Sunday, May 17, 2026

वळण

 


किट्ट काळोख पिऊन त्यात सामावलेली एक रात्र. आज चंद्राचा प्रकाश नव्हता. काही क्षणांपूर्वीच मुसळधार पावसाने रस्त्यांचे पाट केले होते. सगळीकडे वीज गेली होती. काही चांदण्या आकाशात लुकलुकत होत्या, पण शहरातल्या माणसांच्या गर्दीला तो उजेड पुरेसा नव्हता. मुसळधार पावसाच्या लाटेनंतर मागे उरलेल्या उन-उन पावसाच्या थेंबांना गाड्या धडकून जात होत्या. त्या गाड्यांच्या प्रकाशात मावेल तेवढाच रस्ता, तेवढीच दुनिया खरी वाटत होती. इतरत्र सारं जग जणू फक्त अंधारच आहे असं वाटत होत. 

अशा काळोखातच ज्योती वर्गातून बाहेर पडली. मोबाईलच्या तुटपुंज्या प्रकाशात वाट शोधत सगळीच मुले कोचिंग क्लास मधून खाली आली अन् अंधारातच आपापल्या रस्त्याने निघून गेली. ज्योतीलाही घरची ओढ होती. तीन दिवस सरावपरीक्षेने सगळ्यांचं जागरण घडवलं होतं. तिने घड्याळात पाहिलं. छोटा काटा बराच वेळ नऊ नि दहाच्या मध्ये घुटमळत होता, परंतु मोठा काटा भरभर धावत सहाला ओलांडून निघाला होता. ज्योतीला वेळ लक्षात येताच ती भरभर चालू लागली. पावसाचं पाणी पिऊन जमीन निसरडी झाली होती, त्यावर घट्ट पाय रोवत ज्योती चालू लागली. बसस्टॉप जवळ येताच तिने वेग कमी केला. आज बससाठी नेहमीसारखी गर्दी नव्हती. ज्योतीला तिच्या घरी पोहोचवणारी ही एकच बस होती, त्यामुळे ही बस चुकवणं तिला चालणारं नव्हतं. ती बस स्टॉप वर पोहोचली, नेहमीप्रमाणे काळे काका तिकडे उभेच होते, त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करत ज्योती बसची वाट पाहू लागली. 

रोजच काळे काका आणि ज्योती एकमेकांना या स्टॉपवर बघत होते; परंतु आजवर कधीही त्यांच्यात संवाद झाला नव्हता. नावे तेवढी फक्त कानावर पडली होती. तरीही एक ओळखीच नातं त्यांच्यात त्या क्षणिक हास्याने तयार केलं होतं. काही मिनिटांनंतर बस आली. बसच्या लाईटमुळे बस उघड्या डोळ्यांना दिसत नव्हती, तरीही सगळे घाईघाईने बसमध्ये चढले. ज्योतीही त्यांच्यामागून बसमध्ये चढली. आजचा हा प्रवास तिच्या आयुष्यात काय वळण आणणार होता याची तिला कल्पनाही नसेल. थोडा वेळ थांबून बस निघाली, लोकांनी तिकिटं काढली, ज्योतीनेही तिकीट काढले आणि गाणी ऐकत डोळे बंद करून शांत बसली. बाहेरचा अंधार मनातल्या गुढतेला साजेसा होता. थेंबाथेंबाने पाऊस बरसतच होता, खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने ज्योतीचा डोळा लागला, तोच लहानगा पाण्याचा थेंब तिच्या चेहऱ्यावर पडताच ती उठली. तिने घड्याळाकडे पाहिले, तर साडेदहा वाजून गेलेले, इतका वेळ कसा झाला याचं तिला आश्चर्य वाटलं. तिने बाहेर पाहिले, आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. ती अस्वस्थ झाली, बेचैन झाली. बस एका विचित्र अनोळखी रस्त्यावर चालली होती, नेहमीची दुकानं, घरं काहीच नाही. मघाशी पडलेला अंधार अधिकच गडद झालेला जाणवला. आजूबाजूला पाहता अरुंद रस्ता आणि त्यावर एकाच वेगात चाललेली ती एकटी बस. ज्योतीच्या मनाला हुरहूर लागली. रात्रीची वेळ होती, नेहमीप्रमाणे बसमध्ये गर्दी नव्हती, आणि रस्ता अनोळखी होता. तिने कंडक्टरला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दिसला नाही, उलट बसमधील इतर लोकांकडे पाहत ती अधिकच बेचैन होऊ लागली.

