Sunday, July 21, 2024

गुरु: साक्षात् परब्रह्म!

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः 

गुरुर्देवो महेश्वरः। 

गुरुः साक्षात् परब्रह्म 

तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरु म्हणजे 'मार्गदर्शक' आणि पौर्णिमा म्हणजेच 'प्रकाश'. ज्या ज्या वेळी शिष्य हा अज्ञानाच्या अंधारात असतो, त्या त्या वेळी प्रकाशाच्या दिशेने त्याला उजागर करणारा मार्ग म्हणजे गुरूचे मार्गदर्शन. या ब्रह्मांडामध्ये गुरूची व्याख्या कुठेही कोरली गेली नाही. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात खऱ्या वाटेचे किंवा मार्गाचे दर्शन घडवणारा मार्गदर्शक हा गुरू असतो. 

प्राचीन भारतापासून ते आजच्या स्वतंत्र भारतापर्यंत गुरू - शिष्याचं नातं हे आजही तेवढंच अमर आहे. याच वैशिष्ट्यामुळे गुरुपौर्णिमा भारतात वर्षानुवर्षे साजरी केली जाते. गुरूची महती प्रत्येकाच्या जीवनात महत्वाची असते म्हणूनच लहानपणापासून 'आचार्य देवो भव' ही शिकवण दिली जाते. एक मार्गदर्शक अथवा गुरू हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही प्रत्येक शिष्य श्रद्धापूर्वक साजरी करतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात जन्मापासून मिळालेलं वरदान म्हणजेच साक्षात गुरू - रूपी आई असते. आपल्या जीवनाचे संगोपन करताना संस्कार, शिकवण, उच्चविचार,सद्बुद्धी तिच्याकडून प्राप्त होत असते. आई प्रमाणेच आपल्या आयुष्यात वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र व चांगली पुस्तके आपले गुरू होतात. खरं तर गुरू मिळणे हे तर भाग्याचे लक्षण समजले जाते.

प्राचीन भारतामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी घराचा त्याग करून ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यास अशा आश्रमात जाऊन गुरूकडून ज्ञानप्राप्ती करत असत. त्या काळातील सर्वश्रेष्ठ विद्येची ठिकाणे तक्षशीला, नालंदा ही होती. भारतात प्राचीन काळापासून गुरू शिष्य परंपरा आहे. कृष्णाचे गुरू सांदिपनी, अर्जुनाचे गुरू द्रोणाचार्य, द्रोणाचार्यांचे गुरू परशुराम, चंद्रगुप्ताचे गुरू चाणक्य, स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास, अनेक भिखुंचे तथागत गौतम बुद्ध, व आजही अनेक मुलींसाठी ज्ञानसरस्वती सावित्रीबाई फुले व अलीकडच्या काळातील सचिन तेंडुलकरांचे गुरू आचरेकर सर, ही गुरू शिष्याची जोडी देखील फार लोकप्रिय आहे.

महाभारतात पांडवांचा विजय होण्यामागचे कारण म्हणजे द्रोणाचार्यांचे मार्गदर्शन. चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली मगधचा विस्तार करणारा राजा चंद्रगुप्त मौर्य, अशी कित्येक महान उदाहरणं भारत देशाच्या भूमीवर आजही अमर आहेत. 

संपूर्ण भारत देशाला लाभलेल्या या गुरु-शिष्याच्या वारश्यामुळे आज आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. अनेक प्राचीन श्लोक आज आपल्या मुखोद्गत आहेत, कारण  इतिहासात सांगितल्याप्रमाणे, श्लोक, संस्कृती,परंपरा या सगळ्याचा वारसा एका गुरूकडून शिष्याकडे पोहोचला आहे.

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!

-Ashwini Shende 

 

No comments:

Post a Comment

Polymers of Our Progress

On this auspicious occasion of World Environment Day, let’s take a moment to delve in one of the strangest “Evolutionary” headlines you coul...