शिक्षक!
परिकथेच्या विश्वात वावरणारं ते निरागस मन
हुरहूर, भीती अन् उत्सुकतेने भरून
'शाळा' नवाच्या खऱ्याखुऱ्या 'Wonderland' मध्ये पोचतं
अन् तिथेच मग ते पहिल्यांदा
'शिक्षक' नावाच्या Angel ला भेटतं!
खरंच, दिसत नाही त्यांची जादूची छडी
पण आधी नको वाटणार्या शाळेची
तेच लावतात नकळत गोडी!
त्यांचं चालणं, बोलणं, हसणं, रागावणं
सगळंच 'जगात भारी' वाटतं!
अन् आईवडिलांचं एखादं म्हणणं,
त्यांच्या तोंडून पटकन पटतं!!
नंतरच्या त्या टप्प्यावर
थोडी समज येऊ लागते,
अन् गुरूजनांमधली 'माऊली'
हळूहळू उलगडत जाते!
कधी आदरयुक्त धाकामुळे, कधी कौतुकाच्या आशेने
त्यांची शिकवण अमलात येते
घडत जातात अबोध मनं,
आयुष्याला दिशा मिळते!
बावरलेल्यांना पंखाखाली घेऊन,
कधीकधी तर मित्रही होऊन
ते समजून घेतात, समजावून सांगतात
अन् मुग्ध मनांतला सारा गुंता
चुटकीसरशी सोडवून टाकतात!
आपल्या शब्दांतून, वागण्यातून तर कधी
नुसत्या कटाक्षातूनही
खूप काही शिकवून जाणारं
'शिक्षक' हे अजब रसायन असतं
आणि म्हणूनच...
जीवनातील अनेक "का?" चं
"माझे टीचर म्हणतात म्हणून!" हे उत्तर
मला तरी खरोखर valid वाटतं
मला तरी खरोखर valid वाटतं!!
~समृद्धी भालवणकर
सुंदर✨
ReplyDeleteहृदयस्पर्शी👌
ReplyDelete