Wednesday, August 25, 2021

                प्रश्न पदकांच्या गणतीचा नाही,

              भारतीयांच्या मानसिकतेचा आहे!

 आजपर्यंतच्या भारताच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला, तर प्रत्येक विकासबिंदू 'मानसिकता' या अडथळ्यावर आदळताना दिसतो. आपल्या भारत देशाने नुकतेच 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्याची पंचाहत्तरावी पहाट पाहिली. स्वातंत्र्यपूर्व भारत आणि आजचा भारत यांच्यात खरोखरच जमीन-अस्मानाचा फरक आहे. मात्र तरीही बहरलेल्या वृक्षावर असलेली कीड जशी वृक्षाचा विकास खुंटवते, तसेच भारताच्या बहरत चाललेल्या क्रीडाक्षेत्राला संकुचित मानसिकतेची कीड मागे खेचत आहे. ऑलिम्पिक स्पर्धांचा थोडक्यात इतिहास असा की सुरुवातीला ग्रीसमधील 'ऑलिम्पिया' या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन केले जायचे. कालांतराने ग्रीसच्या ऱ्हासाबरोबर या स्पर्धा बंद पडल्या. मात्र, त्यानंतर फ्रेंच क्रीडापटू 'बॅरन क्यूबर्टीन' यांनी स्पर्धा सुरू केल्या व त्यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली. आज या स्पर्धेत दोनशेहून अधिक देश सहभाग घेतात. हल्लीच टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने एक सुवर्णपदक, तर दोन रौप्य व चार कांस्य पदक मिळवीत यश संपादन केले आहे. यासाठी अनेक भारतीयांनी कौतुक व्यक्त केले असले तरी दुसरीकडे अनेकांनी 'क्रीडा क्षेत्रात अजूनही तितकीशी प्रगती झाली नाही', 'पदकांची संख्या फारच कमी आहे', 'भारतातील खेळाडू पदके मिळवण्यात मागे राहत आहेत' अशा टीका केल्या. त्यांचे असे म्हणणे अगदीच चुकीचे नाही. मात्र, क्रीडा क्षेत्र विकसित करायचे असेल, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये यश संपादन करायचे असेल तर जनता व सरकार दोघांनीही आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. भारत हा अजूनही विकसनशील देश म्हणून गणला जातो. अजूनही भारताचे लक्ष पायाभूत सुविधांकडेच आहे. जनतेच्या आर्थिक स्थितीचा विचार केला तर अजूनही 'खेळ' आपल्याला 'कीर्ती व पैसा' मिळवून देईल हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झालेला नाही. आपल्या भारतामध्ये युवापिढीला असलेले क्रिकेटचे वेड जगजाहीरच आहे आणि यात काही वावगे असण्याचे कारणही नाही. परंतु, क्रिकेटसोबत अजून अनेक खेळ आहेत ज्याबद्दल तितकीशी जागृती झालेली नाही.  

