Wednesday, July 13, 2022

गुरूच्या पलीकडील गुरू कसा जाणावा?

   किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन च ।

    दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम् ॥

      गुरुशिवाय जीवनाला अर्थ नाही हे खरेच आहे, मात्र गुरू कोणाला म्हणावं आणि गुरूचा आदर कसा करावा या दोन गोष्टी लक्षात आल्या की माझ्यामते गुरुपौर्णिमेचं महत्त्व समजायला फार वेळ लागणार नाही. अगदी लहानपणापासून आपल्या आजूबाजूला अनेकजण वावरत असताना त्यातला प्रत्येक जण काही ना काही शिकवत असतो. अगदी आईने टाकायला शिकवलेलं पहिलं पाऊल आणि बालवाडीत बाजूच्या मुलाने पेन्सिलीला शार्प कसं करायचं हे शिकवणं, तिथपासून जो प्रवास सुरु होतो तो कधीच एका टप्प्यावर येऊन थांबत नाही. प्रत्येक दिवसाला नवीन गुरू सापडत राहतो आणि या गुरुमय व्यक्तींचा आपल्या मनामध्ये एक संच होतो. केवळ याच दिवशी गुरुबद्दल आदर व्यक्त केला तरच खरी गुरुदक्षिणा असे अजिबात नाही, तर अगदी रोजच्या बोलण्यात, वागण्यात, शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत गुरुबद्दल श्रद्धा ठेवणं आणि शिष्याची मर्यादा पाळणं हे खरं गुरुतत्त्व ठरू शकेल.

      आता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकवणारे सारे जरी गुरू असले, तरी हेतू आणि साधन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कधीतरी चुकीची गोष्ट शिकवली जाते आणि हल्लीच्या काळात मुलं अश्या मित्रांना आपला जवळचा मित्र मानतात. आपण आपल्या मित्राला जरी गुरू मानायचे संस्कार देत असलो, तरी ज्या व्यक्तीचा हेतू चांगला नाही, तो गुरू असूच शकत नाही. गुरू शिष्याला पुढे नेतो, त्याला मार्गदर्शन करतो, त्याला दिशा देतो. त्याचं साधन हे विद्या असतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट शिकताना आज समोरच्याची पारख करणं गरजेचं झालेलं आहे. हे झालं गुरुबद्दल! पु.ल. म्हणतात, केवळ गुरूला पारखून उपयोग नाही तर शिष्याला सुद्धा पारखण गरजेचं आहे. भगवद्गीता ही पाच पांडवांपैकी कुणालाही सांगता आली असती, मात्र श्रीकृष्णानी ती अर्जुनालाच संबोधित केली. इथे गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याचा कस लागतो. व.पु. म्हणतात, तुमचा अनुभव हाच खरा गुरू. कारण प्रचिती आल्याशिवाय माणसाला आजवर जगणं कळलेलं नाही. या दिवसाचं जितकं अध्यात्मिक महत्व आहे तितकंच प्रत्येकाच्या आकलनाप्रमाणे गुरू-शिष्याचा आवाका आहे. 

दाविला मार्ग, खरा गुरू तोचि झाला,

ज्ञानाच्या पात्रा शिष्य अखंडी न्हाला||


सायली रानडे 

वादसभा सदस्य

No comments:

Post a Comment

To Always Be; An Ode To Shakespeare

My friend complains about this summer day. Too hot, too still. She says, “I don’t know how I’m supposed to like any of this.” I tell her, “T...