Friday, May 1, 2020

वादाच्या निमित्ताने



    तो शहराच्या बाजारपेठेत उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रश्न विचारून वाद घालत असे. एखाद्या विषयावर वाद घालायचा असेल तर सगळ्यात पहिले त्या विषयाची व्याख्या करूया असं तो म्हणायचा. लोकांनी एक व्याख्या केली तर तो त्यावर प्रतिप्रश्न करून ती व्याख्या खोडून टाकायचा. असं झाल्यावर आपल्या आधीच्या व्याख्येत सुधारणा करून समोरचा पुन्हा नवी व्याख्या करत असे. तो  पुन्हा नव्या व्याख्येत खोट काढत असे. अशा पद्धतीने तो प्रश्न विचारून समोरच्या माणसाच्या बोलण्यातला फोलपणा दाखवत असे. तो स्वतःचं खरं करत नव्हता, सिद्धांत मांडत नव्हता. फक्त प्रश्न विचारत होता. शेवटी लोक त्याला कंटाळत असत. पण मला ज्ञान मिळवून द्यायला माझी मदत कर अशी विनंती तो करत असे. "मला काहीही माहीत नाही, हे मी मान्य केलंय, म्हणून मी ज्ञानी आहे", अस म्हणणारा तो,  तत्वज्ञानी, विचारवंत सॉक्रेटिस होता.त्याच्या या पद्धतीला  Midwifery method, म्हणजे प्रसुतिविद्या (प्रसूतीच्या वेळी सुईण ज्याप्रमाणे शरीरातून बाळ बाहेर काढायला मदत करते), त्याप्रमाणे  समोरच्याच्या मनातून संकल्पना बाहेर
काढायला मदत करणारी त्याची ही पद्धत, Midwifery Method म्हणजे सुईणी ची पद्धत किंवा Socratic debate म्हणून पुढे आली. समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याचे केवळ खंडन करणे, स्वतःचे खरे करणे, हे वादात येत नाही. वादात मुद्यांना पुन्हा  प्रन्हा प्रश्न करून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न असतो.

पुराणकथेमध्ये रुपसुंदरी रंभा आणि ऋषी शिरोमणी शुक यांच्या संवादामध्ये एक श्लोक येतो, "वादे वादे जायते तत्वबोध:" अर्थात वादामधूनच ज्ञानवर्धन आणि बोध घडून येतो. एखाद्या विषयाचे अंतिम तत्व कळवून घेण्यासाठी मुद्दे मांडून जी चर्चा केली जाते, त्याला वाद म्हणतात. ही चर्चा जिथे घडवून आणली जाते, त्या ठिकाणास वादसभा असे म्हणतात. असे वाद-विवाद, विवेकापर्यंत पोहचायला मदत करतात. परंतु वाद हे केवळ भौतिक पातळीवरती अस्तिवात नसतात. या पलिकडे वैयक्तिक पातळीवर देखील आपला स्वतःशी वाद-विवाद होतच असतो. आणि म्हणून संतवाणी सुद्धा सांगते, "तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी!" स्वतःशी वाद घालून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न आपण करतच असतो. नेहमी निष्कर्ष निघतोच असे नाही. पण म्हणून आपण विचार करणे, तो मांडणे थांबवत नाही.

थोडक्यात माणसाचे विचाराशी अतूट असे नाते आहे. याच नात्याला व्यासपीठ देणारी, स.प.महाविद्यालयात रुजू असणारी, अनेक वर्षांची परंपरा असणारी वादसभा ही विद्यार्थी संघटना वक्तृत्व, वादविवाद, निबंध, कविता, इ. अनेक कौशल्यांवर काम करते. ही कौशल्य केवळ कौशल्य नाहीत तर त्या कला आहेत, हे जाणते. या कला जोपासल्या आणि वाढवल्या गेल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील राहते. एखादी कृती करावी की करू नये या संभ्रमात आपण नेहमीच असतो. हाच संभ्रम काढून टाकण्यास स्वच्छ आणि निर्मळ विचारांची देवाणघेवाण होणं आवश्यक असते. या देवाणघेवाणीत, आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी वादसभा विविध विषयांवर विचारमंथन करून या कौशल्यांना आणि कलांना जोपासण्याच्या हेतूने, त्याचे डिजिटल लिखित स्वरूप (Blog) प्रसिद्ध करण्यास सुरुवात करत आहे.

महाविद्यालयात विद्यार्थी असणारे वादसभेचे आजी, माजी सदस्य या डिजिटल माध्यमातून त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतील. वेगवेगळ्या विषयांवरील स्वलिखित कविता, लेख, निबंध, जिंकलेल्या स्पर्धांची लिखित स्वरूपात भाषणे, इ. चा यात समावेश असेल. Blogs मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत असतील. ज्या विद्यार्थ्याने Blog वरती विचार प्रकट केले असतील, तो विद्यार्थी स्वतः त्या विचार मांडणीसाठी जबाबदार असेल.

ज्येष्ठ लेखक नरहर कुरुंदकर, म्हणतात त्याप्रमाणे "मतभेदांवर आमचा प्रामाणिक विश्वास आहे".  न पटणाऱ्या मतांबद्दलही आम्हाला आदर आहे. आणि म्हणूनच हा लिहिण्याचा उपक्रम मतमतांतरे आणि चर्चेशिवाय अपूर्ण आहे.  चांगला वक्ता, चांगला लेखक, चांगला स्पर्धक तयार करण्याचा वादसभेचा प्रयत्न कायम असतो. पण या डिजिटल माध्यमातून चांगला वाचक निर्माण करण्याचा आणि वादसभेच्या सदस्यांपलिकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहजतेने पोहचण्याचा आमचा प्रयत्न असेल.



शरयू जोरकर, SYBA
(विशेष आभार - रेणुका कल्पना, माजी वादसभा सचिव )

1 comment:

  1. या लेखातून वादसभेचा ब्लॉग सुरू करण्यामागचा उद्देश स्पष्ट झाला..नेहमी उदाहरणे व सहजसुंदर भाषा! 👌👌

    ReplyDelete

Press: safeguarding the truth

  On January 2nd, 1881, a brave freedom fighter in Pune took a bold step in undermining the British authority in India. This freedom fighter...