संत जनाबाई ( १२५८ - १३५० ) या तेराव्या शतकातील महान व थोर कवयित्री होत्या. त्यांचा विठ्ठलाप्रती असलेला भक्तिभाव नेहमीच सर्वांसाठी आदर्श ठरला आहे.
संत जनाबाईंचा जन्म परभणीमधील गंगाखेड येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर काही वर्षांतच त्यांची आई निधन पावली. तेव्हा त्यांचे वडील त्यांना दामाशेट यांच्याकडे पंढरपूराला घेऊन गेले. दामाशेट, म्हणजेच संत नामदेव महाराजांचे वडील, यांनी जनाबाईंना आश्रय दिला. तेथे जनाबाई घरातील सर्व कामे करू लागल्या. दामाशेट यांच्या घरी सतत अभंग, कीर्तन - जागर होत असत. त्यामुळे जनाबाईंचे मन खूप लहानपणापासूनच पांडुरंगाच्या भजन - कीर्तनामध्ये रमू लागले. संत नामदेव महाराजांचे निरूपणही त्यांना नेहमी ऐकायला मिळायचे. त्यामुळे संत नामदेव महाराजांना जनाबाईंनी त्यांचा पारमार्थिक गुरू मानले होते.
जनाबाईंनी भाव - भक्ती, बालक्रिडा, प्रल्हादचरित्र अशा अनेक विषयांवर अभंग लिहिले आहेत. जनाबाईंचे अभंग साध्या - सोप्या भाषेत असल्यामुळे सर्वसामान्यांना सहज समजतील असे आणि सर्वांच्याच हृदयाचा ठाव घेणारे असत.
जनाबाईंनी विठ्ठल - भक्तीत स्वतःला समर्पित केले होते. त्या कोणत्याच मोहपाषात अडकल्या नव्हत्या. कोणतेही काम करताना त्यांच्या मुखात सतत पांडुरंगाचेच नामस्मरण चालू असे.
एकदा गोवऱ्या थापत असताना तेथे एक स्त्री त्यांच्याशी भांडू लागली की या सर्व गोवऱ्या तिच्या आहेत. तेव्हा संत जनाबाई म्हणाल्या की, "ज्या गोवरीमधून 'विठ्ठल - विठ्ठल' असा आवाज येईल ती गोवरी माझी आणि ज्यातून येणार नाही ती तुझी. कारण गोवऱ्या थापताना मी विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते." मला असे वाटते की या प्रसंगातून जनाबाईंचा स्वतःवर आणि स्वतःच्या भक्तीवर दृढ आत्मविश्वास होता हे समजते. त्या स्त्रीसमोर त्यांनी त्यांचा खरेपणा सिद्ध केला. नामस्मरणात आणि एकनिष्ठ भक्तीमध्ये किती शक्ती असते याची ग्वाही देणारा हा प्रसंग आहे.
जनाबाईंचे अभंग ऐकताना मला नेहमी असं जाणवतं की त्यांचे अभंग हे सजग भक्ती कशी असावी, परमेश्वराशी एकरूपता कशी आणि भगवंताचे थोर आत्मज्ञान कसे अंगिकारावे हे अगदी सहज - सोप्या शब्दांत उलगडून सांगतात. त्यांच्या अभंगामध्ये इतकी आत्मीयता आणि उत्कटता आहे की ते ऐकताना आपणही परमेश्वराशी एकरूप होऊन जातो.
अशा या थोर संत कवयित्री जनाबाई सन १३५० रोजी आषाढ कृष्ण त्रयोदशीला पंढरपूर तीर्थक्षेत्री समाधीस्थ झाल्या. त्यांच्या एका काव्यरचनेची एक सुंदर ओळ अशी आहे -
"एक ना, अवघे सार । वरकड अवघड ते असार ।
नाम फुकट चोखट । नाम घेता न ये वीट ।।"
आज, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, संत जनाबाई व त्यांच्या अतुल्य भक्तीला सादर वंदन!
- चैत्राली तुळजापूरकर
वादसभा सदस्य
खूप छान!! 👌👌
ReplyDelete