Thursday, August 28, 2025

दृष्टी

 

कविता ही अशी देणगी आहे जी कधी कधी काही प्रसंगांना सहजच शब्दबध्द करून जाते, तशीच ही माझी कविता! आपण कधीकधी आपल्या दुःखांना मोठं समजतो पण कधी असं झालंय तुमच्यासोबत की कुणीतरी नकळत तुम्हाला हसत हसत संकटांना सामोरं जायला शिकवून गेलंय ? माझ्यासोबत एकदा असं झालं आणि त्या प्रसंगाने मला जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याची एक नवीन 'दृष्टी' दिली.


ते स्तब्ध होते; माझ्या मनात मात्र विचारांचे वादळ होते.

त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि निरागसतेचा संगम;

माझ्या मनात मात्र कोलाहल, प्रश्न, संभ्रम होते.

माझ्याकडे सगळं असूनही मी अतृप्त होतो;

त्यांच्याकडल्या उणीवाही त्यांना जगण्याचं बळ देत होत्या.

मला चिंता होती भविष्यातल्या 'जर-तर'ची;

ते वर्तमानातील चिंतांशीही मैत्री करून जगत होते.

ते एकमेकांचा हात घट्ट धरून उभे होते;

मी तर हेव्यादाव्यांच्या जगात कधीच एकटा पडलो होतो.

ते एक एक पाऊल सावकाश टाकत होते,

आणि मी पुढे जायच्या घाईत काही पाऊलं कधीच गाळली होती.

ते जात होते पुढे चाचपडत, पण योग्य दिशेने;

मात्र मी निवडलेली दिशा योग्य आहे का नाही, हे कधी पडताळून पाहिले नव्हते.

त्यांच्या चेहऱ्यावर आशावाद स्पष्ट दिसत होता;

त्यांच्याकडे उमेद होती,

मी मात्र उसनं अवसान आणून, एकेक दिवस पुढे ढकलत होतो.

त्यांच्यातल्या कमींसाठी ते कधी मागत नव्हते सहानुभूती;

ना देवाला दोष, ना ग्रह-ताऱ्यांची भिती त्यांना होती.

त्यांना बघून जणू माझं भावविश्वच ढवळून निघालं;

विचारांचा वेग वाढला,

आणि मी स्वतःलाच कोड्यात पाडलं.

तेव्हा कळून आलं — माझ्याकडे नजर होती,

पण त्यांच्याकडे दृष्टी होती.

ते दृष्टीहीन नव्हतेच; मुळी मीच स्वार्थांध होतो.

ते जगण्यासाठी धडपडत होते,

मी धडपडत जगत होतो.

तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला;

गाडी सुसाट सुटली,

आणि या अल्पशा वेळात जणू जीवनाची नवी वाट गवसली.


नेहमीप्रमाणे मी कॉलेजला जाण्यासाठी बसने प्रवास करत होते. एका लाल सिग्नलवर थांबले असताना खिडकीतून बाहेर पाहताना मला असे काही दिसले की त्या पाच मिनिटांतच आयुष्याचा एक मोठा धडा शिकायला मिळाला. त्या अनुभवातून उमटलेली ही कविता — माझ्या भावविश्वाचा तो दृष्टांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. ही कविता तुम्हालाही माझ्यासारखंच जीवनाचं बळ देऊन जावो!

-मनाली देशपांडे

No comments:

Post a Comment

शब्द म्हणजे काय असतं?

  शब्द – हा संवादाचा पाया, विचारांचा दरवाजा आणि भावनांचा सेतू आहे. माणसाच्या जगण्यात जे काही घडलं, ते शब्दांतूनच व्यक्त झालं. ज्ञान, संस्कार...