तो, ती, ते..... शssss!
पुण्यातील एका कार्यक्रमात पोलिसांनी तब्बल दीडशे लोकांना एका हॉलमध्ये तासाभरासाठी कोंडून ठेवलं होतं. ते देखील कुठल्याही वॉरंट शिवाय! काही कारण नसतांना या खाजगी क्लिअर पार्टी मधील लोकांना का कोंडून ठेवलं गेलं हा प्रश्न MIST LGBTQ फाउंडेशन द्वारे विचारला गेला परंतु उत्तर काही मिळाले नाही. अश्या अनेक चित्तथरारक घटना मी येथे सांगू शकते परंतु फक्त ऐकून काय होतंय...? या सो कॉल्ड पुढारलेल्या जगात जिथे आपण कपड्यांना देखील दोन लिंगांमध्ये विभागलय, तिथे जर एखाद्या व्यक्तीला गुलाबी आणि निळा सोबत परिधान करायचा असेल तर काय हरकत आहे?
जन्मजात जे माणसाला मिळतं ते बायोलॉजिकल सेक्स, व्यक्तीचा मानसिकतेनुसार काही सामाजिक घटकांवर आधारित असतं ते जेंडर... हा फरक जाणून घेऊन त्याला समजून घ्यावं आणि इतरांना देखील समजवावं ही आपलीच जबाबदारी आहे , कारण आपला लाडका गुगल बाबा सेक्स आणि जेंडर या दोन्ही गोष्टींना लिंग असच ट्रान्सलेट करतो.
वयाच्या सहा-सात वर्षापर्यंत आपल्याला स्त्री पुरुष यातला फारसा काही फरक जाणवत नाही. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कळायला लागते की आपण कुठल्या साच्यात बसतो. साधारण १३-१४ वर्षांच्या व्यक्तीला जेव्हा हे कळून चुकतं की ते या दोन लिंगांचा साच्यात बसत नाही तेव्हा सुरू होतो त्यांचा खरा गोंधळ. मी वेगळा का? माझ्यात ते साम्य का नाही जे माझ्या वयाच्या इतर लोकांमध्ये दिसतं ? जर मी पुरुष म्हणून जन्माला आलो तर का माझे मन स्त्रियांच्या आभूषणांवर हक्क मागते? का मला तसे वस्त्र परिधान करण्याची इच्छा होते ? अशा लाखो प्रश्नांच्या गोंधळात अडकलेल्या त्या मेंदूला पहिले स्वतः समजावूनच अत्यंत अवघड जातं. पण ते समजावून ,मान्य करून पुढे उभं असतं या व्यक्तीच्या जीवनातलं मोठं संघर्ष – सर्वनाम! कारण ते सर्वनाम आपल्याला दिल्या जातं या समाजाकडून.
आयुष्यातली अनेक वर्ष आपण त्यांना चुकीच्या सर्वनामांनी संबोधित करत असतो .ज्यामुळे त्यांच्या मनात उठलेली खळबळ अजून त्रासदायक ठरते. त्यांचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो समाजापेक्षा, जगापेक्षा …. या कारणामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यांच्या डोक्यात अनेक गोष्टींची चुकामुक होते . अशावेळी ते आपल्या जवळच्या माणसांना सांगतात .काही घरांमध्ये पालक ही गोष्ट स्वीकारतात पण अनेक वेळा त्यांना घराबाहेर काढलं जातं ,वाईट आरोप लावले जातात, त्यांच्या मनातून हे विचार काढून टाकायला चित्र विचित्र बाबांकडे घेऊन जातात ,शॉक ट्रीटमेंट दिली जाते !! ट्रान्सजेंडर असण हा काही गुन्हा नाही आणि तो एका ठराविक कालावधीसाठीच आहे असे देखील नाही. हे त्यांच्या जीवनाचं सत्य आहे. आई वडिलांनी स्वीकारलं तरी नातेवाईक ,शेजारी, शिक्षक, मित्र मैत्रिणी आणि इतर लोक… या सगळ्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतं.