मागच्या दहा वर्षांमध्ये वळून पाहिले तर सांघिक खेळांसोबत आता टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, भालाफेक यांसारखे वैयक्तिक खेळ आपले स्थान निर्माण करत आहेत. मात्र, यापलीकडे व्हॉलीबॉल, तायक्वांदो, रग्बी, धनुर्विद्या यांसारखे अनेक खेळ आहेत ज्यामध्ये भारताला यश संपादन करता आलेले नाही. यासाठी अनेक कारणे आहेत. सद्य परिस्थितीचा विचार केला तर 'कोरोना'चे सावट क्रीडाक्षेत्रावर सुद्धा पडले आहे. यावर्षी अनेक खेळाडूंना कित्येक स्पर्धा तसेच ट्रेनींग्सना मुकावे लागले. मात्र हे यावर्षीचे झाले, परंतु याहीव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्राला आपण करिअर म्हणून किती गंभीरपणे पाहतो, आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या खेळांमध्ये भविष्य घडवण्यासाठी किती प्रोत्साहन देतो तसेच सरकार भारतीय खेळाडूंसाठी काय आणि कशी व्यवस्था करते, ह्या सर्वच गोष्टी विचार करायला भाग पडणाऱ्या आहेत. कितीही नाकारले तरी खेळाडूंकडे होणारे दुर्लक्ष, अपुरा निधी, भ्रष्टाचार, क्रीडासामग्रीचा अभाव या गोष्टी अजूनही भारतामध्ये क्रीडा क्षेत्रातील उज्वल भविष्याला बाधा आणत आहेत. सांघिक खेळांना येणारा खर्च जास्त असतो. मात्र, अशावेळी 'स्पॉन्सरशीप' चा मुद्दा डोके वर काढतो. भ्रष्टाचारामुळे नवीन व प्रतिभावान चेहरे समोरच येत नाही आणि मग उत्कृष्ट खेळणारा खेळाडू सुद्धा प्रसिद्धीपासून मागे राहतो. स्त्री-पुरुष यांना मिळणारे मानधन यामध्ये सुद्धा बरीच तफावत आढळते. तसेच अनेकदा स्त्री खेळाडूंना लैंगिक शोषण, मानसिक छळ सहन करावा लागतो. यामुळे स्त्री वर्गाची क्रीडा क्षेत्रातील संख्या कमी दिसते. एक भारतीय खेळाडू एखाद्या लहान गावातून त्याच्यामध्ये असलेल्या प्रतिभेमुळे आपली ओळख निर्माण करतो, तोपर्यंत त्या गावामध्ये ना विकास झालेला असतो ना पुरेश्या जगण्याच्या सोयी. अर्थातच, क्रीडाक्षेत्रासंबंधी जागृती असणे फारच दूरची गोष्ट आहे. आपल्याच देशातील काही लोक उठून जेव्हा स्त्रियांना बंधने घालू पाहतात, तेव्हा लाखांतील एक 'हमारी छोरिया छोरोंसे कम नहीं' असं म्हणतो. सध्या अनेक खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक्स येत आहेत. त्यातूनही कुठे ना कुठे समाजाची क्रीडाक्षेत्राबद्दल असलेली संकुचित वृत्ती दिसते. मात्र, सगळाच समाज असा नसतो हेही तितकंच खरं!

 एकंदरीत पाहिलं, तर माझा मुलगा किव्वा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर व्हावी, परंतु एक खेळाडू नको असंच बहुतेकांना वाटतं आणि ते गैरही नाही. कारण भारतात 'स्पोर्ट्स' मध्ये करिअर तेव्हाच घडतं, जेव्हा खेळाडूला स्वतःची ओळख निर्माण करता येते. प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट असेल, असं नक्कीच असणार नाही आणि अशांसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होणं जास्त गरजेचं आहे. आपल्या भारतामध्ये शाळा-कॉलेजांमध्ये खेळाच्या तासाला महत्व कमी दिलं जात असेल आणि असं असतानाही देशाला जास्त पदकांची अपेक्षा असेल, तर या चित्रांमध्ये खूपच विसंगती आहे. अनेक खेळाडू जेव्हा सुरुवातीला स्पर्धा-प्रशिक्षणे करतात, तेव्हा बऱ्याचदा इतका खर्च करण्याची त्यांची आर्थिक स्थिती नसते. अशावेळी त्यांना वेळेवर अनुदान मिळते का आणि हे अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. समाजामध्ये अजूनही शिक्षण व क्रीडा यामध्ये क्रीडाक्षेत्राला शेवटचे स्थान मिळते, किंबहूना मिळतच नाही. परंतु जेव्हा भारतीय संघाचा सामना टीव्हीवर लागतो, तेव्हा आणि त्या वेळेपुरताच आपल्यातला खेळाडू आणि समर्थक जागा होतो. ही परिस्थिती हळूहळू का होईना परंतु बदलणे गरजेचे आहे. जनता व सरकार दोघांनीही मानसिकता बदलायला हवी. क्रीडाक्षेत्र हा देखील करिअरचा उत्तम मार्ग आहे, हे पालकांनी व मुलांनी लक्षात घ्यायला हवे आणि सरकारनेही क्रीडाक्षेत्र अजून कसे विकसित होईल याकडे लक्ष द्यायला हवे! 

- सायली निलकंठ रानडे

6 comments:

  1. खूपच छान!!!...योग्य बाबी निदर्शनास आणून दिल्यास!!!....प्रत्येकाने वाचाव असं!!!!!...पुढील लेखासाठी आभाळभर शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. 👌👌 खूप चांगल्या पदधतीने माहिती दिली आहे. मस्त.....👌👌

    ReplyDelete
  3. वास्तव दर्शवले आहे. छान!

    ReplyDelete
  4. छान लेख!
    खेळातील सहभाग आणि प्राविण्य जोपासले पाहिजे
    पुढील लेखनास शुभेच्छा!

    ReplyDelete

International Day of Parliamentarism

When we hear the word ‘parliament’, the first things that cross our minds are politics, democracy, or power. As a diverse nation with an inh...