Saturday, April 11, 2026

ज्योतिबा फुले : अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला परिवर्तनाचा विचारवंत


 "विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले".

याचा अर्थ होतो की, शिक्षणाशिवाय बुद्धी नष्ट होते, बुद्धीशिवाय नीती नष्ट होते, नीतीशिवाय प्रगती थांबते, प्रगतीशिवाय धन नष्ट होते आणि धनाशिवाय शूद्र नष्ट होतात; इतके अनर्थ फक्त अशिक्षेमुळे होतात.

ज्योतिबा फुले हे १९व्या शतकातील ते नाव आहे ज्यांनी क्रांती घडवली. १९व्या शतकात जेव्हा मुलींना शिक्षण देणे पाप मानले जात होते, त्या काळात ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवले. त्या काळात ही काही सामान्य गोष्ट नव्हती. हे संपूर्ण रूढीवादी आणि ब्राह्मणवादी विचारसरणीविरुद्ध उचललेले ठाम पाऊल होते. यासाठी त्यांना मोठा संघर्ष आणि विरोध सहन करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.

लहानपणापासूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी जातिवाद आणि भेदभाव अनुभवला होता. ते थॉमस पेनच्या "राइट्स ऑफ मॅन" या पुस्तकाने प्रेरित झाले होते, ज्यामध्ये पेन यांनी लिहिले होते की सर्व माणसं जन्मतः समान असतात. प्रत्येक माणसाला स्वतःचे "नैसर्गिक हक्क" असतात, ते कोणतीही सत्ता हिरावून घेऊ शकत नाही. या पुस्तकाने फुले अधिक संवेदनशील झाले. भारतात जेव्हा ब्रिटिश राजवट होती, तेव्हा फुलेंनी तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड रिपन यांना पत्र लिहून मागणी केली होती की कर (टॅक्स) चा ५०% हिस्सा शिक्षणावर खर्च करावा.

फुले जातिवादाचे कट्टर विरोधक होते. वर्ष होते १८६८. शूद्र–अतिशूद्रांना सार्वजनिक तलाव आणि विहिरीतून पाणीही घेऊ दिले जात नव्हते. त्या वेळी फुलेंनी आपल्या घरातील विहीर सर्वांसाठी खुली केली. फुलेंच ठाम मत होते की पाण्यावर सर्वांचा हक्क आहे आणि ही विहीर तुम्हाला आजही पाहायला मिळेल, त्यांच्या पुण्यातील घरात, ज्याला "फुले वाडा" म्हणून ओळखले जाते.

ज्योतिबा फुले यांचे प्रसिद्ध पुस्तक "गुलामगिरी" यात त्यांनी अस्पृश्यता, जातिप्रथा, वर्णव्यवस्था आणि शूद्र–अतिशूद्रांचा इतिहास व त्यांच्या शोषणाबद्दल लिहिले. फुले यांनी केवळ सामाजिकच नाही तर आर्थिक प्रश्नांवरही आवाज उठवला. "शेतकऱ्यांचा आसूड" हे पुस्तक लिहून त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणावर आपले विचार स्पष्ट केले आणि ब्रिटिश धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. बडोद्याचे महाराज श्री. सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिबा फुले यांच्या "शेतकऱ्यांचा आसूड" या पुस्तकाचे ऐकून त्यांच्या विचारांची प्रशंसा ही केली.

फुले हे इतिहासाचे अभ्यासक आणि विचारवंत होते. त्यांनी १८६९ मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची उपेक्षित समाधी शोधून काढली. याचबरोबर त्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा ही लिहिला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला. त्या काळात शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांमध्ये धूसर होत चालली होती, तेव्हा फुलेंनी त्या प्रतिमेस पुन्हा जनतेसमोर उभे केले.

