Sunday, February 27, 2022

मराठीभाषा : काल, आज, उद्या

                         मराठीभाषा : काल, आज, उद्या

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ll ”

कवी सुरेश भट यांच्या या अप्रतिम कवितेतून आपल्याला मराठी भाषेची महती जाणवते. मराठी भाषेची उत्पत्ती संस्कृत भाषेद्वारे झाली आहे. आज जगभरात सुमारे नऊ कोटी लोक मराठी भाषिक आहेत. मुळात मराठी भाषेचा व्यासंगच इतका मोठा आहे की तिच्या इतिहासापासून ते भविष्याबद्दल कथन करणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठीला अगदी अमृताची उपमा दिली आहे. यावरूनच आपल्याला मराठी भाषेच्या सुवर्ण इतिहासाची कल्पना येऊ शकते. खरेच आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत; मराठी भाषेसारखी भाषा आपली मातृभाषा आहे जिला सुमारे एक हजार वर्षांची परंपरा लाभली आहे. 

चक्रधर स्वामींनी दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषा वापरण्यास सुरुवात केली. याच मराठीला संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याने त्याकाळी अग्रस्थान मिळवून दिले. संस्कृत न कळल्यामुळे ज्ञानापासून वंचित राहिलेल्या लोकांना माय मराठीने आसरा दिला. यानंतर मराठी भाषेच्या सुवर्णकाळ खरेतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आला. त्यांनी स्वराज्यात मराठीतून व्यवहार केला आणि त्यामुळे मराठी साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मराठी भाषेचाही विस्तार झाला. याच दरम्यान समर्थ रामदास व संत तुकारामयांच्या साहित्यामुळे मराठी भाषा साहित्य समृद्ध बनली. आजही घराघरात मनाचे श्लोक, तुकारामांचे अभंग, जनाबाईंच्या ओव्या, एकनाथांची भारुडे अभिमानाने म्हणले जातात. जे साहित्य सुमारे तीनशे चारशे वर्षे जुने आहे, अशा साहित्या बद्दलचा आदर आणि सन्मान आजही प्रत्येक मराठी भाषेच्या हृदयात आहे, हेच खरे वाखाणण्याजोगे आहे.

या सुवर्णकाळातही मराठी भाषेने अगणित अग्निदिव्ये पार केली. यवन, इंग्रजांच्या आक्रमणातून मराठी भाषा तावून सुलाखून निघाली आणि त्यानंतर मराठी भाषा खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा उदयास आली. विद्वानांनी त्यांचे ज्ञान पुस्तकाच्या रुपात सर्वांपर्यंत पोहोचवले. यानंतर मराठी भाषेने अनेक विद्वान जन्माला घातले. याच दरम्यान जवळपास प्रत्येक प्रकारचे साहित्य तयार झाले. राजकीय विषयापासून ते स्त्रीवादी विषयापर्यंत, वैद्यकीय विषयांपासून ते मनोरंजक विषयापर्यंत मराठी भाषेने सर्व प्रकारच्या क्षेत्रात प्रवेश केला. मराठी भाषेद्वारे यादरम्यान प्रचंड प्रबोधन झाले. मराठी नाटके, चित्रपट, गीते यांनी स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात प्रबोधन आणि मनोरंजन या दोन्ही भूमिका अगदी चोखपणे बजावल्या. गीत रामायणासारखा आविष्कार आजही लोकांना भुरळ पाडत आहे. मराठी भाषेला आपल्या साहित्याने भूषित करणारे अगणित साहित्यिक मराठीने पाहिले. या साहित्यिकांनी मराठी भाषेवर निस्वार्थ आणि निस्सीम प्रेम केले.

याच मराठीभाषेचा दिव्य तेजस्वी वारसा आता कुठेतरी हरवत चालल्याची खंत अनेक विचारवंत प्रकट करत आहेत. परकीय आक्रमणापासून बचावलेल्या मायमराठीला मात्र आता स्वकियांकडूनच मिळणाऱ्या निराशेला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे आपले लोक परकीयांचे अंधानुकरण करत आहेत आणि दुसरीकडे 'इंग्रजाळलेल्या' जगातही आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा अनेक देश अतोनात प्रयत्न करत आहेत. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये मराठी भाषेचा क्रमांक दहावा येतो. तसेच भारतामध्ये चौथा क्रमांक आहे. यामुळे मराठी भाषा काही रातोरात लोप पावणार नाही. परंतु असे जरी असले, तरी मराठी भाषेचे संवर्धन करणे आता आवश्यक झाले आहे. भाषेचे संवर्धन म्हणजे केवळ भाषा नव्हे तर भाषेच्या अवतीभोवती असणाऱ्या बोलीभाषा, संस्कृती, म्हणी, वाक्प्रचार, व्याकरण इत्यादींचे संवर्धनही अपेक्षित आहे. या सर्व गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा, संस्कृतीद्वारे दिल्या जातात. परंतु जर हे ज्ञान जर वारसा म्हणून पुढे दिले गेले नाही तर पुढच्या पिढ्यांना या ज्ञानापासून वंचित राहावे लागेल. स्वतःच्या मातृभाषेबद्दल न्यूनगंड बाळगण्यासारखे काहीच नाही. आपल्या भाषेतून व्यवहार करणे हे भाषासंवर्धनाच्यादृष्टीने टाकलेले सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. 

मराठी भाषेची सर्जनशीलता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नवकवी, नवोदित लेखकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांना मराठी वाचनाची गोडी लावणे खूप गरजेचे आहे. मराठीमध्ये 'वाचाल तर वाचाल' अशी एक म्हण आहे. पण खरेतर वाचनामुळे केवळ वाचन करणारी व्यक्तीच नव्हे तर त्या पुस्तकातील विचार, शब्दप्रयोग या सर्वांचे जतन होते. त्यामुळे साहित्य निर्माण आणि संवर्धन याच बरोबर वाचन हे तितकेच महत्त्वाचे आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे प्रसिद्ध वक्तव्य आहे, " Learn from yesterday, live for today and hope for tomorrow. " हे वाक्य मराठी भाषेसाठी एक चपखल उदाहरण आहे. भूतकाळात मराठी भाषा उदयाला येताना, त्यानंतर तिचे जतन करताना, तिला नानाविध भाषा अलंकारांनी सजवताना, विद्वान - विचारवंत, राजे - महाराजे, सामान्य भाषिकवर्ग या सर्वांनी किती खस्ता खाल्ल्या ते आपण विसरता कामा नये. आपण सर्वांनी एकत्रितरित्या मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजच्या प्रयत्नांवरच उद्याचे भविष्य ठरणार आहे. त्यामुळे आज जर योग्य ते प्रयत्न केले नाहीत, तर उद्या कदाचित आपण मराठी भाषेचा वारसा गमावून बसू. मराठी भाषा खरेतर आपणा सर्वांसाठीच वंदनीय आहे. म्हणूनच मराठी भाषेला पुन्हा एकदा सुवर्णकाळ दिसण्यासाठी आपण सर्वांनी अगदी मनापासून खारीचा वाटा जरी उचलला तरी तिचे गतवैभव प्राप्त होईल.

~ श्रावणी श्रीनिवास आचार्य


No comments:

Post a Comment

International Day of Parliamentarism

When we hear the word ‘parliament’, the first things that cross our minds are politics, democracy, or power. As a diverse nation with an inh...