ज्या व्यक्तीला आपण तो/ती ने नाही बोलवू शकत त्यांना आपण स्वतःहून त्यांचे सर्वनाम विचारले पाहिजे. आपण आज-काल बऱ्याच लोकांच्या इंस्टाग्राम बायो मध्ये शी, हर, ही, सह, तो, हे सगळं वाचतो याचं मुख्य कारण हेच आहे की जर आपण स्वतःहून आपली सर्वनामे सांगितली तर ते देखील नीःसंकोच पणे त्यांचे सांगतील.
लक्ष्मी त्रिपाठी हे नाव आपण नक्की ऐकलं असणार त्यांच्या ‘मी हिजरा, मी लक्ष्मी’ या पुस्तकात त्यांनी अशा अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे जे त्यांना लहानपणापासून सहन करत यावा लागल्या. जेंडर दिस्फोरिया म्हणजे जेव्हा एका व्यक्तीला आपले मानसिक आणि जैविक घटक वेगळे असल्याचा असंतोष असतो आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो तेव्हा ते नैराश्याला बळी पडतात LGBTQI+ समुदायातील अनेक लोक या जेंडर डिस्फोरिया यामुळे आत्महत्या करण्यासारखी कठोर पावलं उचलतात .किंवा लिंग पुनर्पुष्टिकरण शस्त्रक्रिया करून काहीजण नवीन आयुष्याची सुरुवात करतात. परंतु ती शस्त्रक्रिया देखील काही सोपी नाही . विविध सायको मॅट्रिक चाचण्या केल्या जातात, खरंच शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे की नाही हे पाहिलं जात.....
अजून एक मोठा प्रश्न असतो तो विशेष अधिकारांचा. आज आपल्या देशात या लोकांना लग्न बंधनात अडकण्यास मनाई आहे पण अर्जेंटिना ,दक्षिण ,आफ्रिका, स्वीझर्लंड, कॅनडा सारख्या काही देशांमध्ये त्याला संपूर्ण मान्यता दिल्या गेली आहे. 2014 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नालसा जजमेंट द्वारे ट्रान्सजेंडर लोकांना भारतातील तिसरे लिंग असल्याची मान्यता दिली आहे त्यांना देखील संविधानातील प्रत्येक अधिकार आहेत याची खात्री केली गेली होती
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या अंतर्गत ट्रान्सजेंडरचे कल्याण यासाठी काम केले जाते . एवढेच काय तर जोविता मंडल यांना भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर जज बनण्याची संधी दिली गेली. सरकार अनेक गोष्टींना मान्यता देते… परंतु समाज नाही! यात संपूर्ण चूक समाजाचीच आहे असे देखील नाही. कुठेतरी त्याबद्दल लोकांना माहितीच नाही. योग्य ते विचार करण्यासाठी योग्य संकल्पना असणं गरजेचं आहे .त्यासाठी जूनचा महिना ‘प्राईड मंथ’ म्हणून साजरा केला जातो व विविध ठिकाणी प्राईड परेड काढली जाते. या परेडचा हेतू असतो स्वतःला जो जसा आहे तसं मान्य करणे आणि एलजीबीटीक्यू प्लस लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहणे.
पुण्यात देखील इंद्रधनु ही संस्था प्राईड परेड आयोजित करते. इतर समुदायातील लोक देखील त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या परेडमध्ये भाग घेऊ शकतात. शुभमंगल जादा सावधान, बधाई दो, यासारख्या काही चित्रपटांमधून देखील जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
शेवटी एवढेच म्हणेल,
‘इंद्रधनुविना आकाश अधुरेच राही… एकरंगी फुलांनी वसंत बहरत नाही’
धन्यवाद !
- अदिती भावसार.
No comments:
Post a Comment