Friday, June 14, 2024

१०८ वर्ष - स्पर्धेची, साधनेची, वादसभेची!


१०८ वर्ष! आज सर परशुरामभाऊ महाविद्यालयाबरोबरच या वास्तूच्या  स्थापनेपासूनच  सुरू झालेल्या एका चळवळीला १०८ वर्ष पूर्ण झाली. आमच्या वादसभेला १०८ वर्ष पूर्ण झाली. चळवळ यासाठी कारण १९१६ साली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडता यावेत, त्यांच्या विचारांना चालना आणि योग्य दिशा मिळावी, विविध विषयांवर वाचन करून त्यावर त्यांना चिंतन करता यावे आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक व्यासपीठ मिळावे अशा काहीशा तत्त्वावर वादसभेची स्थापना झाली होती.  तेव्हापासून आज पर्यंत इतर अनेक पैलू स्वतःमध्ये सामावून घेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या प्रश्नावर सातत्याने वादसभा कृतिशील आहे, संवेदनशील आहे.
वादसभेविषयी भावनिक होऊन अनेकदा कृतज्ञता व्यक्त केली जाते, एक सदस्य किंवा वादसभेचे  सचिव म्हणून वादसभेने कळत नकळत दिलेल्या गोष्टींबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात, लिहिल्या जातात. मात्र इथलं वेगळेपण नेमकं कशात आहे, वादसभेचे सदस्य म्हणून आम्ही नेमकं काय करतो या बद्दल स्पष्ट बोललं जात नाही. मुळात वादसभेचं वेगळेपण कशात आहे याची यादी करायला घेतली तर वादसभेचे १०८ मणीरुपी पैलू समोर दिसू लागतात. आणि याच पैलूंची माळ ओढत आम्ही सगळे सदस्य वादसभेशी एकरूप होऊन जातो. आणि हेच वादसभेचं  वेगळेपण बनून जातं. 

'आम्ही शाळेत लोकमान्य टिळकांवर भाषण केलं होतं, इतरांसोबत बोलायला आवडतं, मला लेखन करायला आवडतं' या आणि अशा अनेक कारणांमुळे वादसभेचं सदस्य होण्याचे स्वप्न मनात घेऊन वादसभेत येणाऱ्या प्रत्येकाला एक ना एकदा तरी एक पायरी चढावी लागते ती म्हणजे स्पर्धांची! या स्पर्धा वक्तृत्व वाद, लेखन, काव्य, अशा अनेक प्रकारच्या असू शकतात. अर्थात इतर अनेक ठिकाणी स्पर्धांमध्ये भाग घेण्याचं प्रोत्साहन दिलं जातं! मात्र या पायरीवर पहिलं पाऊल टाकताना वादसभेमध्ये आजूबाजूला मदतीचे आणि विश्वासाचे अनेक हात पुढे आलेले असतात. स्पर्धेत मिळणारं यश म्हणजे आपण त्या स्पर्धेत सहभाग घेणं हेच आहे याची शाश्वती आधीच दिलेली असते. लेखनातून व्यक्त होणाऱ्या व्यक्तीला वक्तृत्वाची आणि आवाजातील धारेची जाणीव करून दिली जाते तर वादातून परखड मत मांडणाऱ्या व्यक्तीला इथे कवितेच्या चार ओळींमधले प्रेमही सापडून जाते. व्यासपीठावर उभं राहून परीक्षकांना आवडेल असं काही मांडण्यापेक्षा स्वतःला भावणारं आणि सत्याच्या शाईने लिहिलेलं असं काही मांडल्याने आपण स्पर्धेत अपयशी ठरलो तरी आयुष्याच्या स्पर्धेत अव्वल स्थानी पोहचतो याची शिकवण आम्हाला इथे मिळते. आपली स्पर्धा ही इतर स्पर्धकांशी नाही तर स्वतःशी आहे असं ध्येय ठेवत एक विषय तयार आहे म्हणून तोच विषय पुन्हा पुन्हा इतर स्पर्धांमध्ये न मांडता नवनवीन विषयांवरती अभ्यास करून, चर्चा करून वादसभेचे सदस्य स्पर्धांमध्ये सहभागी होतात. या स्पर्धांचा मूळ गाभा हा या स्पर्धांसाठी केल्या जाणाऱ्या साधनेत असतो. साधना म्हणावे तर यासाठी की कोणताही विषय हा एकच दृष्टिकोनातून न पाहता त्या विषयाला असणारे कंगोरे शोधून काढत त्यावर असणाऱ्या उपायांची सुद्धा मिमांसा इथे केली जाते. शब्द, विचार, शैली, मांडणी अशा एक ना अनेक बाबी लक्षात घेऊन शेवटी प्रामाणिकपणे वादसभेचे सदस्य स्पर्धांमध्ये आपले विचार, मत मांडतात. याचा सारासार विचार केला की कैक दिवसांनी लक्षात येतं की एका विषयावर ५ मिनिटे बोलण्यासाठी ५ दिवस आपण जे कष्ट घेतले, जे वाचन केले, जो विचार केला त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर अगदी सहज पडून गेला आहे.  केलेल्या साधनेचा, अभ्यासाचा एक अंश आपल्यात केव्हाचा मुरून गेला आहे. 