१९व्या शतकात परंपरागत आणि रूढीवादी मानसिकता समाजावर इतकी प्रभावी होती की, ज्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू होत असे, तिला पुन्हा विवाह करण्याची परवानगी नव्हती आणि तिचा सामाजिक बहिष्कार केला जात होता. अशा वेळी फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला समर्थन दिले. त्या काळात फुलेंच हे पाऊल रूढीवादी मानसिकता आणि परंपरागत चालत आलेल्या व्यवस्थेला मोठे आव्हान देणारे होते, याच काळात फुले यांनी १८७३ साली पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाचा मुख्य उद्देश होता सत्याचा शोध घेणारा समाज निर्माण करणे, जो समाजातील रूढीवादी परंपरांवर तर्काच्या आधारावर प्रश्न उपस्थित करेल, जातिव्यवस्थेला आव्हान देईल आणि समाजातील शोषणाविरुद्ध आवाज उठवेल. सत्यशोधक समाज घडवून फुलेंना विज्ञानवादी दृष्टिकोन समाजात पेरायचा होता. त्या काळात पूजा-पाठ आणि लग्नासारख्या संस्कारांवर पंडित–पुजार्‍यांचे पूर्णपणे वर्चस्व होते. त्यांच्या शिवाय हे कार्य पूर्ण होत नव्हते आणि दक्षिणेच्या नावाखाली लूट चालत होती. विशेषतः खालच्या जातीतल्या लोकांसाठी पंडित–पुजार्‍यांकडून लग्न करणे फार कठीण होते. फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून साध्या-सरळ पद्धतीने, पंडित–पुजार्‍यांशिवाय विवाह करण्याची प्रथा सुरू केली. या माध्यमातून त्यांनी सामाजिक बदल घडवून आणला.

ज्योतिबा फुले यांचे सामाजिक जीवन जितके कठीण होते तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवनही कठीण होते. जेव्हा त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला विरोध केला आणि त्यांना घराबाहेर काढले. अनेक अडचणींवर मात करून फुलेंनी आपले कार्य सुरू ठेवले. त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. फुलेंनी सामाजिक रूढीवादी परंपरांना तर्काच्या आधारावर आव्हान दिले. फुले कधीही कोणत्याही समुदाय किंवा जातिविरुद्ध नव्हते, तर ते त्या विचारसरणीविरुद्ध होते ज्याने समाजावर शतकानुशतके अन्याय केला, आपले वर्चस्व आणि नियंत्रण ठेवले. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, स्वतंत्र आहेत आणि सामाजिक दबावाशिवाय आपले जीवन जगत आहेत, तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांमुळेच ते शक्य झाले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीमाई त्या प्रत्येक मुलीचा आवाज आहेत, जिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, जिच्यावर आजही समाजाकडून अन्याय आणि भेदभाव केला जातो.

त्या काळात पुरुषसत्ताक मानसिकता समाजावर प्रचंड प्रभावी होती. स्त्रियांना कमी समजणे आणि धर्माच्या नावाखाली स्त्रियांना एका मर्यादित चौकटीतच राहायला भाग पाडले जात होते. अशा परिस्थितीत ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला शिक्षण दिले आणि शिक्षिका बनवले. ही गोष्ट फुलेंना त्या काळातील इतर पुरुषांपासून वेगळी ठरवते, कारण ते फक्त या पुरुषसत्ताक विचारसरणीला मान्य करणारे नव्हते, तर त्यांनी आपल्या कृतीतूनच त्या विचारांना छेद दिला. आपल्या घरातील विहीर शूद्र–अतिशूद्रांसाठी खुली करणे, यावरूनच फुले किती मानवतावादी आणि संवेदनशील होते हे दिसून येते.

११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती आहे. खरं सांगायचं तर ही फक्त एक तारीख वाटत नाही, तर एक आठवण करून देणारा दिवस वाटतो की आजही या देशात समानता आणि शिक्षणाबद्दल बोललं जातं, पण अजूनही आपण खूप मागे आहोत आणि बरंच काही बदलणं बाकी आहे. फुले यांनी ज्या समाजाचं स्वप्न पाहिलं होतं, ते आजही अपूर्ण आहे....

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दीत पदार्पण करतांना त्यांना विनम्र अभिवादन.


-आर्यन पालके

3 comments:

The River Park

The sun was as bright as ever. One thing about it was that it never really cared about how humans felt; it shone brightly when the sky was c...