Tuesday, March 26, 2024

जागतिक रंगभूमी दिन


 

प्रिय रंगभूमी,

शिर - साष्टांग दंडवत. 

जशी कृष्णासाठी राधा त्याची गुरू, त्याची मैत्रीण, त्याची प्रेयसी, त्याची हितचिंतक आणि आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती तशीच अनेक कलाकारांसाठी, रसिकांसाठी तू आहेस. आई आणि गुरू होऊन तू कित्येक कलाकार घडवलेस, मैत्रिणीप्रमाणे त्यांची साथ दिलीस, मार्गदर्शकाप्रमाणे त्यांच्या प्रगतीचा पाया रचलास आणि प्रेयसी म्हणून तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडलेस. 

        खूप वर्षांपूर्वी मी तुला विचारले होते की तुझं नाव "रंगभूमी" असं का आहे गं? तेव्हा तू म्हणालीस, "जसं तुझ्या जगातल्या आकाशामध्ये तू रंगांची उधळण बघतेस आणि हरखून जातेस तसं माझ्या जगात बघ! माझ्या जगातली तर भूमी सुद्धा रंगांची आहे."

       खरं आहे गं! ऊन पावसाच्या खेळामधून विविध रंगी इंद्रधनु एका क्षितिजाला दुसऱ्या क्षितिजाशी जोडते तसेच विविध रसांची निर्मिती ही एका कलाकाराला प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडते. यातून कधी हास्याचे फवारे फुलतात, तर कधी अश्रूंच्या धारा लागतात. कधी स्वरतालांची मैफिल सजते, तर कधी सामाजिक प्रश्नाने अस्वस्थता येते. तू कधी प्रेक्षकांना लहान मुलांप्रमाणे जादूच्या नगरीत फिरवतेस तर कधी जगाच्या वास्तवतेचे भान देतेस.

       पडद्यामागील कलाकार, रंगमंचावरील नट आणि प्रेक्षागृहातील प्रेक्षक यांच्या उत्तम समीकरणातून नवरसांची उधळण होते आणि एखाद्या प्रयोगाची कलाकृतीमध्ये निर्मिती होते. एखादी संकल्पना आपण वाचतो, ऐकतो त्यापेक्षा जेव्हा आपण प्रत्यक्ष सादरीकरणातून बघतो, तेव्हा ती जास्त भावते कारण आपण ती समक्ष अनुभवतो आणि त्यात आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याची ताकदही असते.

          दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त वयाची चिरतरूण आहेस तू. तुझ्या जगामध्ये तू स्थळकाळाचे भान हरपवतेस. स्वत्व विसरायला भाग पाडतेस तर कधी परकाया प्रवेशही करून घेतेस.

      "आत्मविरोधी कुतूहलधरा" या उक्तीप्रमाणे कधी कधी स्वतःचे नाव ही ओळख विसरून तुझ्या जगातलं नाव हीच एखाद्याची ओळख बनते. अशा ओळखीमुळे लोक कधी राग राग करतात, कधी हळहळतात, तर कधी तुझ्या जगातले क्षण आठवून खळखळून हसतात. थोडक्यात तू जसं मनोरंजनाचे काम करतेस तसेच समाजप्रबोधनाचेही काम करतेस.

       सिनेमा सारख्या माध्यमाला रिटेक चा पर्याय असतो. पण रंगमंचाच्या प्रवासामध्ये रिटेक सारखे परतीचे दोर कापलेले असतात. म्हणून तुझ्यावर सादर होणारी प्रत्येक कृती हा उत्स्फूर्त "प्रयोग" असतो. हा प्रयोग कलाकृती म्हणून जरी प्रेक्षकांना स्वर्गानुभव देत असला तरीही कलाकाराला तू ही जाणीव करून देतेस - की प्रत्येक वेळी इथे काहीतरी नाविन्यपूर्ण घडणार आहे. म्हणून कलाकराला माहिती असते की प्रत्येक सादरीकरण हा एक प्रयोग आहे. यामुळे त्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात. बघ ना, माणसातून कलाकार निर्माण करण्याचे काम तर तू केलेसच; पण कलाकारातून माणूस घडवण्याचे कामही तू किती सहज करून गेलीस!!

      समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली, पण तुझ्या झालेल्या मंथनातून बाहेर आलेल्या रत्नांची मोजदाद करणे केवळ अशक्य. परंतु इथे फक्त कलाकार रुपी रत्नांनाच महत्त्व न देता छोट्यातले छोटे काम करणाऱ्यालाही तेवढेच महत्त्व असते. तिसरी घंटा वाजवणाऱ्यापासून ते लेखक - दिग्दर्शकापर्यंत सर्वांनाच तू त्या कलाकृतीचा अविभाज्य भाग बनवतेस.

       जसं भूमी एका बीजापासून गगनचुंबी वृक्षापर्यंतच्या प्रवासाची साक्ष आणि साथ देत असते तसेच तू अनेक कलाकृतींची, अनेक कलाकारांची आणि अनेक रसिकांची ही साथ आणि साक्ष देत आली आहेस.

     अनादी कालापासून चालत आलेला तुझा प्रवास अनंत काळापर्यंत चालतच राहणार आहे. आजच्या रंगभूमी दिनानिमित्त हे कृतज्ञता पुष्प, हे रंगभूमी तुला आणि तुझे आराध्य दैवत नटरंगाला अर्पित करते.

              ।। आत्मविरोधी कुतूहलधरा

                  नमन नटवरा विस्मयकारा ।।

     

तुझीच रसिका, 

चैत्राली


- Chaitrali Tuljapurkar

No comments:

Post a Comment

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व स...