Thursday, August 11, 2022

विश्व संस्कृत दिवस

 नमो नमः। सुमध्यानम् । अशा गोड शब्दात इयत्ता आठवी मध्ये असताना माझ्या पहिल्यावहिल्या संस्कृतच्या तासाची सुरुवात झाली आणि आपोआपच संस्कृत भाषेच्या अगदी प्राचीन काळापासून वाहत आलेल्या अतिरम्य प्रवाहाचे आम्ही सगळे एक भाग बनलो. हळू हळू छोटी छोटी वाक्ये, एखादे सुभाषित, आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींची संस्कृत भाषेतील नावे, लहानपणी मराठीतून ऐकलेल्या गोष्टी, हळूच त्यामधून मिळालेले व्याकरणाचे धडे असे सारे शिकता शिकता तिच्या याच मधाळपणामुळे, सौंदर्यामुळे ती देवभाषा असावी असे मनाने अगदी ठरवूनच टाकले.

इयत्ता वाढू लागली त्याचबरोबर पुस्तकांमध्ये शिकण्यासाठी असणाऱ्या गोष्टी, त्यांची काठिण्य पातळी वाढू लागली पण संस्कृत भाषेची ओढ कमी होणे शक्य नव्हते. कारण मला माहीत असणारी संस्कृत भाषा ही कठीण नव्हतीच मुळी ! माझ्यासाठी ती कायम मला ज्ञानाच्या प्रवाहात ठेवणारी माझ्या मराठी भाषेची आई आहे. आज जरी तिचा अभ्यास आणि संवर्धन व्यवस्थित होत नसले तरी न रुसता जे तिचे आहेत त्यांना कवेत घेणारी आहे. तिचे मनापासून वाचन करणाऱ्याला ती स्वतःच स्वतःची रहस्ये उलगडून दाखवते. तिच्या एका श्लोकाचे अनेक भावार्थ आपल्यासमोर उलगडू शकतात. मला माहित असलेली संस्कृत भाषा छोटे छोटे दाखले देऊन जीवनाची कितीतरी रहस्ये माझ्या समोर ठेवते. मला माहित असलेली संस्कृत भाषा उच्चारांसोबतच माझे व्यक्तिमत्त्व सुधारते. तिच्याकडे असणाऱ्या अगाध ज्ञानाच्या भांडाराने मला चकित करुन सोडते.
मला संस्कृत भाषा उलगडली ती सुभाषितांमधून. वेगवेगळ्या चालींमुळे आवडणारी सुभाषिते अर्थ समजून घेऊ लागले तशी अधिक आवडू लागली. हळसंस्कृतमधील शब्द, त्यांचे सामर्थ्य काही वेगळेच आहेत. मला ‘ देव ‘ शब्दापासून कळू लागलेली भाषा आता मी संस्कृत मधून लिहू- बोलू शकते इथपर्यंत उमगली आहे.
 
 संस्कृतचा तास सोडता तिचा संवादात वापर करणारे फार मोजके लोक भेटले. आता मात्र हळू हळू सारेजण संस्कृत भाषा, तिचा गोडवा, तिचे महत्त्व जाणून घेतायत. तिचे संवर्धन करणे कसे गरजेचे आहे हे साऱ्यांना हळू हळू कळू लागले आहे. व्यवहारात तिचा वापर वाढू लागला आहे. पूर्वी एकदा दक्षिणेकडे पूर्ण संस्कृत भाषिक लोकांचे एक गाव आहे असे वाचले होते ! अगदी तसच आपला भारत देश संस्कृतचा अभ्यास करणाऱ्यांचा देश होईल की नाही परंतु म्हणुनच मी एक निश्चय केला आहे. मला माहित असलेल्या संस्कृतचा शक्य तितका प्रसार करणे. तिच्यामुळे मला जी आत्मिक शांतता लाभते ती समाजात पोहचवणे, सोप्या, साध्या शब्दात तिच्याबाबतचे मार्गदर्शन लहानग्यांना करणे. जेणेकरून मला माहित असणारी संस्कृत भाषा इतरांनाही उलगडत जाईल आणि एक दिवस समाजातील प्रत्येक जण पुढील गीत गात राहील.

“ पठामि संस्कृतम् नित्यम्। वदामि संस्कृतं सदा।।
ध्यायामि संस्कृतं सम्यक्। वन्दे संस्कृत मातरम् ||

मैत्रेयी संकुले
                                                                  - वादसभा सदस्य

No comments:

Post a Comment

Press: safeguarding the truth

  On January 2nd, 1881, a brave freedom fighter in Pune took a bold step in undermining the British authority in India. This freedom fighter...