Friday, August 28, 2026

स्व. प्रा. यास्मिन शेख : मराठी भाषेच्या भाषायोगिनी


 

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा प्राण आहे. पण या भाषेचे व्याकरण, तिचे शुद्धलेखन आणि तिची नेमकी रचना अभ्यासपूर्णरीत्या जपण्याचे काम काही मोजक्याच विदुषींनी केले. त्यातलेच एक आदराचे नाव म्हणजे ‘भाषायोगिनी’ प्रा. यास्मिन शेख. संपूर्ण आयुष्य मराठी भाषेची अखंड सेवा करून २४ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कोण होत्या त्या...? तर एक अत्यंत आदराचे आणि प्रगल्भ नाव म्हणजे प्रा. यास्मिन शेख.

ज्यू पार्श्वभूमीतून येऊनही मराठी भाषेवर अगाध प्रेम करणारी आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा पोत लिलया समजून सांगणारी ही व्यक्ती म्हणजे मराठी भाषेची एक निष्ठावान ‘साधक’ होती. त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि भाषेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा एक मागोवा...

प्रा. यास्मिन शेख यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘जेरुषा रुबेन’ असे होते. १९५० मध्ये त्यांचा विवाह अझीझ अहमद इब्राहिम शेख (डॅडी शेख) यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांनी ‘यास्मिन शेख’ हे नाव स्वीकारले. वैवाहिक आयुष्यासोबतच त्यांनी आपली शिक्षणाची आणि साहित्याची आवड जोपासली.

यास्मिन शेख या पुण्याच्या प्रतिष्ठित सर परशुरामभाऊ (एस. पी.) महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी होत्या. येथून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. श्री. म. माटे हे त्यांचे गुरु होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा यास्मिन शेख यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव पडला.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी केवळ नोकरी न करता, आयुष्यभरासाठी ज्ञानदानाचे तप स्वीकारले. तब्बल ३४ वर्षे त्यांनी अनेक पिढ्यांना मराठी भाषा शिकवली. मुंबईच्या गजबजाटातही मराठीचा दीप तेवत ठेवणाऱ्या एसआयईएस (SIES) महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी सहा वर्षे त्यांनी केवळ जबाबदारी सांभाळली नाही, तर मातृत्वाच्या भावनेने तो विभाग जोपासला. त्यानंतर SIAC, मुंबई येथे तब्बल दहा वर्षे त्यांनी देशाची सूत्रे हाती घेणाऱ्या प्रशासकी अधिकारी होऊ पाहणाऱ्या तरुणांच्या जिभेवर व्याकरणासोबतच मराठी अस्मितेचे संस्कार कोरले.

प्रा. यास्मिन शेख यांचे योगदान फळ्यापुरते कधीच मर्यादित नव्हते. त्या केवळ वर्गात शिकवत नव्हत्या, तर महाराष्ट्राच्या मनात मराठीचे बीज रुजवत होत्या.

‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तक समितीत सात वर्षे त्यांनी जे शब्द पेरले, त्यातून आज लाखो मुलांच्या मनात मराठी रुजत आहे. ‘कार्यात्मक व्याकरण’ हे पुस्तकी ओझे न राहता मुलांच्या जगण्याचा भाग व्हावे, यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या १५ वर्षांच्या वाटचालीत त्यांनी केवळ सल्लागार म्हणून नव्हे, तर मासिकाचा भाषिक आत्मा म्हणून कार्य केले. ‘लोकसत्ता’च्या ‘भाषासूत्र’मधून अनोळखी वाचकांच्या एका छोट्याशा शंकेचेही त्यांनी कधी उत्तर टाळले नाही; अत्यंत आपलेपणाने प्रत्येक शंकेचे निरसन केले.

“बोली ही मायेची ऊब आहे, पण प्रमाण भाषा ही आपल्या संस्कृतीचा कणा आहे. वाङ्मयात तो कणा ताठच हवा,” हा त्यांचा आग्रह हट्ट नव्हता, तर आपल्या भाषेवर असलेले आईसारखे प्रेम होते. त्यांच्यासाठी भाषा हे केवळ माध्यम नव्हते, तर तो त्यांचा श्वास होता; अस्मिता होती; अस्तित्व होते.

आणि म्हणूनच, या तपस्वी वाटचालीसाठी मिळालेले पुरस्कार हे केवळ सन्मान नाहीत, तर महाराष्ट्राने आपल्या या लेकीप्रती व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे.

वयाच्या १०१ व्या वर्षी, २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. त्यांनी जरी जगाचा निरोप घेतला असला, तरी त्यांनी मागे ठेवलेले भाषेचे भांडार, शब्दलेखनकोश आणि त्यांच्याकडून शिकलेल्या पिढ्यांच्या रूपाने त्यांचे कार्य सदैव अमर राहील. मराठी भाषेवर इतके अगाध प्रेम करणारी आणि तिची आयुष्यभर सेवा करणारी ही ‘भाषायोगिनी’ मराठी माणसाच्या स्मृतीत नेहमीच दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरेल.

पुन्हा एकदा स्व. प्रा. यास्मिन शेख यांच्या चरणी विनम्र अभिवादन...!!


- कु. पूर्वा शिवप्रसाद काणे


No comments:

Post a Comment

IAF: Just Two steps away from ‘World’s Best’ Title

  Founded on October 8, 1932, the Indian Air Force came into existence at Karachi’s Drigh Road, with just six RAF-trained officers, 19 air s...