराजांची पहिली राजधानी 'राजगड', ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला असा 'रायगड', अफजलखानाच्या वधाची ऐतिहासिक घटना घडली तो 'प्रतापगड', सिद्धी जौहर सोबत ऐतिहासिक झुंज दिली तो 'पन्हाळा', जिथे मुघलांविरुद्ध भयंकर युद्ध झाले असा 'साल्हेर', भक्कम तटबंदी आणि नैसर्गिक सौंदर्य असलेला आणि पोलादासम मजबूत असलेला 'लोहगड', सागरी संरक्षणासाठी महत्त्वाचा किल्ला म्हणजे 'विजयदुर्ग', समुद्रात बांधलेला अभेद्य किल्ला 'सिंधुदुर्ग', अरबी समुद्रातील 'सुवर्णदुर्ग', आणि शिवाजी महाराजांचे दक्षिणेतील लष्करी ठाणे म्हणजे 'जिंजीचा किल्ला'. प्रत्येक गड आणि त्या प्रत्येकाचं असलेलं विशेष महत्व... 

आज अभिमानाने उर भरून येतो की, भारतासारख्या देशात आम्ही राहतो— जेथील संस्कृती, सनातन वैदिक संस्कृती आहे. इथल्या केवळ वस्तू आणि व्यक्तीच नाही तर येथील मातीच्या कणाकणाला देखील ऐतिहासिक, आणि सांस्कृतिक महत्व आहे. 

पण आज आमचं दुर्दैव असं, की त्याची किंमत कळायला मात्र आम्हाला वेळ लागतोय! परदेशी व्यक्ती तिकीट काढून, लांब पल्ल्याचा प्रवास करून आमच्या गडकिल्यांचा अभ्यास करायला येतात; पण आम्ही भारतीय मात्र अनेकदा आमच्या गडकिल्ल्यांकडे केवळ भ्रमंती करण्याचे एक क्षेत्र म्हणून बघतो. किल्यांच्या भिंतीवर नाव कोरण्यात आम्हाला आमचं यश वाटतं. आणि यामुळे आम्ही त्या गडाच्या सौंदर्याला धक्का लावतो. 

खरंतर आपले गडकिल्ले हे आपल्यासाठी पवित्र मंदिरांप्रमाणे आहेत. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत केवळ 'स्वराज्य' हाच मंत्र जपलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, या कार्यामध्ये वेळोवेळी त्यांना साथ देणारे— स्वराज्यासाठी लढलेले, झटलेले, झगडलेले, स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले सर्व हरहुन्नरी मावळे, आज या प्रत्येकाच्या स्मृती गडाच्या कणाकणांत आहेत. आज त्यांचं रक्त गडाच्या मातीत मिसळलं म्हणून स्वराज्य टिकलं! आणि अशा या आपल्या पवित्र गडकिल्ल्यांवर चढवलेला 'मानाचा मुकुट' म्हणजे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या किल्ल्यांना दिलेला बहुमान आहे. ह्या ऐतिहासिक घटनेचे आपण सर्व साक्षीदार आहोत हे आपले भाग्य! जे गडकिल्ले आज या सर्वाची साक्ष देतात, त्यांना इथून पुढे प्राणपणाने जपणे हेच आपले कर्तव्य! तेव्हाच खऱ्या अर्थाने आणि अभिमानाने आपण सांगू की, "होय! जेथील 12 किल्ल्यांचा समावे्श आज जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आहे, ते किल्ले आमच्या मराठी माणसांची— आमच्या इतिहासाची ओळख आहेत....!!

- पूर्वा काणे

1 comment:

  1. पूर्वा, छान लिहिलं आहेस.
    असेच लिहित जा.

    ReplyDelete

Because Every Life Is Precious...

I still remember that day and it shakes me to my core till date. That evening felt heavier than usual. That day when nothing made sense. I h...