आव मोठा, भाव खोटा
जनात- मनात
दुजा भाव कशासाठी
तुझ्यात माझ्यात ,
जनतेला घेऊनिया
जातो संग संग...
माणसात माणूस दिसता
तोचि पांडुरंग.....
खरंतर आषाढी एकादशी व वारी यांची सुरुवात कधी झाली? कशी झाली? याचं महत्त्व नेमकं काय? या सर्व प्रश्नांचा इतिहास खरंतर खूप मोठा आहे. पण मला वाटतं की या वरील ओळी या संदर्भात सर्वच काही व्यक्त करतात.. माणसांपासून माणूस दूर होत जाणाऱ्या आजच्या या समाजात, एखादी व्यक्ती प्रगती करताना त्याचा पाय खेचणाऱ्या आजच्या समाजात, माणुसकी हरवलेल्या आजच्या समाजात, थोडक्यात खोटे मुखवटे चढवून काळाच्या पटलावर चालणाऱ्या आजच्या याच समाजाला आषाढी एकादशी एक सुंदर उत्तर आहे असं मला वाटतं.
लाखोंच्या संख्येने जेव्हा वारकरी संप्रदाय तहान- भूक- ऊन- पाऊस- थंडी या कशाचीच परवा न करता हातात झेंडे, निशाणी घेऊन, डोक्यावर तुळस घेऊन आणि ओठी फक्त 'हरि' नामाचा जप करत कोणताच भेदभाव न करता जेव्हा आपल्या पांडुरंगाचे तेजोमय रूप पाहण्यासाठी पंढरीची वाट धरतो तेव्हा खऱ्या अर्थाने जातीधर्माचे असंख्य बंधारे आपोआप तुटतात आणि प्रेमरूपी चंद्रभागेचं पाणी पांडुरंगाच्या पायाशी जाऊन पोहोचत आणि मग 28 युगं भक्तांच्या प्रेमापोटी विटेवर उभा राहिलेला माझा पांडुरंग सुद्धा सुखावतो...!
आज या समाजात प्रत्येक क्षेत्रातच बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. स्त्रियांवर होणारे अन्याय- अत्याचार, तृतीयपंथीयांच्या हक्कांची केली जाणारी गळचेपी, जातीनिहाय केले जाणारे राजकारण, आपापल्या जातीभोवती बांधल्या जाणाऱ्या भिंती, प्राणी- पक्षी- झाडे यांच्या केल्या जाणाऱ्या कत्तली, यांसारख्या गोष्टीमुळे समाज सर्व अर्थाने ढवळून निघाला आहे. एकमेकांबद्दलची वाढत जाणारी इर्ष्या असूया या गोष्टी वाढत चालल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकोबा यांनी पसरवलेला मानवतेचा संदेश कुठे ना कुठेतरी आज संपतं आहे.पण तरीही..
कोरोनाच्या काळात संपूर्ण जग ठप्प झालं असताना, संपूर्ण जग थांबल असताना, खऱ्या अर्थाने माणूस माणसापासून लांब होता तरीही एकत्र येऊन अनेक हातांनी या काळात दिवे लावले, हातात घंटा, टाळ घेऊन 'हम सब एक है' अशी हाक दिली त्यावेळेला ज्ञानेश्वरांची मानवतेची शिकवण पाहायला मिळाली.
'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या उक्तीची आपल्याला प्रचिती आषाढी एकादशीच्या वारीतून येते. सर्व संतांनी आपल्याला सर्व धर्म समभाव हा मंत्र सांगितला आणि मग या एकादशीपासून वारीपर्यंतचा प्रवास सुरू झाला असावा. हिच वारी वर्षांनुवर्षे चालत आहे न थकता, न थांबता, अशीच युगानुयुगे चालत राहील. जी मानवतेची असेल..एकतेची असेल.. प्रेमाची असेल....!
हीच शिकवण लक्षात घेऊन समाजातले वाद- विवाद संपून प्रेमाची बीजे पेरली जातील तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला पांडुरंग हा प्रत्येकामध्ये दिसायला लागेल आणि मग ही वारी माणसापासून माणसापर्यंतची असेल..!!
-Shivam Jadhav
No comments:
Post a Comment