Sunday, June 12, 2022

प्रिय पुलं यांस,

 


ती. पु. ल. आजोबांना
,

 

शि.सा.न. वि. वि.

 

तुमच्या गोष्टी ऐकायला सुरुवात झाली, ती मी पाचवीत असताना. ‘चितळेमास्तर'  ही मी ऐकलेली तुमची सगळ्यात  पहिली गोष्ट. त्यानंतर तुमच्या गोष्टी ऐकण्याची चटकच लागली. निखळ, सगळ्यांना भरभरून आनंद देणारा तुमचा विनोद मनात घर करून राहिला. रोज रात्री तुमची गोष्ट ऐकल्याशिवाय मी झोपायचेच नाही. गोष्टींमुळे पु. ल. आजोबांशी ओळख झाली आणि ते अगदी माझ्या घरातलेच कधी होऊन गेले, कळलंच नाही. म्हैस, असा मी असामी, रावसाहेब, केल्याने देशाटन, मी आणि माझा शत्रूपक्ष, नवे ग्रहयोग, नारायण, पेस्तनकाका, बटाट्याची चाळ, ‘पुणेकर, मुंबईकर, की नागपूरकर' अशा अनेक गोष्टी तुमच्याकडून ऐकताना प्रसन्न वाटायचं. तुमची गोष्ट सांगण्याची शैली मनाला जिंकून घ्यायची.

इतक्या गोष्टींमध्ये तुम्ही विविधता कशी काय बरं जपलीत? याचं आजही अप्रूप वाटतं. प्रत्येक गोष्टीमध्ये नवी गंमत असते.

प्रत्येक पात्रातले बारकावे, मराठी बोलीची समज, तुमचं संपन्न असं भाषावैभव परंतु सामान्य माणसाला कळेल, आवडेल, त्याला खिळवून ठेवेल असं लिहिणं आणि बोलणं यामुळेच आजही प्रत्येक मराठी मनात तुमच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम आहे.

तुमचा साधेपणा, दानशूरपणा, सगळ्यांना आनंद देणारा स्वभाव यामुळे तुम्ही नेहमीच हवेहवेसे वाटत आले आहात. या रोजच्या धावपळीच्या जगात मनावरचा ताण हलका करणारे, चिंता, दुःख यांचा विसर पाडणारे असे तुम्ही जादूगार आहात. तुमच्या लेखनात हास्य आणि कारुण्य एकाच वेळी झळकतं. ‘अंतू बर्वा'  हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे.वास्तवाचं भान असणारे, समाजाला जागरूक करणारे, कुणाला न दुखवणारा निर्मळ विनोद करणारे लेखक खूप दुर्मिळ असतात.

सुंदर मी होणार, तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी ही तुमची गाजलेली नाटके. प्रत्येक पात्राचा बाज वेगळा. तुमची निरीक्षणशक्ती अतिशय जबरदस्त होती आणि त्यामुळेच रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्या गोष्टीचेसुद्धा तुम्ही वर्णन केलेत, की ती गोष्ट एकदम अद्भूत वाटायला लागते.

‘नाच रे मोरा या तुम्ही संगीतबद्ध केलेल्या बालगीतावर आज कित्येक पिढ्या थिरकत आहेत.

एक उत्कृष्ट शिक्षक, लेखक, नकलाकार, नट, गायक, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ता, कवी असे अनेक आयाम असलेलं तुमचं प्रभावी व्यक्तिमत्त्व.

पं. नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार म्हणजे पु. ल. देशपांडे.

अनेक पुरस्कार मिळूनही विनम्र असणारे, मोकळेपणाने वागणारे, दिलखुलास गप्पा मारणारे, पु. ल. देशपांडे.

ब्लड बँक, बाबा आमटेंच आनंदवन, पु. ल. ट्रस्ट यांद्वारे पुलंनी भरपूर समाजकार्य केलं आणि तेही त्याचा कुठेही गवगवा ना करता.

कुणालाही नाट्य संस्थेत मदत लागली तर तत्परतेने ती मदत करायला पुढे सरसावणारे पु.ल.

अशी तुमची अनेक रूपं आजवर मी वाचली, ऐकली आणि त्यातूनच हे लिहीण्याचा प्रयत्न करतेय. लहानतोंडी मोठा घास घेत आहे.

तुमचा साहित्यरुपी सहवास आम्ही रोजच अनुभवतो आहोत. तुमची आठवण रोजच येते.

तुमची कित्येक वाक्यं, उद्गार आजही आम्हाला तंतोतंत आठवतात.

“हशा हा सहजगत्या मिळायला हवा" असं तुम्ही म्हणायचात.  तुमच्या कलेने, प्रतिभेने आम्हा सर्वांना जिंकून घेतलं आणि पुलकित केलं. मराठी मनावर आजही तुम्ही अधिराज्य गाजवत आहात. आमच्या सर्वांच्या आयुष्यात तुम्ही आनंद फुलवलात आणि म्हणूनच आम्ही सर्वजण तुमचे ऋणी आहोत. आणि या ऋणातून मुक्त होण्यापेक्षा ऋणातच राहणे पसंत करतो.

अधिक काय लिहू?

तुमचीच नात,

अदिती

 

अदिती चितळे

(वादसभा सदस्य)

3 comments:

A Mindful Step Towards Shared Mindfulness

  Closing our eyes and taking a deep breath seems like a very simple activity to do, but it has a deeper connection to the mind and soul tha...