"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः
यत्रेतास्तू न पूज्यन्ते सर्वास्तत्रफलाः क्रिया:।"
या सुभाषिता द्वारे अगदी पुरातन काळापासून स्त्रियांना सन्माननीय स्थान देणे अपेक्षित आहे, हे आपल्याला समजते. स्त्रीचा सन्मान होणे आवश्यक आहे; परंतु आजही कित्येक ठिकाणी स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. बऱ्याचदा स्त्रिया स्वतःहूनच दुय्यम स्थान स्वीकारतात हेही खरेच आहे. स्त्रियांना दुय्यम स्थान देताना हे लक्षात घ्यावे की सृष्टी निर्माते ब्रह्मदेवांना 'स्त्री' निर्मितीसाठी सर्वाधिक काळ लागला होता. शरीराने कोमल परंतु मनाने खंबीर, प्रसंगी हळवी तर प्रसंगी धीट, नाजूक पण तरीही प्रसूतीच्या समयी असह्य कळा सोसणारी स्त्री निर्माण करणे खरच सोपे नसणार. आज जेव्हा सर्व कुटुंबाला प्रेमाने एकत्र धरून ठेवण्याऱ्या स्त्रिया जेव्हा स्वतःवरच प्रेम करायचं विसरतात तेव्हा त्यांनी हे ध्यानात ठेवायला हवं की,
" विधात्याची दिव्य निर्मिती तू, त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा
नको नाकारू तू तुझ्या स्त्री शरीरा जप त्याची प्रतिष्ठा "
प्रत्येक स्त्री शरीर हे प्रतिष्ठितच असते. मग ते नुकत्या जन्मलेल्या चिमुकलीचा असो वा जर्जर झालेल्या म्हाताऱ्या आजीच, तारुन्याने ओथंबलेल्या तरुणीचे असो एखाद्या बलात्कारीतेचं, निरागस लहान मुलीचा असतो व एका आईचं, प्रत्येक स्त्री शरीर हे तितकच दिव्य तेजस्वी आणि प्रतिष्ठित आहे हे प्रत्येकीने लक्षात ठेवायला हवं. रंग, रूप, उंची, जाडी, तारुण्य, वृद्धत्व यापैकी कोणतीच गोष्ट मनुष्याच्या हातात नाही, मग अशा बाबतींमुळे स्वतः न्यूनगंडात राहून आपल्याला मिळालेल्या या सुंदर स्त्रीजन्माबद्दल उदासीन का बरे राहावे? आजही कित्येक स्त्रियांद्वारे स्वतःच्या स्त्रीत्वाबाबत औदासिन्य दाखवले जाते. स्त्री जन्माला, त्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या त्रासाला दूषणे दिली जातात. एकंदरच स्त्रीजन्म व्यर्थ आहे, असाच बहुतांशी समज झालेला दिसतो. परंतु हे सर्व सार्थ अयोग्य आहे. स्त्रियांना स्वतःचे महत्त्व समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे मासिक पाळी, गर्भधारणा यांसारख्या सृष्टीसंतुलनाच्या महत्त्वपूर्ण कार्यांची जबाबदारी प्रकृतीने स्त्रियांवर टाकली आहे. एक दुसरा जीव स्वतःच्या शरीरात वाढवणे, त्याला जन्म देताना कळा हसतमुखाने सहन करणे, हे एक स्त्रीच करू शकते. अशावेळी स्त्रीने स्वतःला कोणत्याही बाबतीत कमी समजणे हे प्रकृतीच्या सामर्थ्यावर शंका घेण्यासारखे आहे.
सर्वप्रथम स्त्री म्हणून स्वतःला स्वीकारणे,त्यानंतर स्वतः दुय्यम नाही हे मान्य करणे व त्यानंतर स्वतःवर प्रेम करणे यालाच स्त्री स्वतःचे 'स्त्रीपण' जोपासणे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. स्त्रियांनी स्वतःचा स्वतःच्या स्वास्थ्यचा विचार करणे स्वार्थीपणाचे नाही आणि पुरुषविरोधी तर अजिबातच नाही. वैज्ञानिकदृष्ट्याही स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला स्त्री संप्रेरकांमुळे खूप बदल होत असतात हे आता समजले आहे. परंतु स्त्रियांकडूनच स्वतःच्या शरीराची तब्येतीची हेळसांड होते.यामुळे बऱ्याचदा त्यांना भीषण आजारांनाही समोर जावे लागते. मेनोपोजसारख्या अवस्थेत स्त्रियांच्या शरीरात प्रचंड बदल घडत असतात.त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाचे पूर्णतः पतन होते. परंतु अशा टप्प्यात त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आधार देणे गरजेचे असते. मेनोपॉजमुळे त्यांचे स्त्रीत्व संपत नाही तर त्यांच्या आयुष्यातील एका नवीन टप्याची सुरुवात आहे हे त्यांना समजावले गेले पाहिजे.
आजच्या घडीलाही आपल्यासमोर अशा कित्येक स्त्रियांची उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांचा स्त्रीजन्म सार्थकी लावला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या यांच्यावर संपूर्ण समाजाने चिखलफेक केली. परंतु एका स्त्रीचा जन्म 'चुल व मूल' यांपेक्षा कित्येक पटीने अधिक उत्तम गोष्टी साध्य करण्यासाठी झालेला आहे,हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. राणी लक्ष्मीबाईंनी त्यांच्या पुत्राला पाठीवर बांधून युद्ध केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी पतीच्या निधनानंतर संपूर्ण राज्य सांभाळले. एक मुलगी असूनही पळते,असे हिणवले गेलेली हिमा दास लागोपाठ पदके पटकावते. अपंग झालेल्या अरुणिमा सिन्हा एव्हरेस्ट शिखर सर करतात. शिक्षणाचा मूलभूत हक्क नाकारला गेला म्हणून तालीबान्यांविरुद्ध बंड पुकारून, सर्वात लहान वयात शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफजाई यांसारखी अगणित उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. या सर्व स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या प्रसंगी त्या एक स्त्री आहेत म्हणून त्यांना कमीपणा दाखवला गेला. एका पुरुषापेक्षा दुय्यम आहेत असेही त्यांना वारंवार सांगण्यात आले, हिणवले गेले. परंतु त्यांनी त्यांच्या स्त्रित्वावर प्रेम करणे थांबवले नाही. उलट राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी झेप घेतली आणि त्यांच्या स्त्रीजन्म सार्थकी लावला. शेवटी यावर मला ओप्रा वीन्फ्रे यांचे एक वाक्य आठवते, "तुम्ही एक तर स्वतःला समुद्राच्या लाटेप्रमाणे समजू शकता अन्यथा तुम्हाला समुद्र व्हावे लागेल". जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तुम्हाला आत्मविश्वास असेल तर त्यानंतर "only sky is the limit"
- वादसभा सदस्य
श्रावणी श्रीनिवास आचार्य
खूप छान! 👌👌
ReplyDeleteस्त्रीत्वाची अप्रतिम परिभाषा 💯✨
ReplyDelete