या ओळी आहेत प्रसिद्ध कवी दत्तो आप्पाजी तुळजापूरकर यांच्या महाराष्ट्र भूपाळीतील. यात त्यांनी 'महाराष्ट्र' या महन्मंगल राष्ट्राची महिमा वर्णिली आहे. महाराष्ट्र! ही भूमी आहे शौर्याची, पराक्रमाची, बंधुतेची आणि ममतेचीही.
ही भूमी आहे शिवराय,शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाची, नामदेवांच्या नामाची, एकनाथांच्या भारूडाची आणि तुकोबांच्या गाथेची.
ही भूमी सप्तसुरांची, चित्रपटसृष्टीची, प्रज्ञावंत साहित्यिकांची, अष्टपैलू कलावंतांची. तब्बल चोपन्न बोलींचे अलंकार लेऊन सजलेल्या विविधतेची. सह्याद्रीची उंची आणि अरबीची खोली असणारी ही भूमी पुरोगामी विचारांची. महाराष्ट्र हे फक्त राज्य नसून ते आहेत जाज्वल्य विचार, संस्कारांची शिदोरी आणि प्रबळ अस्मितेची खाण.
आज 1 मे, म्हणजेच महाराष्ट्राचा जन्मदिवस. फुटलेली डोकी, रक्तबंबाळ चेहरे, फ्लोरा फाऊंटनचा संघर्ष, एकशेआठ हुतात्मे, रस्त्यावर पडलेले रक्ताचे खड्डे, त्या रक्तातला आवाज "अरे संयुक्त महाराष्ट्र...झालाच पाहिजे."
जमावबंदी, पुन्हा रक्त, घोषणा, लाठीचार्ज आणि शेवटी उरलं फक्त लाल रक्त, आणि "लाल रंग प्रेमाचं प्रतीक नाही." याची आठवण करून देणारा हा दिवस.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्याची मागणी जोर धरू लागली. अनेक राज्यांना त्यांची 'भाषावार प्रांतरचना' करून मिळाली सुद्धा. परंतु, आता प्रश्न होता महाराष्ट्राचा. त्यावेळी, मुंबईसह गुजरात असे द्विभाषिक 'बॉम्बे स्टेट' अस्तित्वात होते. मात्र, मराठी भाषिक जनतेची स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी सातत्याने वाढत चालली होती. 1946 मध्ये बेळगाव येथे ज्येष्ठ लेखक व पत्रकार ग.त्र्यं.माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषिक महाराष्ट्राचा प्रथमच प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सत्ताकाळात भाषावार प्रांतरचनेसाठी अनेक कमिशन्स नेमण्यात आली. परंतु, भाषावार प्रांतरचना ही देशाच्या एकात्मतेचा घात करणारी आहे. या सबबीखाली ही कमिशन्स नंतर बंद पडली. मग 1956 साली प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, कॉ.डांगे, सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली 'संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना करण्यात आली. स्वतंत्र महाराष्ट्रासाठी या लोकांनी रक्ताचं पाणी केलं.
"माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली." असा सूर आळवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या प्रचंड जनसागरात प्रेरणेची मशाल पेटवली. संयुक्त महाराष्ट्राच्या या चळवळीत पत्रकार, साहित्यिक, शाहीर, कामगार, शेतकरी अशा अनेक लोकांनी सहभाग नोंदवला. जवळपास 14 वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर या आंदोलनापुढे सरकारला झुकावे लागले. आणि 1 मे 1960 रोजी द्विभाषिक बॉम्बेचे विभाजन होऊन 'महाराष्ट्र' आणि 'गुजरात' अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा आहे. त्याचा आणि महाराष्ट्र दिनाचा चांगलाच सहसंबंध आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, लाखो गिरणी कामगारांनी रस्त्यावर उतरून लढा दिला होता.
म्हणून, आजच्या या कामगार दिनी त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख होणं गरजेचं आहे. हा संयुक्त महाराष्ट्र कामगार आणि शेतकरी यांच्या एकजुटीमुळेच उभा आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरंतर संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा फक्त स्वतंत्र मराठी भाषिक राज्यासाठी नव्हताच. तो होता डिवचल्या गेलेल्या मराठी स्वाभिमानाचा, मराठी अस्मितेचा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठीचा.
परंतु, महाराष्ट्राची सद्यस्थिती आणि इथले गढूळ राजकारण पाहता अनेक क्रांतिकारकांनी दिलेला लढा आणि त्यांनी समाजाला बहाल केलेली मूल्ये मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मराठी भाषेची झालेली दुरावस्था पाहून आचार्य अत्रेंचे शब्द आठवतात. ते म्हणतात "ज्याला आपल्या मातृभाषेत बोलायची लाज वाटते, त्याला त्याच्या आईच्या दुधाची देखील लाज वाटत असावी."
म्हणूनच, मराठी माणसाने आता जागरूक होण्याची गरज आहे. 1 मे या दिवसाकडे फक्त सार्वजनिक सुट्टी म्हणून न पाहता त्यामागचे बलिदान, त्याग आणि पराक्रम लक्षात घेऊन त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे, आता फक्त मूर्तिपूजा न करता त्या मूर्तींचे विचार जाणून घेऊयात आणि त्याची आपल्या आयुष्यात अंमलबजावणी करूयात. हीच या महाराष्ट्रदिनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना खरी आदरांजली असेल...
-वैष्णवी नागवडे

उत्तम मांडणी... अभ्यासपूर्ण लेख 🙌🏻✨
ReplyDelete