अनेक गोष्टींमध्ये आपली कधी ना कधी कुणाबरोबर तुलना ही होतेच. कधी ती आपण करतो, तर कधी आपल्या आजुबाजूची लोकं. बऱ्याच जणांना असेही वाटते की आपण तेव्हाच स्वतःला सिद्ध करू शकू जेव्हा आपण सगळ्या बाजूंनी पूर्णत्व साधू. या बाबतीतच थोडं.....
काय भुलला वरिलीया रंगासी
पट्टी आंधळी बांधुनी डोळ्यांसी,
संपन्न, परिपूर्ण कोण असते?
सौंदर्य खरे हे मनासी शोभते ।।
तर्क-वितर्क लावी जो तो
प्रथमदर्शनी भुलतो कधी तो,
अंतरंग हे असे सतरंगी
त्यात मन हे बहू अतरंगी ।।
साऱ्यांचे जरी एकच गाणे
तरी गाती विविध तराणे,
वृत्ती साऱ्यांचीच निर-निराळी,
किती प्रकारे वेग-वेगळी!
तुलनेत सारे जग हे रमते
कुणी कोणाच्या डोळ्यात खुपते,
प्रत्येकाच्या अनेक कमतरता
झाकून टाकी एक गुणवत्ता ।।
कुणाचे कशात निघते प्राविण्य
कुणा बुद्धिमत्ता तर लाभते कधी लावण्य,
परि पूर्णत्वाची कास धरण्याचा हा ध्यास,
क्षणिकतेचा परि उरे आभास ।।
आयुष्य हे असे असावे
ज्याच्यासाठी त्याने जगावे,
स्वच्छंदी होऊनी असे विहरणे
जणू स्वतःतील मीच गवसणे ।।
~ चैत्राली
No comments:
Post a Comment