"लहानपण चांगलं होतं" असं एक वाक्य प्रत्येकाने प्रत्येकाच्या तोंडून एकदा तरी ऐकलंच असेल. साहजिक आहे, लहानपणी जे बिनधास्त, निरागस आयुष्य आपण जगलो, ते मोठेपणी हरवलं जातं. आठवतंय का, आपण नक्की केव्हा मोठे झालो ते? आईचे बोट धरून चालायला लागलो तेव्हा, की ते बोट सोडून एकटे पळायला लागलो तेव्हा? मनातलं बोलायला शिकलो तेव्हा की बोलणं मनात ठेवायला शिकलो तेव्हा? पहिल्यांदा शाळेत गेलो तेव्हा, की शेवटचं शाळेत गेलो तेव्हा? पुस्तकं वाचायला शिकलो तेव्हा, की माणसं वाचायला शिकलो तेव्हा? लढायला शिकलो तेव्हा की हरायला शिकलो तेव्हा? नक्की आपण "मोठे" झालो कधी? "नक्की" आपण मोठे झालो आहोत का?
मी तर म्हणेन, आपण मोठे झालेलोच नाही! ते तर समाजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून वयाची कारणं देऊन थोपवलेली कर्तव्ये आपल्या आयुष्याला विभाजतात, परंतु वैयक्तिक पातळीवर, आपल्या नजरेत आपण असा क्षण नाहीच शोधू शकत जेव्हा आपण मोठे झालो असं ठामपणे सांगू शकू. खरंतर माणूस कधीच मोठा होत नाही, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो वाढत असतो, घडत असतो, चुकत असतो, शिकत असतो, तो लहानच असतो, कायम...त्यामुळे हे 'लहानपण चांगलं होतं' हे वाक्य बदलून, 'लहानपण चांगलं आहे' असं म्हणावं लागेल, आणि याचाच अर्थ होतो की सारं जीवनच चांगलं आहे, फक्त त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे, आणि ही कला आपल्या सगळ्यांना देवाने जन्मतःच भेट दिलेली असते, फक्त वापरायला विसरून जातो आपण, एवढंच! खरंतर ज्या लहानपणाला हा समाज चांगलं चांगलं म्हणत स्वतः दुःखी होत असतो, ते लहानपण आपल्याला साधं लक्षात सुद्धा राहत नाही, किंबहुना लक्षात राहत नाही, म्हणूनच हा समाज त्याला चांगलं म्हणत असावा! नाहीतर तेव्हाच्या आवडतं खेळणं तुटण्याच्या दुःखाची तुलना आजच्या नोकरी गमावण्याच्या दुःखाशी होऊच शकत नाही... दुःखे आयुष्याच्या कोणत्याच टप्प्यात टळत नाहीत, विषय आपण त्यांना किती महत्त्व देतो याचा आहे!
त्याकाळी आपण त्या ईश्वरनिर्मित सृष्टीत जगत होतो, आज आपण स्वयंनिर्मित सृष्टीत जगतो. आपल्या आजुबाजूला केवळ आपल्या विचारांचे, अपेक्षांचे, अनुभवांचे जाळे आहे, ईश्वर निर्मित सृष्टी त्या पलीकडे आहे, जी या जाळ्यामध्ये गुंतून विचित्र, क्लिष्ट वाटायला लागली आहे. असं म्हणतात, लहान मुलं एखादी गोष्ट नुसती बघून शिकतात. खरं तर ते बघून शिकतात, कारण ते मुळात "बघतात". आपण मात्र हरवलेले असतो, आपल्याच विश्वात, इतरांकडे बघायला वेळ असतो कुठे आपल्याकडे? आणि चुकून बघितलं, तरी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आहेच शिक्षणात आडकाठी घालायला. थोडक्यात काय, तर लहानपण म्हणजे काही वय नाही, तो जगण्याचा दृष्टिकोन आहे, लहान मुलांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिलं तर जग मोठं, उदात्त, सुंदर आणि अथांग भासेल! लहानपणी आपल्याला मोठे होण्याची हौस असते, मोठे झालो की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. पण खरंतर लहान किंवा मोठ्यांसारखं आयुष्य जगायला वय बदलायची तितकीशी गरज नाही. आपण ना वय बदलू शकतो, ना हे जग. त्यापेक्षा दृष्टिकोन बदलूया, जग आपोआप बदलेल, सुंदर दिसेल!
मनाची दारं आनंदासाठी, दुःखासाठी, यशासाठी आणि अपयशासाठीसुद्धा सताड उघडी ठेवावीत. लहान मुलं स्वतःहून कशाला घाबरत नाहीत, मोठे लोकच त्यांच्या मनात भीती भरतात. तसंच हे "मोठे लोक" स्वतःच्या मनात सुद्धा भीती भरत असतात, आणि घाबरून जातात. वेदनांवर लक्ष दिलं की त्यांची तीव्रता वाढते, आणि दुर्लक्ष केलं की वेदना कमी होते. शारीरिक दुखण्यात जर मानसिक बळ एवढं उपयोगी पडत असेल, तर साहजिक आहे मानसिक दुखणे ते सहज पळवून लावू शकेल, फक्त इच्छा पाहिजे.
थोडक्यात, आपल्या मोठ्यापणीच्या या जगण्यात लहानांचा मनमोकळा दृष्टिकोन अंगीकृत करूया आणि दिलखुलास जगूया, शिकूया आणि आयुष्यभर असेच लहानच राहूया!
बालदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
-प्रांजल काटकर

खूप सुंदर लेखन! 🙌🏻
ReplyDelete