.......आणि ती "ज्ञानेश्वरी" आज आपुल्या हाती आली !!!
शके ११९७ युवा संवत्सर श्रावण वद्य अष्टमी गुरुवार ची मध्यरात्र..... आणि या वेळी जन्म झाला ज्ञानियांचा राजा.... न भूतो न भविष्यति l अशा संत ज्ञानेश्वर माऊलींचा...... आदिनाथ - मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर अशी चालत आलेली गुरुपरंपरा... आईवडिलांनी लहानपणीच देहांतप्रायश्चित घेतल्यानंतर पैठण ला काही काळ राहून आपल्या प्रबोधना द्वारे समाजमन जागृत करून निवृत्तीनाथ , ज्ञानेश्वर , सोपान आणि मुक्ताई ही चार ही भावंडे नेवासा येथे आली. नेवासा येथे मोहिनीराजाचे मंदिर आहे. ज्ञानोबांना मोहिनीराजाचे विशेष आकर्षण !!
मानवी मनामध्ये चाललेले दुःख त्यांनी ओळखले होते आता समाजाचे सर्वभावे कल्याण करण्यासाठी आपले विचार ग्रंथबद्ध करावेत अशी आज्ञा ज्ञानेश्वर माउलींना त्याचे गुरु तसेच ज्येष्ठ बंधू असलेल्या निवृत्तीनाथांनी केली. कोणता ग्रंथ भाष्य करण्यासाठी निवडावा ?? असा प्रश्न उभा राहिला असता माउलींनी "भगवद्गीता" या पवित्र ग्रंथाची निवड केली. याचे कारण गीता ही महाभारताचा एक भाग आहे . भगवान ज्या अर्जुनास गीता सांगत आहेत त्या अर्जुनाचा सारथी स्वतः भगवान आहेत यावरून मनुष्य जीवनाचे सारथी हे स्वतः भगवान आहेत हे सूचित होईल.
गीता वाचण्याचा , समजून घेण्याचा अधिकार सर्वांना आहे परंतु संस्कृत मध्ये असलेली गीता त्या काळात लोकांना वाचता व समजून घेता येत नव्हती. त्यावेळी या गीतेवर च त्या काळातील लोकांना समजेल अशा भाषेत म्हणजेच प्राकृत ( मराठी ) भाषेत टिकाभाष्य करावे असे ज्ञानेश्वर माउलींनी योजिले. पण हे भाष्य करत असताना ते लिहून घ्यायला कोणीतरी हवे ना !! मग त्या साठी.... नव्हे नव्हे... जणू काही हे भाष्य लिहिण्या साठीच ज्यांचा दुसरा जन्म झाला होता !!! ज्यांच्या नावातच "सत्" म्हणजे "अस्तित्व किंवा स्वरूप" , "चिद" म्हणजे "चेतनरूप , ज्ञानरूप व प्रकाशरूप" आणि "आनंद" म्हणजे "आनंदरूप" असा सापेक्ष अर्थ आहेत..... असे सच्चितानंदबाबा यांची निवड केली. आता भाष्य करते साक्षात ज्ञानेश्वर माऊली आणि ते भाष्य लिहून घेणारे सच्चिदानंदबाबा.. महालयाच्या मंदिरामध्ये श्रोतृवर्ग जमू लागला; आणि सद्गुरू निवृत्तिनाथ व इष्ट देवदेवतांना वंदन करून ज्ञानेश्वर माउलींनी भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य सांगावयास सुरुवात केली. सच्चिदानंदबाबांनी त्यांचे भाष्य लिहून घेण्यास सुरवात केली. त्या ग्रंथाच्या रूपाने ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. समाजजीवनाचे संवर्धन करणारे नीतिशास्त्र योग्य प्रकारे मांडून मराठीत 'अमृताशीही पैंजा जिंके' अशा साच, मवाळ, मृदू, अमृतमधुर शब्दांत एक उत्कृष्ट काव्यग्रंथ निर्माण केला.
या नऊ हजार पाकळ्यांचे भावकमळ म्हणजे "भावार्थदीपिका" ग्रंथाचा किर्तीसुगंध सगळीकडे पसरला. भगवद्गीतेतील सातशे श्लोकांवर ज्ञानेश्वर माउलींनी नऊ हजार ओव्या लिहिल्या. पुढे याच ग्रंथाचे नामकरण विश्वसंत नामदेव महाराजांनी समाधी अभंग प्रकरणात - देव निवृत्ती यानी धरिले दोन्ही कर। जातो ज्ञानेश्वर बैसावया । या अभंगात जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढे 'ज्ञानेश्वरी' ठेवियेली ॥ असे चरणात वर्णन केले आहे. त्यामुळे भावार्थदीपिकेचे नाव 'ज्ञानेश्वरी' असे रूढ झाले.
मूलतः शुद्ध असलेली ज्ञानेश्वरी , परंतु त्याकाळी छपाई यंत्र नसल्याने ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेतल्या नंतर लोकांनी एकमेकांकडून बघून लिहून काढली. त्याच वेळी त्या लिखणामध्ये अनेक चुका नकळत झाल्या. ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेतल्या नंतर २९४ वर्षांनी श्री एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला आणि समाधी स्थळी ज्ञानेश्वरी ची शुद्ध प्रत मिळाली..... पाठांतर आणि हस्तांतरामुळे अशुद्ध झालेली प्रत एकनाथांनी पुन्हा एकदा शुद्ध केली व समजा समोर ठेवली.
..... आणि ती ज्ञानेश्वरी आज आपुल्या हाती आली...!!!
- कु. पूर्वा शिवप्रसाद काणे.
No comments:
Post a Comment