आपले स्वप्न, रंगभूमीवर साकार करण्याची जिद्द बाळगतो; तो एक किमयागार! एक मोठे ध्येय रंगीत पडद्यावर साकार होण्याच्या आधी ते रुजले जाते त्या किमयागाराच्या स्वप्नात, मनात आणि विचारात. अशाच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणारे आणि मराठी नाट्यसृष्टीला व्यावसायिक स्तरावर नेऊन ठेवणारे मराठी रंगभूमीचे जनक म्हणजेच विष्णुदास अमृत भावे.
१८० वर्षांहून अधिक काळ मराठी नाटकांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या महाराष्ट्राला नाट्यवेडा करणारा हा प्रवास सुरू झाला; जेव्हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या 'भावे वाडा' येथे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या दरबारात कार्यरत असणारे अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी बहिणाबाई फडके यांच्या घरी ९ ऑगस्ट १८१८ रोजी एक कलाप्रेमी अवलिया जन्माला आला. ज्याचं नाव होतं विष्णुदास!
सांगलीतील हे भावे घराणं विद्वानांनी समृद्ध होतं. विष्णुदासांचे वडील व ज्येष्ठ बंधू हे पटवर्धन रावांच्या दरबारात कार्यरत होते. तर, त्यांची आई एक उत्तम आयुर्वेदतज्ज्ञ होती. विष्णुदास भावे हे देखील अतिशय बुद्धिमान आणि विचारी होते. घरी शिस्तबद्ध आणि विचारशील वातावरण असूनही त्यांचे मन कला आणि सर्जनशील विचारात रममाण होत असे.
बाल्यावस्थेपासूनच त्यांना संगीत, अभिनय, लोककला यांबद्दल शास्त्रशुद्ध माहिती घ्यायची असोशी होती. लहानपणी बाहुल्यांसोबत खेळण्याच्या वयात, त्यांना स्वतः लाकडी बाहुल्या बनवण्याचा नाद होता. लाकडाला ठोकून आकार देण्यापासून, ते त्याच्यावर रेखीव नक्षीकाम करण्यापर्यंत ते त्यात तल्लीन होऊन जात. याच लाकडी बाहुल्या बनवताना त्यांनी एक स्वप्न पाहिले. ते स्वप्न म्हणजे याच लाकडी बाहुल्यांना घेऊन सीता स्वयंवराचा खेळ करायचं. इतक्या लहान वयात सजीव कलाकारांशिवाय, निर्जीव बाहुल्यांमध्ये जीव फुंकून एक कलाकृती उभारण्याचं हे अभूतपूर्व स्वप्न. कोवळ्या वयात त्यांच्यात दडलेल्या सदृश दिग्दर्शकाची एक झलकच होती!
विष्णुदासांच्या या कल्पनेला कलाटणी मिळाली ती चिंतामणराव पटवर्धनांनी दिलेल्या एका आदेशावरून. १८४२ - ४३ साली कर्नाटकातील सुप्रसिद्ध 'भागवत नाटक मंडळी' सांगली येथे आली होती. त्यांच्या नाटकाचे प्रयोग राजांना रंजक वाटले. आपल्या दरबारात कार्यरत असणाऱ्या अमृतराव भावेंचे सुपुत्र विष्णुदास भावे यांचे नाट्यवेड पाहता, पटवर्धन राजेसाहेबांनी या नाट्यप्रेमाला प्रोत्साहन द्यायचे ठरवले आणि असाच एक नाट्यप्रयोग मराठीतून सादर करण्याची आज्ञा दिली. विष्णुदास भावेंसाठी ही संधी जणू पर्वणीच होती!
अशाप्रकारे १८४३ साली अनेक कलाकारांच्या सहाय्याने 'सांगलीकर' नाटक मंडळी' ची स्थापना करण्यात आली. या नाट्यमंडळी अंतर्गत विष्णुदास भावेंनी मराठी रंगभूमीवर १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले - वहिले मराठी नाटक सादर केले; ज्याचे लोकांनी खूप कौतुक केले. या प्रयोगासाठी लागणारे अर्थसहाय्य चिंतामणराव पटवर्धनांकडून लाभले. परंतु, १८५१ साली चिंतामणरावांचे निधन झाले आणि राजवाड्यातून येणारी आर्थिक मदत स्थगित झाली.
भाव्यांवर अवकळा पसरली; असे असले तरीही त्यांनी माघार घेतली नाही. उलट, याला आव्हान म्हणून सामोरे जात दुप्पट जिद्दीने नाट्यसृष्टीचा विस्तार करायचे ठरवले.
अर्थासहाय्यासाठी भावे मुंबईत आले. आणि १८५३ साली त्यांनी मुंबई येथील प्रसिद्ध ग्रँड रोड थिएटर येथे रीतसर तिकीट लावून राजा गोपीचंद और जालंदर या पहिल्या व्यावसायिक हिंदी नाटकाचा प्रयोग केला. अशा तर्हेने त्यांनी फक्त मराठी नव्हे, तर हिंदी नाट्यसृष्टीलाही समृद्ध केलं. या नाट्यप्रयोगामुळे लोकं रंगभूमीकडे वळायला लागले. सीता स्वयंवर नंतर त्यांनी 'इंद्रजीत वध', 'दशरथ विवाह', 'नृसिंह अवतार'; अशी अनेक दिग्गज नाटकं रंगमंचावर आणली आणि ही देखील तुफान गाजली. त्यांची नाटकं इतकी गाजण्याचं प्रमुख कारण कदाचित त्यांची नाविन्यपूर्ण धाटणी, संगीताचा सुरेख वापर आणि जिव्हाळ्याच्या विषयांची निवड हे असावं.
भावेंची नाटकं ही गद्य आणि पद्य स्वरूपात असायची. सूत्रधाराकडून मंगलाचरण, वनचरी वेश असलेला विदूषक, गणेशस्तवन, सरस्वती स्तवन आणि नाट्यारंभ या स्वरूपात त्यांच्या नाटकांची आखणी असायची. लहानपणी त्यांना असलेली संगीताची आवड त्यांनी नाटक लिहिताना जोपासली आणि नाटकाला थोडेसे पद्याचे स्वरूपही दिले. आजही अनेक नाटककार विष्णुदासी नाटकांचा साचा आणि पदे यांचे अनुकरण करत नाटकं प्रस्तुत करतात.
केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी नाट्यसृष्टीला ही लाभलेल्या त्यांच्या या योगदानामुळे त्यांना मराठी नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून संबोधण्यात येते व त्यांच्या स्मरणार्थ आजही जाणकार व अभ्यासू रंगकर्मींना विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविण्यात येते.
-आर्यन पाध्ये

No comments:
Post a Comment