प्रिय मराठी ,
माझ्या मनातलं तुझ्याविषयीचं प्रेम नेहमीच उफाळून येत... नेहमीच तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस याची जाणीव मला होत राहते ...पण कुठेतरी असंही वाटतं की तुला योग्य तो न्याय कधीच मिळत नाही . का? अगं जन्माला आले तेव्हा पासून तुला ऐकतेय , शिकतेय , वाचतेय मी .. तूच तर शिकवलंस मला एखादी गोष्ट योग्य त्याच रित्या नाही केली तर त्यामागचा हेतू , त्याचा अर्थ बदलण्याची शक्यता असते , तुझ्यामुळेच तर आजवर मी मला वाटणाऱ्या साऱ्या गोष्टी अगदी योग्य शब्दात मांडू शकते , माझ्या तोंडून आलेल्या पहिल्या शब्दापासून ते माझ्या या वाटणारं , पटणारं शब्दांमध्ये मांडण्याच्या प्रवासात तूच तर आहेस सोबत , तूच तर प्रत्येक वेळी तुझ्या अफाट शब्द संपत्तीने मला आश्चर्यचकीत करत आली आहेस. मला रडवण्याची, हसवण्याची, घाबरवण्याची ताकद तुझ्याकडे आहे आणि तू ती तुझा हात धरणाऱ्या साऱ्यांना देतेस.
तुझं रुप प्रत्येक चार कोसांवर बदलतं पण तुझ्यातला गोडवा अबाधित राहतो यातून परिस्थिती नुसार आपल्याला बदलावं लागतंच पण आपल्यातला गोडवा , सच्चेपणा हरवू द्यायचा नसतो हे तू शिकवलयस मला .आणि या सगळ्याच्या बदल्यात मी काय करतेय ? तुझ्या माझ्यातलं अंतर वाढतंय हे दिसून सुद्धा हवे तितके प्रयत्न करत नाहीये ! तुझा धरलेला हात सोडल्यास गर्दीत हरवेन हे कळून सुद्धा कुठेतरी तुझ्या हातावरची माझी पकड सैलावतेय. पण तू .. तू अजून तशीच आहेस माझ्याकडे मायेने बघत , मला गरज भासेल तेव्हा धावून येते आहेस.
तुझी श्रीमंती किती मोठी आहे हे जाणवतं ते तुझ्या कुसुमाग्रज, शांताबाई, विं दा, केशवसुत, दुर्गा भागवत, पुलं, अशा एक ना अनेक लेकरांकडून ! त्यांनी तुझा अभिमान फक्त बळगलाच नाही तर दाही देशांमध्ये तुला पोहचवले. त्यांचं साहित्य वाचलं की तुझ्या अगदी मिठीत आहे असच वाटून जातं बघ. तुला समजून घेणं कठीण जातं काहींना पण मनापासून प्रयत्न केला की तुझी सुंदरता अगदी भारावून टाकते. यमक, अनुप्रास, दृष्टांत असे एक ना अनेक अलंकार धारण करणारी तू मुक्त असलीस तरी सुद्धा तितकीच सुंदर असतेस.
असं म्हणतात मराठी भाषा वळवाल तशी वळते. प्रमाण भाषेतील केले या शब्दाचा मी केलं असा वापर करायला लागले तेव्हाच याची जाणीव झाली होती आणि यातून तू जशी एखादी लहान गोष्ट दुर्लक्ष करून आमच्या चुका पोटात घेतेस तसच मीही असणं गरजेचं आहे हे कळायला मला १६ वर्ष गेली ! तुझ्या गौरव दिनी बाकी काही नाही पण तुझं संवर्धन करण्याचा आणि आपलं नातं अजून मजबूत करण्याचा नक्की प्रयत्न करेन असं आश्वासन देते मी तुला कारण अजून काही द्यायला माझ्याकडे काहीच नाही ..हे शब्द सुद्धा तुझेच आहेत ! आमच्यासाठी तू खरच खूप महत्वाची आहेस . तुझ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ची ही जणू संधी आहे माझ्यासाठी . तुझा उल्लेख माय मराठी असा का करतात हे आता कुठे कळू लागलयं. तुला असच मनमनातून जिवंत ठेवू फक्त तुझा आशीर्वादाचा हात डोक्यावर कायम असाच राहूदे !
तुझी लेक
मैत्रेयी मकरंद सुंकले
अप्रतिम!! खूपच सुंदर 👏👏
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमराठी शब्द सामर्थ्य खूप छान वापरल आहे, असेच लिहित रहा, माय मराठी ची कृपा तुझ्यावर राहो आणि तुझ्या हातून यापेक्षा अजुन छान लिहिले जावो हिच आमची अपेक्षा खूप खूप शुभेच्छा मैत्रेयी.
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDelete