अनेकदा अवकाळी पाऊस येतो. आपण सगळेच जण यावर काही ना काही आपली टिप्पणी देत राहतो. अनेकदा आपल्या आजूबाजूची शांत व्यक्ती अचानक काही बोलून जाते, करून जाते आणि आपण त्यावरही आपली टिप्पणी देत राहतो.
थोडं या बाबतीतच.
आभाळाच्या मनातही
खूप काही साचलं होतं
पावसाच्या रूपाने त्याने
मन मोकळं केलं होतं
इतके दिवस पाहिलेलं
गपगुमान अनुभवलेलं
कुठेतरी लागलेलं
खोल कुठे सललेलं
आभाळाच्या मनातही खूप काही साचलं होतं.....
भय होतं बहुदा त्यास
कोणाशीही बोलण्याचं
भडाभडा बोलून टाकणं
त्याला काही जमलं नव्हतं
आभाळाच्या मनातही...
पाऊस झाला त्याचा मार्ग
आभाळ मुक्यानेच बोलत होतं
न सांगता कुणा काहीच समजत नाही
हे त्या वेड्यास कुठे माहित होतं?
ठायीच नसतं आपल्या कधी
तेही सहन करत असेल
आपल्याला हसताना दिसतंय
ते स्वतःच स्वतःशी झगडत असेल
कोणास ठाऊक किती दिवस
हे असंच चालू राहील
आतल्या आत धुमसणारं आभाळ
असंच कायम बरसत राहील...
~ मैत्रेयी मकरंद सुंकले
No comments:
Post a Comment