सगळे लोक शांत बसलेले होते, कोणीही अस्वस्थ हालचाल करत नव्हतं. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर देखील कुठलाही अनोळखी भाव नव्हता. ज्योतीचा डोळा लागला त्यावेळी कदाचित बसने काही कारणांनी रस्ता बदलला असेल असं वाटून तिने वाट पाहण्याचे ठरवले. काही क्षण भूतकाळात विलीन झाले. गेला बराच वेळ बसने कोणताही स्टॉप घेतला नव्हता. बसच्या वाढत्या वेगाबरोबर ज्योतीच्या काळजात भीती वाढत चालली होती. तोच अचानक जोरात ब्रेक दाबला गेला. सगळेजण समोरच्या सीटवर आदळले गेले. ज्योतीने मान वरती केली अन् आजुबाजूला पाहिले, तिच्या बैचेनीत आणखीच वाढ झाली. धक्क्यातून सावरत सगळे प्रवासी एका क्षणात परत स्थिर झाले होते. कोणीही जागेवरून उठले नव्हते. ज्योती मात्र आता प्रचंड घाबरली होती, बाहेर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला होता. बस का थांबली ते पाहायला ती भीती दाबत उठू लागली तेच तिचा हात कोणीतरी धरला. ज्योतीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने मागे पाहिले, तर काळे काका तिच्या शेजारच्या सीट बसलेले होते, इतका वेळ ज्योतीच्या हे लक्षात कसे आले नाही याच विचाराने तिच्या जीवाचा थरकाप झाला. तिला काही कळायच्या आत काळे काका म्हणाले, " पुढे नको जाऊ, मांजर आडवं आलं होत, गेलं आता..." ते असं म्हणायला आणि बस पुन्हा सुरू व्हायला एकच वेळ होती. ज्योती सीटवर बसली. आता मात्र तिच्या मनातली हुरहूर अधिकच वाढली होती. तिने तिचा फोन उघडला आणि बस नेमकी कोठे आहे ते पहायचा प्रयत्न करत होती, परंतु फोन चालत नव्हता. तिने घरी फोन करायचा प्रयत्न केला, परंतु तेही शक्य झालं नाही.

बाहेर पाऊस अधिकच वाढू लागला. ज्योती बाहेर पाहत होती. अनेक मोठी मोठी झाडे सरसर करत मागे पडत होती. अचानक बस एका स्टॉपवर थांबली. एक म्हातारी बाई बस मध्ये चढली आणि पुन्हा क्षणातच बसने पुन्हा वेग धरला. ती म्हातारीबाई ज्योती जवळ आली, काही क्षण अगदी निरखून दोघींनी एकमेकींना पाहिलं अन् ती मागे जाऊन बसली. ज्योती बाहेर पाहू लागली, पुन्हा एकदा तिच्या काळजात धडकी भरली. तिच्या लक्षात आले की बस एकाच रस्त्यावरून पुन्हा पुन्हा फिरतीये. परंतु बस मधील इतर लोकांच्या जणू हे लक्षातच आले नव्हते. ज्योतीचा मात्र आता धीर सुटत चालला होता, ती कोणाचीही मदत घेऊ शकत नव्हती. धो धो पावसाचा आवाज कानात घुमत होता. इतक्यातच बस मध्ये एक गोंधळ उडाला. ज्योती ने मागे पाहिले अन् ती चकित झाली. मघाशी चढलेल्या म्हाताऱ्या बाई मोठ्यामोठ्याने ओरडत बस थांबवण्यासाठी विनवण्या करू लागली होती. ही बस आपल्याला संकटात घेऊन जात आहे, आपला जीव धोक्यात आहे, असे ती सगळ्यांना सांगत होती. कोणीही तिचं ऐकत नव्हतं, जणू काही तिचं ओरडणं कोणाच्या कानांना स्पर्शच करत नव्हतं. ती बाई तशीच ओरडत ज्योतिकडे आली अन् तिला म्हणाली," तू या बस मध्ये असायला नको होत..." त्या वाक्याने ज्योती चकित झाली. आता मात्र तिच्या मनात कोणतेही विचार येत नव्हते, ती स्तब्ध झाली. तिच्या पुढे ती म्हातारी बाई फक्त दिसत होती, तिचा आवाज मात्र तिला ऐकू येत नव्हता. बाहेर पाऊस सुरू होता, त्याच्याही आवाजाला कानांच्या संवेदनांनी नकार दिला. आत तीही भीतीने इतर माणसांसारखं पुतळ्याप्रमाणे बसून समोर घडत असलेला प्रकार फक्त पाहत होती. ती म्हातारी बाई वैतागून बस मधून उतरण्यासाठी सगळ्यांना विनंती करत होती. ज्योतीलाही मनातून बसमधून बाहेर पडावं असं वाटत होतं. पण हा प्रवास नेमका कुठे चालला आहे ते तिला कळत नव्हतं, तीच शरीर स्थिर होतं, मन अस्थिर होतं, बाहेर पडण्यासाठी धडपडत होतं. इतक्यात एक आवाज झाला, इतका वेळ शांत बसलेले प्रवासी आता उठले, अचानक अस्वस्थ वाटू लागले. बस मध्ये एकच गलका उडाला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे भय होते. बसचा वेग कमी झाला आणि ज्योती भानावर आली. सगळे प्रवासी खिडकीतून वाकून काहीतरी पाहत होते. बस थांबली आहे हीच उतरण्याची संधी समजून ज्योती उतरण्यासाठी उठली, तिची नजर खिडकीतून बाहेर पडली आणि तीच धपकन खाली बसली. समोरच दृश्य पाहून तिला क्षणभर अंधारी आली...

