Thursday, July 13, 2023

गोपाळ गणेश आगरकर - स्मृतिदिन




गोपाळ गणेश आगरकर - स्मृतिदिन 


" यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।। "

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ "

         जेव्हा जेव्हा जगात धर्माचा म्हणजेच सदाचाराचा नाश व्हायला सुरुवात होते आणि अधर्माचे राज्य वाढू लागते तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेतो असं कृष्ण सांगतात आणि  तेव्हा तेव्हा पृथ्वीवर अवतार घेऊन आपण काय कार्य करायचं हेही भगवान श्रीकृष्ण सांगतात. सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी, दृष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी वेळोवेळी जन्म घेतो असं श्रीकृष्ण म्हणतात.

पुनर्जन्माची व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी असते; काहीजण त्याच्यावर विश्वास ठेवतात, काही विश्वास ठेवत सुद्धा नाहीत किंबहुना मलाही त्यावर विश्वास नाही पण गीतेत सांगितलेल्या विचारांवर कृती करत जे यशस्वी होतात त्यांना काय म्हणावं भगवान श्रीकृष्णाचा पुनर्जन्म की त्यांनी त्या महापुरुषात सोडलेला आपला एक अंश.....?

        गीतेत सांगितलेल्या विचारांप्रमाणेच कार्य कळत नकळत एका महापुरुषांच्या हातून घडत होतं. गीतेत सांगितल्याप्रमाणे जीवन किती वर्ष जगता येते यापेक्षा ते कसे जगता येईल या तत्त्वाला समाज मूल्यात फार महत्त्वाचे स्थान आहे. त्याला कमालीचे महत्त्व आहे. या तत्त्वांमध्ये बसणारे एक श्रेष्ठ नाव म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. बुद्धीप्रामाणयवादी, विचारवंत, शिक्षण तज्ञ, थोर समाज सुधारक अशी कित्येक विशेषण त्यांच्या कार्याची ग्वाही देतात.

         मित्रहो 1856 मध्ये आगरकरांचा जन्म झाला. आपण कल्पना करू शकतो का? 1856 च्या सुमारास एका खेडेगावात शिक्षणाच्या काय सुविधा उपलब्ध असतील? किंवा कोणत्या दर्जाचे शिक्षण त्या खेड्यात दिलं जात असेल? पण आगरकरांनी शिक्षण घेण्याचा आग्रह धरला आणि शिक्षणासाठी ते कराड कडे मामाच्या गावी आले तिथे त्यांनी प्रार्थमिक शिक्षण पूर्ण केलं. आपल्याकडे पदवीधर झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा कोर्टात नोकरी मिळत नाही पण आगरकरांना प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतरच लगेच कोर्टात कारकुनाची नोकरी मिळाली. शिक्षणाच्या ओढीमुळे ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी रत्नागिरीला आले. काही तरी करण्यासाठी एका गरजवंताला पैसा आणि आपल्या लोकांची मदत असावी लागते पण आगरकरांकडे ते दोन्ही सुद्धा नव्हते. नातेवाईकांकडे हात पसरवले तर नातेवाईकांनी धक्का दिला, म्हणून दररोज प्रत्येकाच्या घरात थोडं थोडं का होईना मिळेल ते आगरकर जेवायचे आणि त्या अवस्थेत त्यांनी रत्नागिरीत दोन इयत्तांचे शिक्षण पूर्ण केलं व पुन्हा ते कराडला आले कराड मधून पुन्हा ते विदर्भात अकोल्यात आले आणि त्यांनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं अनेक हाला  अपेष्टा सहन करत त्यांनी डेक्कन मध्ये बी.ए. पूर्ण केलं. त्यांनी एम  इतिहास आणि तत्वज्ञानात पूर्ण केलं.

           कुणी विश्वास ठेवेल का की ज्या व्यक्तीला स्वतःच शिक्षण घेण्यासाठी इतकं फिरावं लागलं, कष्ट घ्यावे लागले, नातेवाईकांकडे हात पसरावे लागले त्याच व्यक्तीने डेक्कन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय यांसारख्या अनेक शैक्षणिक संस्थांची पायाभरणी केली. हे नवल नव्हे तर हा गर्वाचा भाग आहे.

       मी आज मुद्दामून त्यांच्या या शैक्षणिक प्रवासाबद्दल येथे मांडतोय, कारण त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त त्यांना व त्यांच्या या कार्याला स्मरून आजच्या प्रत्येक विद्या ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाणं आणि त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. "राजकीय सुधारणा आधी का सामाजिक सुधारणा आधी"हा आगरकर आणि टिळकांच्या वैचारिक वाद विश्ववख्यात आहे पण स्वतःच्या निर्णयावर किंवा विचारांवर ठाम राहत केसरीचे संपादक पदाचा राजीनामा देत दुसऱ्या क्षणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू करून समाजात सामाजिक सुधारण्याची चळवळ पुढे नेणारे आणि उभे करणारे आगरकर आजच्या तरुणांना का प्रेरक वाटू नयेत ?

         जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षक म्हणून काम सांभाळू लागले, तेव्हा आगरकरांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं त्या पत्रात ते असं म्हणाले "माझं शिक्षण पूर्ण झालंय. आता मला सरकारी नोकरी मिळेल, घरचे दारिद्र्य संपेल, असं जर तुला वाटत असेल ना तर आई ते खोटा आहे. आई यापुढे संपूर्ण जीवन मी परहितासाठी जगायचं ठरवलं.' याच पत्रामुळे ते किती मोठे महाजन समाज सुधारक होते त्यांनी दुसऱ्यांसाठी काय काय केलं असेल याची नक्कीच प्रचिती येईल.

     माझा पुनर्जन्मावर जरी विश्वास नसला ना तरीही अशी लोकं पुन्हा पुन्हा जन्माला यावीत. समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सरळ करावी. आणि समाजाला मार्गदर्शन करावे जेणेकरून आपला समाज पुन्हा एकदा प्रगतीपथावर येईल..   

             - शिवम जाधव.


No comments:

Post a Comment

International Day of Parliamentarism

When we hear the word ‘parliament’, the first things that cross our minds are politics, democracy, or power. As a diverse nation with an inh...