अस्तित्व शोधाच्या आंधळ्या वाटेवर धावत असताना एखादा मृदू स्वर कानी पडावा, आणि त्या स्वराने एखाद्याच्या जगण्याचं गाणं व्हावं. अगदी असचं झालं एका अवलिया सोबत, त्या अवलियाचं नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली. चितमपल्ली हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक तसेच व्यासंगी लेखक व रसिक म्हणून सर्वश्रुत आहेत. मूळचे तेलुगू भाषिक असलेल्या चितमपल्लींचा जन्म सोलापुरातला.
लहानपणापासूनच रानवाटा तुडवण्याची सवय असल्यानं त्यांना पक्ष्यांचा चिवचिवाट, झाडांचा गंध, प्राण्यांच्या हालचाली यात रमणं आवडायचं. यातूनच त्यांची निसर्गाबद्दलची जिज्ञासा आणि ओढ वाढली. आणि याच निसर्गप्रेमाने त्यांचा पुढील प्रवास निश्चित केला. कोइंबतूर येथील राज्य वनसेवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात जवळजवळ छत्तीस वर्षे त्यांनी सेवा केली. कर्नाळा पक्षी अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नवेगाव राष्ट्रीय उद्यान या सगळ्यांच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमधून अनेक वन्यप्रजाती सुरक्षित राहिल्या, पक्ष्यांचे घर सांभाळले गेले आणि जंगलाचे संवर्धन झाले. आपल्या व्यावसायिक जीवनाचे धागेदोरे संशोधन विषयाशी जोडून त्यांनी ऋषिवत जीवन व्यतीत केलं. त्यामुळे लोक त्यांना 'अरण्यऋषी ' म्हणत.
चितमपल्ली जसे निसर्गाचे पुजारी त्याच प्रमाणे सरस्वतीचे देखील उपासक होते. देशोदेशीच्या दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह करण्याचा छंद त्यांनी जोपासला. अठरा भाषा जाणणार्या या वनमहर्षीने आपला समृद्ध निसर्ग-जिवनानुभव तब्बल 25 ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे.यात 'पक्षी जाय दिगंतरा', 'रानवाटा', 'घरट्यापलीकडे', 'निळावंती', 'चैत्रपालवी' यांसारख्या ग्रंथांचा समावेश होतो.त्यांच्या लिखाणातून त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ति, गाढा व्यासंग आणि संशोधक दृष्टी झळकते. तसेच शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेख मेळ घातल्याने, वाचणार्याला त्यांचे लिखाण अजिबात रटाळ वाटत नाही. त्यांनी जवळपास एक लाख नवीन मराठी शब्दांना जन्म दिला, ज्यामुळे मराठी साहित्यात निसर्गचित्रणाची हिरवी वाट निर्माण झाली आहे. म्हणुनच समीक्षकांनी त्यांना ' वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार ' अशी उपाधी दिली आहे. तर जी.ए कुलकर्णींनी " तुमच्या पावलांना रानवाटांची माहेरओढ आहे " असं म्हटलं आहे.
मला असं वाटत कि 'निसर्ग' आणि 'माणूस' यांना जोडणारा दुवा म्हणजे चितमपल्ली आहेत. त्यांच्या लिखाणाने अनेक व्यक्ती प्रभावित झालेल्या पहायला मिळतात. माणसाने निसर्गाकडे जावं, त्याच्या कुशीत निजावं, त्याच्या विविधतेला स्पर्शून गंधित व्हावं. आणि हे निसर्ग प्रेमाचा सुकाळ असलेलं निसर्गाच गाव आयुष्याच्या प्रवासात कधीतरी शोधायला हवं. कारण त्यानंतर गवसलेलं ठिकाण हे परम विश्रांतीच आणि अनुपम शांतीच असेल. हाच विचार चितमपल्ली प्रत्येकाच्या मनात रुजवू पाहतात. 'निसर्ग' आणि 'साहित्य' या प्रांतात मुक्त विहार करणारं हे निसर्गाचं लेकरू जून 2025 मध्ये निसर्गाच्या कुशीत कायमच शांतपणे निजलं. परंतु, त्यांच कार्य आणि साहित्यसंपदा येणार्या पिढीसाठी संशोधनाची ब्लूप्रिंटच ठरेल. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या शिदोरीतून प्रेरणा घेऊन असे अनेक 'मारुती' घडावेत हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल. या निसर्गाच्या लेकास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
-वैष्णवी नागवडे

No comments:
Post a Comment