Wednesday, August 18, 2021

    ऑलिंपिक मधिल दुर्लक्षित खेळांची भारताला साद

         परवा भारताला निरज चोप्राने गोल्ड मेडल मिळवून दिल्याची बातमी आली, आणि 1920 साली नॉरमन प्रिटचर्ड ने पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल खेळात भारतासाठी मिळवलेल्या पहिल्या मेडल इतकाच आनंद भारतीयांना झाल्याचे दिसले. तो क्षण आपल्या भारतीयांसाठी खूप आनंदाचा होता. पण काहीतरी राहत असल्याचे शल्य मनात आले. आज पर्यंत भारताला फक्त 10 गोल्ड मेडल मिळाली. या वर्षीही एकच गोल्ड मेडल, दोन रौप्य आणि चारच कास्यपदक मिळाली, जी बाकी देशांच्या कितीतरी पटीने कमी आहेत. असा निराशेचा सूर लागला पण निराशेचा विचार करताना जाणवलं , खरंतर आपल्या भारतात बराचसा लोकसमूह हा क्रिकेट,फुटबॉल, कबड्डी ह्यासारख्या सांघिक खेळांकडे आकर्षित झाला आहे. आज आपल्याला घराघरांत कोहली आणि पी. व्ही. सिंधू सहज दिसतात पण कमतरता जाणवते ती नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची. त्यामुळे सध्या भारताला अशा नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची गरज आहे, जे कराटे, तायक्वांदो, फेंन्सिंग, स्विमिंग, जुडो, जिम्नॅस्टिक, इक्वेस्टियन यांसारख्या दुर्लक्षित वैयक्तिक खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देतील.

       परंतु मग अशा चांगल्या परिणामांसाठी आपण आपल्या चाकोरीबद्ध जीवनातून वैयक्तिक खेळांना किती वेळ आणि महत्त्व देतो? बहुआयामी विकासाबरोबर क्रीडा क्षेत्राच्या विकासास किती प्राधान्य देऊ शकतो? ज्याप्रमाणे सरकार सांघिक खेळांना प्रोत्साहन देते त्याप्रमाणे वैयक्तिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आपली आणि सरकारची भूमिका काय असावी? शिवाय सर्व स्तरांतील खेळाडूंना अशा स्पर्धांमध्ये सामावून घेण्यासाठी काय करता येईल? अशा एक ना दोन हजारो प्रश्नांनी माझ्या मेंदूत शिरकाव केला. यंदाच्या ऑलम्पिक स्पर्धेतही आपले एकूण 127 स्पर्धक गेले होते. त्यातही इक्वेस्टियन,ट्रायथलॉन, सर्फिंग, सायकलिंग, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक अशा वैयक्तिक खेळात भारतातील फक्त एकाने आणि काही खेळात तर खेळाडू पात्रच न झाल्याने एकालाही सहभागी होता आले नाही, याचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सायना नेहवाल, दीपा करमरकर आणि हिमा दास ह्यां या वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र होऊ शकल्या नाहीत. तर काही खेळांचा विचारच केला गेला नाही. मग अशा वेळी आपण कुठे कमी पडतोय या प्रश्नाची कारणमीमांसा करताना माझ्या असे लक्षात आले की, आपल्या देशात अलीकडे आपण वैयक्तिक खेळांना महत्त्व देतोय पण ते तितके पुरेसे नाहीये. यंदा तर त्यात कोरोना आणि त्यामुळे आलेल्या अडथळ्यांची भर पडली. पण असे असले तरी भविष्यासाठी आपणांस आत्तापासूनच अनेक उपाय करणे शक्य आहे. आज भारतात जवळपास 80 टक्के कुटुंब ही मध्यमवर्गीय आहे. मग या घरातील मुलांना फेन्सिंग, तायक्वांदो, ट्रायथलॉन अशा खेळांचे साहित्य आणि प्रशिक्षण हे घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. म्हणजेच असं म्हटलं तर आता हेच पहा ना की, मनिका बत्रा, हिमा दास यांसारखे असंख्य खेळाडूं योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने किंवा आर्थिक दृष्ट्या अडचणी आल्याने पुढे जाऊ शकत. त्यामुळे अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने क्रीडा आयोग व शाळांच्या सहयोगाने उपाययोजना केल्या पाहिजेत. तसं बघता आज शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये देखील खेळांचे महत्त्व वाढू लागले आहे परंतु वैयक्तिक खेळांना प्रोत्साहन मिळत नाही. येणाऱ्या पिढीला तंत्रज्ञानाच्या जगात अद्ययावत करण्याबरोबर शारीरिक दृष्ट्या सक्षम करणेही गरजेचे आहे. त्यासाठी शाळेतूनच सांघिक खेळांबरोबर वैयक्तिक खेळांचेही प्रशिक्षण दिले पाहिजे. तसेच या स्पर्धांमधून उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबरोबर प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंनाही आर्थिक व मानसिक दृष्ट्या आधार देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते इतर गोष्टींची तमा न बाळगता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील.

‌ एकंदरीतच बदलत्या काळानुसार आपण खेळांकडे छंद आणि व्यवसाय म्हणून बघण्यापेक्षा क्रीडा संस्कृती आणि त्याचे जतन करणे या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. आपल्याकडे क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी लागणाऱ्या साधनांची आणि सुविधांची कमतरता नाही परंतु कमतरता आहे ती त्याच्या योग्य अंमलबजावणीची. त्यामुळे हे शक्य झाले तर पर्यायाने आपल्या भारताच्या क्रीडा संस्कृतीचे जतन होईल आणि ऑलिम्पिक खेळात आपला सहभाग आणि पदकांची संख्या यात निश्चितच वाढ होईल. शेवटी मला असे लिहावेसे वाटते की,

‌अभ्यासासम क्रीडेस महत्त्व जेथे, 

मन, मेंदू, मनगटे सक्षम तेथे, 

खेळ-खेळाडूंचा सन्मान ज्यांच्या दृष्टिकोनाशी, 

बलवान राष्ट्र म्हणावे त्यांसी!

 

 - आकांक्षा दिपक जावडेकर

5 comments:

  1. शतप्रतिशत बरोबर
    आत्ताची युवापिढी ही मैदानी खेळापासून खुपचं दुर चालली आहे , मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळायला हवं

    ReplyDelete

Because Every Life Is Precious...

I still remember that day and it shakes me to my core till date. That evening felt heavier than usual. That day when nothing made sense. I h...