Friday, May 1, 2020

वाद

'वाद' ही एक विद्या आहे.
तत्त्वाचे स्वरूप निश्चित करण्याची विद्या म्हणजे वाद होय. वादविद्या कशी निर्माण झाली व तिचे प्रयोजन काय ?
प्रतिप्रश्न हेच वादाचे उत्पत्तीस्थान होय. सिद्धांतावर तर्कशुद्ध प्रतिप्रश्न केला गेल्यानंतर सिद्धांत मांडणाऱ्याने प्रश्नांचे निराकरण करणे व त्यामुळे झालेली चर्चा यातूनच वादाची निर्मिती झाली.
सत्याचा शोध व तत्त्वबोध हेच वादविद्येचे प्रयोजन होय.
अनुकूल आणि प्रतिकूल विचार झाल्याशिवाय सत्याचा बोध होणे शक्य नसते. कित्येकदा असत्य हे सत्याबरोबर बेमालूमपणे मिसळलेले असते. यातील सत्य जाणून घेण्यासाठी प्रतिकूल बाजू समजून घेणे गरजेचे असते. एखादा सिद्धांत बिनबुडाचा आहे की तर्कशुद्ध आहे यासाठी वाद आवश्यक ठरतो. वादामध्ये प्रमाणाधिष्ठीत, तर्कशुद्ध, बुद्धीनिष्ठ चिकित्सा अपेक्षित असते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तत्त्वबोधाच्या इच्छेने होणारी चर्चा म्हणजेच वाद होय.

सर्व विद्यांची तपासणी वादाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे वादाचे अनन्यसाधारण महत्व आजही टिकून आहे. त्याचबरोबर वादविवाद करण्यासाठी समग्र ज्ञान असणे तितकेच गरजेचे आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये वादातूनच सत्य आणि तत्वांचा बोध होत असतो म्हणून वादविद्या ही बौद्धिक संस्कृतीच्या विकासाचे लक्षण आहे.

आपण रोजच्या जीवनात काही वाद चालू असेल तर त्याला पटकन निरर्थक ठरवून मोकळे होतो पण प्रत्यक्षात जो निरर्थक असतो तो वाद असूच शकत नाही. कोणत्याही चर्चेला अथवा भांडणाला 'वाद' तेव्हाच म्हणता येऊ शकते जेव्हा त्यातून सत्य आणि तत्त्वाचा बोध होतो. त्यामुळे कोणतीही चर्चा अथवा भांडण संपल्यानंतरच याचा निर्णय करता येतो की झालेली चर्चा हा वाद होता अथवा नाही.

'वादे वादे जायते तत्त्वबोधः ।' हे वादसभेचे ब्रीदवाक्य आहे त्याच्या स्पष्टीकरणातून वाद स्पष्ट होतो. वादे हा शब्द दोन वेळा वापरण्याचे कारण नित्यता दर्शविणे. सातत्याने विविध विषयांवर नियमित वाद केल्याने तत्त्वबोध व सत्याची प्राप्ती होते.
                                           
- आमोद माधव केळकर, TYBA

2 comments:

  1. खूप छान 👌👌 हा लेख वाचून 'वाद' ही संकल्पना अधिक सुस्पष्ट झाली!

    ReplyDelete
  2. खूप छान. वाद! हा का महत्वाचा आहे, हे अतिशय विस्तृतपणे समजाऊन सांगितले आहे...

    ReplyDelete

Polymers of Our Progress

On this auspicious occasion of World Environment Day, let’s take a moment to delve in one of the strangest “Evolutionary” headlines you coul...