Wednesday, January 1, 2025

नवे वर्ष, नवा संकल्प

वर्ष सरत आहे... अनेक सण-समारंभ, अनेक चित्रपट, काही सुखद, काही दुःखद अशा आठवणी; अनेक किस्से, नवीन धडे, आणि दरवर्षीप्रमाणे भरपूर उन्हाचे, पावसाचे, आणि थंडीचे दिवस अनुभवत अनुभवत २०२४ वर्षाचा शेवट जवळ आला आहे. आता आपण सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. आपल्यापैकी अनेकांनी नवीन वर्षासाठी संकल्प ठरवले असतील. कदाचित २०२४ साली राहून गेलेल्या गोष्टींचाही समावेश या संकल्पांमध्ये असेल. नवीन वर्ष नेहमीच ३६५ दिवसांची भेट घेऊन येतं, पण जसं नवीन फुलं ओंजळीत घ्यायची असतील, तर जुनी कोमेजलेली फुलं ओंजळीतून सोडावी लागतात, तसंच आपल्या मनाचंही आहे. जुन्या आणि कटू आठवणींना निरोप दिल्याशिवाय नवीन वर्षातील संधींना, क्षणांना, आठवणींना साठवण्यासाठी जागा मिळणार नाही.


अनेकदा आपण नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने, उत्साहाने करतो, पण मागील कटू आठवणींना कायमचा निरोप देऊन नवीन सुरुवात करायचं विसरतो. मग त्या आठवणींचं ओझं आपल्या मनावर राहतं. लांबच्या प्रवासाला निघायचंय, तर जड ओझं घेऊन कसं चालेल? आपल्याला तर पुढील ३६५ दिवसांसाठी सज्ज व्हायचं आहे!

जेव्हा आपण सगळी नकारात्मकता आपल्या मनातून काढून टाकतो, तेव्हाच सकारात्मकतेने, आनंदाने, आणि उमेदीने नववर्षाचं स्वागत करता येतं. कोणतंही वर्ष लक्षात राहतं ते त्या वर्षभरात जोडलेल्या नात्यांमुळे, नवीन मित्र-मैत्रिणींमुळे, अनुभवांमुळे, शिकलेल्या गोष्टींमुळे, चाखलेल्या नवीन पदार्थांमुळे, पाहिलेल्या प्रदेशांमुळे, वाचलेल्या पुस्तकांमुळे, ऐकलेल्या गाण्यांमुळे, केलेल्या प्रयोगांमुळे, मिळालेल्या यशामुळे, आणि प्रसंगी केलेल्या संघर्षांमुळे. या सगळ्यातून मिळालेल्या अनुभवांमुळेच आपण घडतो आणि समृद्ध होतो. म्हणूनच ‘अनुभवाचे बोल’ महत्त्वाचे मानले जातात.त्या वर्षातील चांगल्या-वाईट सर्व अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणीची शिदोरी घेऊन नवीन वर्ष प्रसन्न मनाने सुरू करूया!

नवीन वर्ष आलं की आपण अनेक संकल्प करतो. त्यातला एक संकल्प असा असावा की नकारात्मक आणि त्रासदायक गोष्टींना फार काळ मनात साठवून न ठेवता त्यांना अलवार सोडून देऊ. त्यामुळे नववर्षात चांगल्या आठवणी, किस्से, प्रसंग, आणि अनुभव साठवता येतील. असं केल्यास येणारं वर्ष आपल्या आयुष्यात आनंदाची भर घालेल.

माझ्याकडून तुम्हा सर्वांना येणाऱ्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!


-मनाली देशपांडे


No comments:

Post a Comment

Press: safeguarding the truth

  On January 2nd, 1881, a brave freedom fighter in Pune took a bold step in undermining the British authority in India. This freedom fighter...