ही साधना वादसभेचे सदस्य फक्त  स्पर्धेपुरताच नाही तर वर्षभरात अनेक बाबतींसाठी करत असतात. विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना पुढे असणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय, कार्यक्रमाचा हेतू, योग्य नियोजन अशा अनेक गोष्टींवर निरिक्षणात्मक अभ्यास करून निर्णय घेतले जातात. १०३ वर्ष सुरू असलेला टिळक पुण्यतिथी कार्यक्रम, २१ वर्ष सुरू असलेली आणि वर्षागणिक नव्या उंची गाठणारी कै. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे वक्तृत्व स्पर्धा, वर्षभरातील अनेक छोट्या मोठ्या सभा हे सारे शक्य होते ते यासाठी केल्या जाणाऱ्या साधनेमुळे, वादसभेने दिलेल्या शिकवणीमुळे आणि वादसभेवर तिच्या सदस्यांच्या असणाऱ्या प्रेमामुळे! १०८ वर्ष जी संघटना दरवर्षी नवे सदस्य येऊन सुद्धा न मोडता कार्यरत राहू शकते त्या संघटनेची ताकद, विचारधारा, दृष्टिकोन, कार्यपद्धती यांची आजवर कोणीच नक्कल करू शकले नाही आणि बदलू सुद्धा शकले नाही याचा निश्चितच अभिमान वाटतो. 

वादसभेचे सदस्य म्हणजे तुम्ही नेहमी वाद घालता का? अशी एक टोचक बोलणी आम्हाला कायम ऐकावी लागतात.  वादसभेचे सदस्य म्हणजे आम्ही आमचं आयुष्य एक चांगलं माणूस म्हणून जगायला आणि अनुभवायला शिकतो असं उत्तर मला कायम द्यावं वाटतं. वादातून वाद वाढतो असं म्हटलं जातं पण वादसभेचे सदस्य वादातून तत्त्वबोधापाशी जातात आणि त्या बोधातून नव्या विचारांना जन्म मिळत जातो, नव्या क्षितिजांना जन्म मिळत जातो.
आज वादसभेला १०८ वर्ष पूर्ण झाली. ही चळवळ इथे थांबणारी नाही. येणारी कैक वर्ष आमच्यासारखे आणखी अनेक विद्यार्थी चांगलं माणूस होण्याच्या शोधात, एका व्यासपीठाच्या शोधात, एका कुटुंबाच्या शोधात स. प. महाविद्यालयाच्या इमारती मध्ये येत राहतील आणि वादसभा त्यांना आपलं करून घेत राहील याची खात्री वाटते एवढं नक्की!

- Maitreyee Sunkale

No comments:

Post a Comment

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व स...