Saturday, May 9, 2020

विचारांवर विचार करताना



परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपण काय करतो? डोक्यात विचारचक्र सुरू होते. हा प्रश्न आपण वाचला होता का? कोणासोबत त्यावर बोललो होतो का? या प्रश्नाचे संदर्भ कशासोबत जुळतात? आपण तो प्रश्न लिहायला घेतो आणि उत्तराला समर्पक असे मनाचेही काही ठोकून देतो. बघता बघता उत्तर पूर्ण होते आणि स्वतःला शाबासकी देत आपण बाहेर पडतो. आता आठवतच नसलेल्या प्रश्नावर मेंदू विचार कसा तयार करतो याचा काही आपण विचार करत नाही.

"विचार करून सांगतो","विचार करावा लागेल", अशी विधानं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो मात्र ही विचारक्षमता कशी विकसित झाली किंबहुना का विकसित झाली यामागे हजारो वर्षांचा रंजक आणि थरारक इतिहास आहे! या इतिहासाचा आढावा घेणारा प्रस्तुत लेख.

मानववंशशास्त्र ही इतिहासाचा अभ्यास करणारी एक शाखा. एका विशिष्ट वेळी काहीतरी जादू घडून मग माणूस विचार करू लागला असं अजिबातच नाही.  आदिम काळी माणसाजवळ भय आणि भूक या दोनच जाणिवा होत्या.मात्र नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे माणसाचा बौद्धिक विकास झाला?विज्ञानाकडे अजूनही या प्रश्नाचे उत्तर नाही!

उत्खननामध्ये सुमारे दीड लाख वर्षांपूर्वीची भित्तिचित्रे, प्रतिके आणि भौमितिक आकृत्या सापडतात.म्हणजे त्यावेळी माणसाला विचार करता येत होता असे गृहीत धरता येईल.आपल्याला काहितरी कळलंय ते इतरांनाही सांगावं असं वाटल्याने त्याने चित्राचा, आकृत्यांचा आधार घेतला असावा.विचारक्षमता उत्क्रांत होण्यात या चित्रांचा महत्वपुर्ण वाटा आहे.
विचारशक्ती विकसित होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भाषा.पण ही भाषा नेमकी कशी तयार झाली यावरूनही कित्येक वर्षांपासून वादविवाद सुरू आहेत. इतिहासतज्ञ युवाल नोआह हारारी लिखित 'सेपीएनस'(Sapiens) हे अफलातून पुस्तक वाचनात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार भाषा विकसित होण्याचे कारण की, प्रत्येक वस्तू आणि विषयाला विशिष्ट पद्धतीने ओळखण्याची मानवी क्षमता. या प्रचंड लवचिकतेमुळे आपण भाषेला आत्मसात करू शकलो. प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे आवाज ही एकमेव ढोबळ क्षमता होती. मात्र मनुष्यप्राण्याकडे असलेल्या मेंदूच्या विकसनशील क्षमतेमुळे माहिती अथवा संदेश अतिशय नेमक्या पध्दतीने सांगता येऊ लागले.
विचार ज्या महत्वपूर्ण घटकामुळे शक्य होतात तो घटक म्हणजे स्मृती किंवा आठवणी.'माणूस कशावर जगतो' या प्रश्नाला 'आठवणींवर जगतो' असे मोघम उत्तर दिले जाते ते अंशतः खरे आहे!एवढंच नाही तर एखादी घटना भूतकाळात ज्या क्रमाने घडली त्याच क्रमाने परत आठवणे आणि त्यानुसार आपल्या हालचाली नियंत्रित करण्यामुळे माणूस शिकार,संरक्षण आणि नियोजनात प्राण्यांपेक्षा उजवा ठरला.

या स्मृती इतकंच महत्वपूर्ण असं काही माणसाच्या ठायी होतं ते म्हणजे नसलेल्या गोष्टींची कल्पना करता येणं ही विलक्षण शक्ती.हरारी म्हणतात त्याप्रमाणे, आपण एखाद्या माकडाला 'तू आत्ता या केळाचा त्याग केला तर तुला स्वर्गात खूप केळं मिळतील' हे कधीच पटवून देऊ शकत नाही.दंतकथा, मिथके सांगणं हे माणसाचे कसब,यामुळे माणूस एका अंमलाखाली आला,त्यांची एकी वाढली.(परीक्षेत मनाने उत्तरे ठोकताना ही कल्पनाशक्ती फार जोरावर असते म्हणतात!)मात्र या क्षमता माणसाला कशा प्राप्त झाल्या त्याहीपेक्षा का प्राप्त झाल्या हा एक न सुटलेला आणि उत्कंठावर्धक प्रश्न आहे.

मग अचानक या विचारावर मी का लिहितोय ते आता स्पष्ट करतो.
माणूस हा अजूनही पूर्णपणे उत्क्रांत झालेला नाही. आपली नवनवीन प्रारूपं(versions)येतच आहेत.आपण बऱ्याचदा म्हणतो की 'आपण लहानपणी किती वेडपट होतो, तांत्रिक आणि तत्सम गोष्टी आपल्या लक्षात यायच्या नाहीत आणि आजकालची लहान मुलं खूपच हुशार असतात.' ही एक बौद्धिक उत्क्रांतीच आहे.कधीकाळी फक्त दगडी हत्यारांवर विसंबून असलेला मनुष्यप्राण्याचे जग आज चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे.मानवी पेशींतील जनुकीय बदल हे चौथ्या औद्योगिक क्रांतीचे उद्दिष्ट आहे.आज विज्ञानाला उच्चकोटी मानव(superhuman) तयार करणं अशक्य आहे असं नाही.मात्र नैतिक आणि राजकीय कारणं नेहमीच आड येत राहिली. हे सगळं शक्य झाले ते विचारांनी.

माणूस विचार करतो म्हणजे काय करतो?तर ज्ञात असणाऱ्या आणि डोळ्यांना दिसणाऱ्या माहितीचे तुलनात्मक विश्लेषण करणं म्हणजे विचार.
माणसाचं सबंध जीवनच विचार या गोष्टीने नियंत्रित होतं, मग आपल्याला जर वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर अनेक ठोकताळे बांधता येतील. मानवी मेंदू कसा आणि कुठल्या कालखंडात विकसित झाला हे कळले तर आपण आज उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर आहोत हे समजेल.मानवी उत्क्रांती,मानवी स्वभाव,जनुकीय बदल इतकेच नव्हे तर येऊ घातलेली पिढी,तेव्हाचे पर्यावरण,संस्कृती आणि भविष्य वर्तवणे देखील शक्य होईल.ज्यास आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ ज्ञात असतो त्यास परमेश्वर म्हणतात.मनुष्य त्याच मार्गाने जाऊ पाहतोय. मात्र या सगळ्याचा शेवट काय असेल? मला वाटतं,तो शेवटच आपली वाट पहात असावा!

आदित्य जवळकर ,
तृतीयवर्ष कला (अर्थशास्त्र)

संदर्भ:
 Sapiens- Yuval Noah Harari

उत्क्रांतीचा रहस्यभेद -Mohan Madwanna

6 comments:

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व स...