Sunday, July 2, 2023

गुरूपौर्णिमा

 


 गुरुपौर्णिमा

गुरू ब्रम्ह गुरू विष्णू गुरू देवो: महेश्वरा |

गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नम: ||

आज गुरुपौर्णिमा. आजच्या दिवसाचं औचित्य साधून प्रत्येकजण आपल्या गुरुला शुभेच्छा देत असतो. गुरू - शिष्याचं नातं समृद्ध करणारा आजचा दिवस. मला वाटतं प्रत्येक व्यक्ती ही गुरुही असते आणि शिष्यही. जणू आपल्या सर्वांचाच हा दिवस. अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून शिकलेली एक छोटी शिकवणही आपल्याला शिष्य बनवते तर कळत नकळत एखाद्याला दिलेली शिकवण गुरू बनवते. फरक फक्त एवढाच आहे की काहीजण आदर्श व्यक्तिमत्त्वाला आपला गुरू मानतात तर काहीजण लहान मुलातही गुरुला पाहतात. शेवटी प्रत्येकाचा दृष्टीकोन.

माणसाचा सर्वात पहिला गुरू म्हणजे त्याचे आई - वडील. हाताचं बोट पकडून चालायला शिकवणारी आई आणि चुकीचं पाऊल पडलं तर सावरणारे बाबा यांच्यासारखं जगात कोणीच नसतं, त्यांनी दिलेली शिकवण कदाचित कोणीच देऊ शकत नाही. आई वडिलांनंतरचे सर्वात  महत्त्वाचे आणि माझे आदर्श गुरू म्हणजे शिक्षक. कारण याच गुरूंमळे आपल्या जीवनाची वाट खऱ्या अर्थाने सुकर व सोपी होते. आयुष्याच्या वाटेवर पडलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आपल्याला याच वळणावर मिळतात. खरं तर, आयुष्याच्या वाटेवर भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही काहीतरी शिकवण देऊन जात असते पण आयुष्याचं शिक्षण देणारा शिक्षकच सर्वात मोठा गुरू असतो. हे गुरू आपलं आयुष्य समृद्ध करतात. जीवन म्हणजे काय हे शिकवणारे हे गुरू तर जगणं म्हणजे काय हे शिकवून जगायला शिकवणारे गुरू म्हणजे मित्रच ना! मला अनेकदा प्रश्न पडतो कि, 

काय असावी मित्राची व्याख्या, 

बहुधा मित्राला व्याख्याच नसावी... 

सारं मन रितं करायला, 

शंकेला जागाच न उरावी .... ! 

जगायला शिकवणाऱ्या मित्राला एका वाक्यात बसवणं तसं कठीणच, नाही का! याप्रमाणे कितीतरी जण आपल्या आयुष्यात येऊन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला एक अनमोल शिकवण देऊन जातात.

प्रत्येकवेळी माणूसच माणसाला शिकवण देतो असं नाही माझ्या मते, आपल्या सर्वांचा सर्वात मोठा गुरू म्हणजे निसर्ग. निसर्गाच्या कृती म्हणजे जणू जीवनाचं पुस्तक. या पुस्तकातली पानं म्हणजे अनुभव. या पानांना वाचण्यासाठी हवा दृष्टीकोन, थोडा वेगळा. 

आज पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या मंद प्रकाशाने सगळा आसमंत उजळून टाकतो. जणू तो त्या भयाण अंधाराचं सुंदर रात्रीत रुपांतर करतो. पण पौर्णिमेनंतर लगेचच त्याच्या अमावस्येच्या प्रवासाची सुरुवात होते. नंतर येते ती अमावस्येची भयाण रात्र. जिथे प्रकाशाचा लवलेशही नसतो. या अंधारावर, काळोखावर मात करण्यासाठी चंद्र कले - कलेनं वाढत जातो आणि त्यानंतर येते ती चांदणी रात्र पौर्णिमेची. चंद्र त्याच्या दिनक्रमातून सांगत असतो कि अंधार कितीही मोठा असला तरी तो प्रकाशावर विजय मिळवू शकत नाही. आपण फक्त सतत प्रयत्न केले पाहिजेत. सुख आलं म्हणून भारावून जाऊ नये किंवा दु:ख आलं म्हणून खचूही नये. सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख हा जणू सृष्टीचा नियमच आहे. सूर्य शिकवतो वाट पहायला. अंधारानंतरच्या प्रकाशाची आणि दु:खानंतरच्या सुखाची. तो मावळतो एका सुंदरतेने आणि उगवतो तो नव्या आशेने. झाडांची तर किमयाच न्यारी. प्रत्येक झाडाची वेगळी शिकवण. तरी प्रत्येक झाडाचा एक गुणधर्म. पानगळती. एकामागोमाग एक पाने गळतात आणि काही दिवसातच झाडाखाली गळून गेलेल्या पानांचा खच पडतो. तरीही ते झाड सज्ज असतं, गळून पडलेल्या पानांच्या दु:खासाठी नाही तर नवपल्लवांच्या  स्वागतासाठी. ते शिकवतं संयम धरायला, खचून न जाता धीर धरायला. फुलांच्या रंगीत दुनियेच्या जादूची तर ताकदच निराळी. कमळाचं फूल चिखलातूनही उमलतं तर गुलाबाचं फूल काट्यांमधूनही फुलतं . मला आवडतं ते जास्वंदीचं फूल. कारण त्याची शिकवणही निराळी आहे. जास्वंदीची कळी जास्त मोहक नसते पण जेव्हा ती उमलू लागते तेव्हा तिचं रुप दृष्ट लागेल असं असतं. एका छोट्याशा कळीचं एका बहारदार, टवटवीत फुलात रुपांतर होतं. त्या फुलाची मोहकता भुरळ पाडणारी असते. त्याचं ते रुप पाहून मनाला समाधान मिळतं. एक वेगळाच आनंद मिळतो. जसजशी संध्याकाळ होऊ लागते तसतसं ते कोमेजू लागतं. रात्रीच्या नीरव शांततेत ते जमीनदोस्त होतं. त्याचं आयुष्य फक्त एकाच दिवसाचं पण तरीही ते टवटवीत असतं. त्याच्याकडे पाहून वाटतं, याला बहुधा जगण्याची कला अवगत असावी. इतरांचा विचार न करता ते जगत असतं आपल्या धुंदीत, आपल्या परीनं.

निसर्गाच्या दुनियेतली, माझ्या जीवनातली ही काही पानं जी मी माझ्या एका मोकळ्या नजरेतून अनुभवलेली. यांनी मला खुल्या नजरेनं पाहायला शिकवलं. सगळं काही प्रत्यक्षपणे दाखवलं. निसर्गाला जादूगार असं संबोधलं जातं पण माझ्यासाठी तो जादूगारापेक्षा एक उत्कृष्ट गुरू आहे. 

बिनभिंतीची उघडी शाळा

लाखो इथले गुरू |

झाडे, वेली, पशु, पाखरे

यांशी गोष्ट करू ||

    - प्रतिक्षा संदीप ओंबळे

No comments:

Post a Comment

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व स...