Sunday, June 16, 2024

बाबा!


प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक कणखर आणि तितकंच प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबा. ह्या जगात आपल्या आईनंतर आपली सर्वात जास्त काळजी करणारे तसेच आपली सर्वात जास्त काळजी घेणारे कोणी म्हणजे बाबा. कुणासाठी देणगी तर कुणासाठी वरदान असणारी प्रत्येकाच्या जीवनासाठी लाभलेली भक्कम साथ म्हणजे बाबा ! 

बाबा  आपल्याला ह्या जगाची रीत समजावून सांगत जगण्याचं  बळ देणारे बळ देतात. आपल्या व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीत आपल्या बाबांचा खूप मोठा प्रभाव असतोच. आपल्या लहान वयांत तर बाबा आपल्या सोबत असतातच पण तारूण्यात प्रवेश करतांना सुध्दा आपल्या पाठीमागे बाबा भक्कम उभे असतात. तारूण्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक असा काळ असतो जेव्हा प्रत्येकाला करिअरचे वेध लागलेले असतात. एकाच वेळी अनेकविध गोष्टी करण्याची इच्छा आणि त्याच वेळी आपल्याला जे काही करिअर करायचंय ते आपल्याला खरंच पेलेल का अशा विचारांनी आपलं मन ग्रासलं असतं आणि अशावेळी एक जण आपलं मनोबल कायम उंचावते आणि आपल्या पंखांमध्ये बळ भरण्याचं काम करते, ते असतात बाबा! 

आपल्या वडिलांचं आपल्या करिअरमध्ये फार मोठं योगदान असतं. अनेकदा आपल्या वडिलांना त्यांच्या तरूणपणातली काही स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळालेली नसते पण ती स्वप्नं ते आपल्यात बघत असतात. त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायला जे मुक्त आकाश मिळत नाही ते आकाश ते आपल्याला मिळवून देण्यासाठीच दिवसरात्र झटत असतात. प्रत्येक बाबांना त्यांच्या मुलांना करिअरमध्ये स्थिरावलेलं बघायचं असतं आणि त्यासाठी ते  त्यांच्या मुलांना एका ठराविक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित करत असतात. पण होतं काय की आपण अनेकदा इतक्या वेगळ्या स्वप्नांनी घेरलेलो असतो की आपल्याला आपल्या आवडीचं क्षेत्र सतत खुणावत असतं आणि अशावेळी आपल्याला आधार लागतो तो 'वडीलांचा'. आपल्याला अशा वेळी जी हक्काची साथ हवी असते ती बाबांची. पण अनेकदा बाबा त्यांच्या मुलांकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षांपेक्षा त्यांच्या मुलांच्या स्वप्नांना प्राधान्य देताना जेव्हा दिसतात तेव्हा त्यांचा निव्वळ अभिमान वाटून जातो. 

आपण ह्या जगातल्या काही कर्तृत्ववान लोकांकडे बघितलं तर आपल्याला त्यांच्या वडिलांचं ही योगदान दिसून येतं. जगविख्यात क्रिकेटर सचिन तेंडुलकर ह्याला अगदी लहानपणापासूनच क्रिकेट अंगी बाणवणारे आणि त्याला क्रिकेट च्या जगांत उत्तुंग भरारी घेण्याचं स्वातंत्र्य देणारे हे त्याचे वडीलच होते‌. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकवून देणारी गीता फोगट हिच्या करिअर मध्ये ही स्वतः खेळाडू असणारे तिचे वडील महावीर सिंग यांचं मोलाचं योगदान आहे. भारताच्या राजकारणात असे अनेक नेते  आहेत ज्यांच्या वडिलांकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले आहेत. अभिनय क्षेत्रात ऋतिक रोशन, सनी देओल, अभिषेक बच्चन, सोनम कपूर यासारखी अनेक उदाहरणं आहेत ज्यांना त्यांच्या बाबांकडून अभिनय क्षेत्राशी ओळख झाली आहे. कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, राजकारण करिअर साठी कुठलंही क्षेत्र निवडा पण‌ आपल्याला प्रत्येक क्षेत्रात असे तारे चमकताना दिसतात ज्यांच्या मागे त्यांचे वडील अढळपणे उभे आहेत. 

बाबा हा असा स्त्रोत आहे जो सदैव उर्जा आणि प्रेरणा देत राहतो. त्यांचा राग हा तात्पुरता पण त्यांची माया अपरंपार असते. आज आंतरराष्ट्रीय फादर्स डे दिवशी अशा कायम पाठिंबा, विश्वास आणि बळ देणाऱ्या प्रत्येक वडिलांप्रतिची माझी कृतज्ञता व्यक्त करते आणि येणाऱ्या काळात ही असेच वडील प्रत्येकाला लाभो अशी आशा व्यक्त करते‌. 

- Manali Deshpande 

No comments:

Post a Comment

Because Every Life Is Precious...

I still remember that day and it shakes me to my core till date. That evening felt heavier than usual. That day when nothing made sense. I h...