प्रिय वादसभा,
सप्रेम नमस्कार.
पत्रास कारण की, १९१६ पासून ते आजपर्यंत, "वादसभा" ही केवळ एक संस्था नाही तर एक वारसा आहे. अनेक विद्यार्थी आले, अनेक विचारधारा आल्या तरी तुझ्यातला नवखेपणा आणि तरीही सोबत असलेली परंपरा, तू कायम जपत आली आहेस. आजकालच्या जगात "तुम्ही कसे टिकून आहात" हा प्रश्न नेहमी केला जातो, पण तू तितक्याच जोमाने टिकूनच नाही तर सक्रिय सुद्धा आहेस. वादसभा ही कायमच प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी कार्यरत ठेवलेली संस्था आहे. इथल्या सर्व प्रमुख कार्यांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, त्यामुळे तू एक संस्था म्हणून निराळी आणि विद्यार्थ्यांना आकर्षक अशी आहेस. अगदी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून ते आत्ताच्या नव्या शतकापर्यंत, तू सर्वांना सामावून घेऊन सर्व सदस्यांना माळेतल्या मोत्यांप्रमाणे एकमेकांशी जोडतेस.
इथे येणाऱ्या प्रत्येक नवीन सदस्याला असंच वाटतं की आपल्यातल्या काही कौशल्यांना इथे वाव मिळेल. पण तेवढेच नसून, तू प्रत्येक सदस्य हा माणूस म्हणून घडवतेस. इथे आम्ही स्पर्धा, कार्यक्रम, कार्यशाळा हे सगळं अनुभवतो.
एखादी नदी ही प्रवाही असेल तरच ती मातीला अधिक सुपीक बनवते. तसंच तू प्रत्येक सदस्याला तुझ्यासारखेच प्रवाही रहायला शिकवतेस. सतत काहीतरी नाविण्यपूर्ण करण्याच्या प्रेरणेमुळे आम्ही सर्व सदस्य आमच्याच भोवती आखलेलं रिंगण मोडून आकाशात झेप घेऊ शकतो. आणि असं काही करण्याच्या प्रयत्नात मदतीसाठी अनेक हात पुढे येतात ते तुझ्याच आजी आणि माजी सदस्यांचे. अगदी प्रोत्साहन देण्यापासून ते अपयशी झाल्यावर आधार देणारे, आणि आपल्यासाठी खणखणीत टाळ्या वाजवण्यापर्यंत सगळेच एकमेकांना सामावून घेतात. इथे बक्षीस मिळवणं महत्त्वाचं नसून सहभाग घेणं आणि काहीतरी नवीन करत राहणं, ह्यातच कौतुकाची एक थाप मिळते.
परंतु तू जशी कोमलपणे आपल्या सदस्यांना सांभाळून घेतेस तसंच वेळ पडल्यावर त्यांना जबाबदारीची जाणीव ही करून देतेस. आपल्यावर असलेला विश्वास, जबाबदारी ही फार महत्वाची गोष्ट असते ह्याची जाणीव आम्हा सर्वांना वेळोवेळी करून देतेस. त्याचबरोबर आपली जबाबदारी पार पडली की इतरांना मदत करण्याचे गुण तूच आमच्यात पेरले आहेत. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेकांचे अमूल्य योगदान असते, तेव्हा प्रत्येक छोटे-मोठे काम ह्याला महत्त्व देण्याचा धडा आम्हाला मिळतो. Canva, एडिटिंग, social media सारख्या कार्यशाळांमधून आम्ही जगासाठीही तयार होतो.
कै. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच असते. ही स्पर्धा दोन दिवसांसाठी भरत असली तरी त्यामागे अनेक महिन्यांची तयारी असते. स्पर्धेचे विषय हे आम्ही सदस्यच ठरवतो हे ऐकून मला आधी तर विश्वास बसला नव्हता. परंतु ती संपूर्ण प्रक्रिया अत्यंत कठीण आणि विचारांना चालना देणारी असते.
आज आम्ही जगाशी एकरूप होऊन आपल्या अवतीभोवती काय चालले आहे हे उघडपणे बघू शकतो, तसेच त्यावर आपले मत मांडू शकतो. एखाद्या विषयावर आपले मत घडवणे आणि ते मांडणे किती अवघड असते ह्याचे प्रात्यक्षिक आम्हाला तुझ्यामुळे कळते. परंतु तरीही मत मांडण्याचा आणि समोरच्याचे मत ऐकून त्याचा आदर करण्याचा मूलभूत भाव आमच्यात वेळोवेळी रुजवलास. ह्या शिकवणींमुळे तू आमच्या सर्वांमधला माणूस निर्माण करण्याचं काम अगदी चोख करत आली आहेस.
दरवर्षी तुझ्या प्रांगणात अनेक विद्यार्थी येतात आणि सोबत अनेक गोष्टींचं गाठोडे घेत निरोप घेतात. आम्हा सर्व सदस्यांना तू एका वटवृक्षासारखी सावली देतेस. आम्हाला एक टीम म्हणून एकमेकांचा आदर करायला, सामावून घ्यायला, एकमेकांना मदत करायला, तेवढ्याच हक्काने मदत मागायला, आणि सर्वांना घेऊन पुढे जाणे हे आम्हाला शिकवलेस. त्यामुळे आम्हाला लाभलेली टीम ही फक्त टीम न उरता एक कुटुंब बनते.
मला वाटते की तू एक संस्था म्हणून तुझ्या प्रत्येक सदस्याला प्रश्न विचारण्याचे धैर्य, सत्याचा शोध घेण्याची जिज्ञासा आणि मतभिन्नतेचा आदर करायला शिकवतेस. ह्याच तिन्हीमधून "वाद" जन्माला येतो. परंतु "वादे वादे जायते तत्त्वबोधः" ह्या तुझ्या ब्रीदवाक्यातून हेही शिकवतेस की ह्या वादातले तत्व नाहीसे झाले की तो वाद परिपूर्ण राहत नाही. कदाचित म्हणूनच आजही तू चिरंतन टिकून आहेस, कारण वादसभा माणसाच्या विचारस्वातंत्र्याला, प्रश्न विचारण्याच्या वृत्तीला आणि संवादाच्या संस्कृतीला सतत बळ देते आणि हाच तुझ्या कालातीत अस्तित्वाचा खरा पाया आहे. ह्यामुळेच आम्ही सर्व तुझ्याप्रती, तू दिलेल्या संस्कारांप्रती, कायम कृतज्ञ आहोत.
वादसभेचे हे वटवृक्ष असेच बहरत राहो हीच आम्हा सर्वांची इच्छा.
तुझीच सदस्या,
चैत्राली तुळजापुरकर

Nice 👍
ReplyDelete