इतका वेळ उतरण्यासाठी धडपड करणाऱ्या म्हातारीने बसमधून थेट उडी घेतली होती. ती पडताच बस क्षणभर थांबली, आणि पुन्हा वेग धरून पुढे चालू लागली. बस मधून बाहेर पडण्याचा ज्योतीचा निर्धार डगमगला. ती शांत बसून बाहेर बघत होती. बस पुन्हा पुन्हा एकच रस्त्यावरून जात होती, जणू एखाद्या गोष्टीला वेढा घालत होती. ज्योतीने डोळे बंद करून घेतले, तरीही बस मधले दृश्य, तो रस्ता आणि ती म्हातारी तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. ती प्रचंड घाबरली होती. शेजारी काळे काका इतका वेळ काहीही बोलले नव्हते, ज्योतीलाही कोणाला काही विचारावे असे वाटत नव्हते. ती शांत बसून राहिली. आता मात्र विचित्र घटनांची साखळीच जणू सुरू झाली होती. ज्योतीला तिच्या घरच्यांचे आवाज ऐकू येऊ लागले, त्या म्हातारीचे शब्द ऐकू येऊ लागले, पावसाचा आवाज कानावर पडू लागला, ती अस्वस्थ होत होती, तिचे मन या प्रसंगाशी लढताना हरले होते तेवढ्यात बस थांबली, आणि सगळे प्रवासी उतरू लागले.

एक बसस्टॉप होता, पूर्णपणे धुळीने माखलेला, सुकलेल्या झाडांची त्याला आरास होती, लुकलुकणारा एक दिवा कुठेतरी कोपऱ्यात जळत होता. ज्योतीने काळे काकांकडे पाहिले, त्यांनी पुन्हा तेच नेहमीचे स्मितहास्य केले. ज्योतीने इशारा समजला आणि ती बसमधून उतरू लागली. पायाखाली कुठे निसरडी फरशी, तर कुठे पाय रुतवणारा चिखल... ज्योती वाट काढत चालू लागली. मागे वळून पाहण्याची तिच्यात हिंमत नव्हती, तरीही तिने मागे काळे काकांकडे पाहिले, परंतु काका तिकडे नव्हते. तिने आजुबाजूला पाहिले, काका कुठेच नव्हते. एका क्षणात ते दिसेनासे झाले. ज्योती आता पळू लागली तेच तिचा पाय निसटला आणि ती पडतच होती की तिचे डोळे उघडले.

मुसळधार पावसाने रस्त्यात झाड पडले होते, तो रस्ता चुकवत दुसऱ्या वाटेने बस नेहमीच्या मार्गाला लागली होती. वीज परत येऊन दिवे पेटले होते, व शहर पुन्हा चमकत होतं. पावसाने वातावरण थंड केले होते. ज्योती मात्र घामाघूम झालेली होती. घड्याळात सव्वा दहा वाजले होते. ज्योतीने खिडकीतून बाहेर पाहिले, तिचा स्टॉप आला होता. विचित्र स्वप्नातून आपली सुटका झाली, आता या बसमधूनही सुटका व्हावी या विचाराने ती लगबगीने उठली. कोणाकडेही न पाहता ती समोर बघत चालण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तिच्या तिरप्या कटाक्षाने एक चेहरा हेरला. म्हातारी, बस मधून उडी घेणारी म्हातारी शेजारी बसली होती. ज्योती पाहून न पाहिल्यासारखे करत लगबगीने चालू लागली तोच तिची नजर त्या म्हातारीला हेरण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांच्या हातात काहीतरी होतं... एक फ्रेम, जन्म-मृत्यूची तारीख लिहीलेली फ्रेम‌... आणि त्यावरचा चेहरा तिला ओळखीचा वाटला... ते स्मितहास्य काळे काकांचंच होतं... ती म्हातारी बाई त्या फोटोला कवटाळून शांत बसली होती.


-प्रांजल काटकर

No comments:

Post a Comment

वळण

  किट्ट काळोख पिऊन त्यात सामावलेली एक रात्र. आज चंद्राचा प्रकाश नव्हता. काही क्षणांपूर्वीच मुसळधार पावसाने रस्त्यांचे पाट केले होते. सगळीकडे...