Showing posts with label conflict resolution. Show all posts
Showing posts with label conflict resolution. Show all posts

Sunday, February 22, 2026

प्रदीर्घ युद्धे : संघर्ष निवारणापासून ते अगतिकतेपर्यंत


दरवेळी युद्ध सुरू होतं तेव्हा एकच भाषा ऐकू येते, “ही शेवटची लढाई आहे.” सुरक्षेसाठी. सन्मानासाठी. सीमांसाठी. अस्तित्वासाठी. पण मग वर्षे जातात, पिढ्या बदलतात आणि युद्ध संपत नाही... आज जगभरात आपण पाहतो, रशिया–युक्रेन संघर्ष तिसऱ्या वर्षात, गाझामध्ये पुन्हा-पुन्हा भडकणारी हिंसा, मध्यपूर्वेतील अस्थिरता, आफ्रिकेतील सशस्त्र संघर्ष आणि आपल्या उपखंडातही सतत तणावाची छाया... प्रश्न असा आहे, ही सर्व युद्धे अजूनही 'उद्दिष्टां'साठी लढली जात आहेत, की ती आता फक्त सवय झाली आहेत? सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे हिंसा सामान्य होणं.

जेव्हा एखादं मूल सायरनच्या आवाजात मोठं होतं, जेव्हा बॉम्बस्फोट ही ब्रेकिंग न्यूज नसून रोजचं वास्तव असतं, जेव्हा सीमा भागात तणाव ही 'नैसर्गिक अवस्था' मानली जाते– तेव्हा समाज हळूहळू संघर्षाशी जुळवून घेतो; आणि ही जुळवणूकच धोकादायक आहे. 

युद्धाची अधिकृत कारणे नेहमीच भक्कम असतात– राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादाचा प्रतिकार, आक्रमणाला उत्तर, परंतु दीर्घकालीन युद्धात एक वेगळीच राजकीय गती काम करत असते. बाह्य शत्रू असला की अंतर्गत प्रश्न कमी विचारले जातात. राष्ट्रवादाची लाट निर्माण झाली की मतभेद 'देशद्रोह' ठरतात. आपत्कालीन परिस्थिती जाहीर झाली की उत्तरदायित्व पुढे ढकलले जाते. इतिहासात आणि वर्तमानात आपण हे अनेकदा पाहिलं आहे. युद्ध कधी कधी सुरक्षेचं साधन असतं; पण ते सत्तेच्या टिकावाचं साधनही बनू शकतं. हा केवळ राजकीय नाही, तर नैतिक प्रश्न आहे– 

जर शांततेमुळे सत्ता कमकुवत होत असेल, तर काही जणांना शांतता नकोशी वाटू शकते का? आज युद्ध फक्त रणांगणावर लढलं जात नाही; ते अर्थव्यवस्थेतही लढलं जातं. संरक्षण-उद्योग, शस्त्रास्त्र करार, पुनर्बांधणी प्रकल्प, संसाधनांवरील नियंत्रण– युद्ध संपलं तर अनेकांचे आर्थिक गणित बिघडू शकते. म्हणून कधी कधी असं वाटतं – आपण शांततेपेक्षा अस्थिरतेत जास्त गुंतवणूक करत आहोत का? शांतता चर्चा होतात, करार होतात, पण ते वारंवार मोडतात. जागतिक संस्थांमध्ये राजकीय मतभेद, व्हेटो राजकारण, निवडक हस्तक्षेप – यामुळे न्याय सर्वांसाठी समान राहत नाही. जेव्हा लोकांना वाटू लागतं की आंतरराष्ट्रीय व्यवस्थादेखील राजकारणाने नियंत्रित आहे, तेव्हा शांततेवरील विश्वास कमी होतो.

मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, 'Learned Helplessness.' वारंवार अपयश आलं, आणि परिस्थितीवर नियंत्रण नाही असं वाटलं, की माणूस प्रयत्न करणं सोडतो. दीर्घकालीन युद्धात समाज याच अवस्थेत जातो. गाझामध्ये जन्मलेली मुलं युद्धाला नियती मानू लागतात. अफगाणिस्तानात दशकानुदशके संघर्षानंतर राजकीय उदासीनता वाढते. काश्मीरमध्ये संवाद प्रक्रियेवरचा विश्वास अनेकदा डळमळीत होताना दिसायला लागतो. लोक बदल घडवणारे नागरिक राहात नाहीत, ते फक्त जगणारे बनतात. युद्धाचा सर्वात मोठा पराभव इथेच होतो, जेव्हा माणूस स्वतःच्या आवाजावरचा विश्वास गमावतो... मग खरंच युद्धाची गरज आहे का? हा प्रश्न टाळता येत नाही. हो, काही वेळा संरक्षणासाठी प्रतिकार आवश्यक असू शकतो. पण दीर्घकालीन युद्ध? पिढ्यान् पिढ्या चालणारा संघर्ष? सतत भीतीवर उभा असलेला समाज? ह्यांचं काय? खरे पाहता, युद्ध हे कोणाच्याही विजयाचं प्रतीक नसून मानवी विकासाचं सामूहिक अपयश आहे. ते न्यायाच्या संकल्पनेला शांततेची शिकवण देत स्वतः मात्र हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या दुटप्पीपणालाही उघड करतं.

जर आपण शस्त्रास्त्रांवर अब्जावधी खर्च करू शकतो, तर आपण संवाद, शिक्षण, आणि समावेशक विकासावर तितकाच खर्च का करू शकत नाही? युद्ध जिंकता येतं, सीमा बदलता येतात, सत्ता टिकवता येते; पण हरवलेली आशा परत आणणं सर्वात कठीण असतं. खरी लढाई सीमांवर नाही ती मानवी मनात आहे. आपण भीतीवर उभं असलेलं जग स्वीकारणार आहोत का? की संवादावर उभं असलेलं जग निर्माण करणार आहोत? युद्ध अपरिहार्य असू शकतं, पण दीर्घकालीन युद्ध अपरिहार्य आहे का? हा प्रश्न कदाचित, आपण सगळ्यांनी विचारायला हवा...


-उत्कर्षा निगड़े 

And Then There Was Her: The Queen of Crime

  Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latt...