Monday, November 23, 2020

 निर्मात्याकडून आपल्यासाठी राहिलेले आपणच निर्माण करू!


       आपण जन्म का घेतो? आपल्या अस्तित्वात येण्याचे कारण काय ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मनुष्याला मिळालेले नाहीत.मनुष्याचे जन्म-मृत्यूचे चक्र कायम फिरतीवरच. मात्र जन्मापासून ते मृत्यू पर्यंत जे  लाभलेले आहे ते आयुष्य सुंदर करता येते याची जाणीव ज्यादिवशी माणसाला होईल तो दिवस सोनियाचा! वरील प्रश्नांची उकल करण्यातच अनेक आयुष्य खर्ची जातात. त्यातले काही गौतमबुद्धा प्रमाणे होतात तर काही आयुष्यभर आयुष्याबद्दलच गोंधळात रेंगाळतात. ब्रह्मदेवासाठी पृथ्वी लोक जरी खेळ असला तरी पृथ्वीवरच्या लोकांसाठी त्यांचं-त्यांचं व इतरांचं ही आयुष्य हा एक अत्यंत गंभीर खेळच. प्रत्येकाचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. जीवनात येणाऱ्या अनुभवांमुळे प्रत्येकाची आयुष्याबद्दलची व्याख्या ही आपापली वेगळीच.  बाबा आमटेंसारख्या थोर समाज सेवकासाठी स्वतःचे आयुष्य म्हणजे दुसऱ्यांचं हित,आनंद,प्रगती.. वपु म्हणतात तसं "पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल पण उधळण व्हावी ती सुगंधाचीच", मात्र सद्गुरू सारखे योगी जे लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या ध्येय प्राप्तीसाठी मार्गदर्शन करतात पण तरी म्हणतात आयुष्याचा कधीच कोणताच ध्येय नसतोच  परंतु मनुष्य या मायावी जगात त्याच्यासाठी झटतो, जीवन कसंही असलं तरी मनुष्याच्या त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्वाचा. मात्र आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी, स्वतःला घडविण्यासाठी आहे जीवन म्हणजे स्वतःला फक्त शोधणे नाहीच , शोध त्या गोष्टींचा होतो ज्याचं अस्तित्व असतं परंतु आपल्याला हवं असलेल्या आपल्या शोधाची निर्मिती जर निर्मात्याने आपल्याला निर्माण करण्यासाठी ठेवली असेल तर...? तर आयुष्य म्हणजे स्वतःला घडवणे आणि आयुष्य सुंदर करण्याचा मार्ग तो हाच! त्या घडण्याच्या प्रक्रियेतूनच आपण आपल्याला सापडतो.शाळेत असल्या पासून ते मॅट्रिक पर्यंत व त्यानंतरही आपल्याला असं सांगितलं जातं की आपली कर्तबगारी कशात आहे ते शोधा, आपण कोणत्या क्षेत्रात उत्तम काम करू त्याचा शोध घ्या. जीवनाचा सर्वसामान्य हेतू म्हणजे  आनंद आणि समाधान. जीवनातल्या रोजच्या संघर्षाला सामोरे जाताना आनंद शोधण्याची धडपड करण्यापेक्षा असलेल्या आयुष्यातच आनंद निर्माण करायला हरकत नाही. तसेच आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये स्वतःला शोधण्यापेक्षा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आपले अस्तित्व निर्माण करावे व स्वतःला घडवावे.


     स्वतःला घडविणे म्हणजे आपली नैतिक,मानसिक,भावनिक,बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढविणे होय. त्याप्रमाणेच आपली सहवेदना(empathy) च्या मर्यादाही विस्तारित व्हायला हव्या. माणसाची माणूस म्हणून किंमत करायला शिकणं हे स्वतःला घडविण्याचे लक्षण. स्वतःला घडवायचे कसे? उत्तमोत्तम पुस्तकांचे वाचन, वाचलेले विचार आपल्या जगण्याशी जोडणे, आपल्या कामावर प्रेम करणं हे अतिशय साधे मार्ग. सर्वसामान्य माणूस हा असाच असतो. या साधेपणातच फार मोठी मनःशांती सामावलेली असते.


 इतरांच्या व स्वतःच्या चुकांमधून शिकणे हा स्वतःला घडविण्याचा उत्तम मार्ग! त्याचबरोबर या जगात संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही म्हणून संघर्षातुन माणूस घडत असतो. संघर्ष हा माणसाचा परम मित्र व्हायला हवा. ज्या प्रमाणे चंदन उगाळल्यावर त्याचा सुगंध पसरतो त्याच प्रमाणे माणूस झीझल्यावर त्याचं कौशल्य वाढतं. संघर्ष हा कोणत्याच यशस्वी माणसाला चुकला नाही आणि ज्यांनी संघर्ष केला नाही त्यांनी आयुष्याची मजा घेतली नाही आपण आपल्या संघर्षावर प्रेम करावे त्याच प्रमाणे ज्या प्रकारे आमटेंनी नुसत्या वनाचं "आनंदवन" केलं. कावळा हा एकच पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो, तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्यावर चावा घेतो, परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही, कावळ्याशी लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ वाया घालवित नाही. फक्त त्याचे तो पंख उघडतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेण्यास सुरवात करतो, खरं तर उड्डाण जितके जास्त होते, तितके श्वास घेणे कठीण जाते आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळे कावळा आपोआप कोसळतो.... माणसाने घडावे तर असे गरुडासारखे समंजसपणा, शांतता आणि, काग्रतेने परिपूर्ण असलेले.



इतरांविषयी चांगला विचार करणं, एवढंच नाही तर सरळ विचार करणेदेखील महत्त्वाचे! वाकडा विचार करू नये व नकारात्मकतेकडे जाऊच नये यासाठी आयुष्यातल्या घडामोडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला हवा. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही ठेवलेल असतं. ते ज्ञान आपण आत्मसात करायला हवे आणि त्याला उपयोगात आणावे. आयुष्य ही अनंताकडून अनंताकडे जाणारी गोष्ट आहे .त्यामुळे तिचा शोध घेण्यात तथ्य फार थोडे. मग त्याऐवजी आपल्या कर्माने इतरांचे जीवन आनंदी करणं हा नक्कीच चांगला पर्याय आहे. त्या कर्मामध्येच आपल्याला आपला शोधही लागून जातो.




Vaishnavi Kathalkar.

S.Y.B.A. - Vaadasabha Member

(Secured Third Rank In Our In-house Essay Competition)



No comments:

Post a Comment

International Day of Parliamentarism

When we hear the word ‘parliament’, the first things that cross our minds are politics, democracy, or power. As a diverse nation with an inh...