Friday, May 15, 2020

कविता

घरी बसल्याचे फायदे काय असं विचारता तुम्ही,
सांगा पाहू या आधीची केव्हा पाहिलेलीत चिमणी?
कावळा आणि कबूतर एवढेच पक्षी दिसतात आजकाल पोरांना,
कोरोनाच्या कृपेने आलेत धनेश आणि हळद्या आपल्या भेटीला.
रोगाच्या भीतीपोटी कित्येक व्यवसाय - धंदे पडले बंद,
चैत्र लागताच झालेत शिंपी, खाटीक आणि तांबट घरटे बनवण्यात दंग.
मानव आणि निसर्गातले थांबते जेव्हा घर्षण,
तेव्हा देतो पंचरंगी तांबट पर्णराजीतून दर्शन.

लहानग्या पाखरांची अंडी पळवण्याचा उचललाय भारद्वाजने विडा,
दुभंगलेल्या शेपटीचा कोतवाल त्याला शिकवत असतो धडा.
डौलदार तुऱ्याचा स्वर्गीय नर्तक जरा पहा,
Dj चा गाण्यापेक्षा दयाळाची शिळ ऐका.

वसंताची चाहूल लागताच ' कोकीळ ' ला कंठ फुटतो,
पिवळा धमक सुगरण तिच्यासाठी खोपा विणू लागतो.
इवल्याशा वेड्या राघुच्या पाहा तरी अदा,
संचारबंदी संपल्यावर सुद्धा होऊ आपण निसर्गाला फिदा.
मानवी हव्यासापायी होते यांच्या जगण्याची नाकेबंदी,
जगण्यावर हक्क त्यांचा सुद्धा, करुदे त्यांना मुक्त आभाळात भ्रमंती
                                     - प्राजक्ता मिलिंद पेंडसे
                                       प्रथमवर्ष कला

No comments:

Post a Comment

शब्द म्हणजे काय असतं?

  शब्द – हा संवादाचा पाया, विचारांचा दरवाजा आणि भावनांचा सेतू आहे. माणसाच्या जगण्यात जे काही घडलं, ते शब्दांतूनच व्यक्त झालं. ज्ञान, संस्कार...