Wednesday, November 11, 2026

राष्ट्रीय शिक्षण दिन : शिक्षणाच्या स्वप्नापासून वास्तवापर्यंत


 

११ नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस, म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा दिवस!

“Education imparted by heart can bring revolution in the society.”

त्यांच्या या वाक्यातील 'revolution' हा शब्द केवळ सत्ता बदल नव्हे, तर तो एखाद्या समाजाच्या विचारांमधील परिवर्तनाची शक्यता व्यक्त करतो. कारण, शिक्षण माणसाला किंवा जगण्याचे साधन देत नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवही करून देते.

शिक्षणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी कधी कधी आपल्या देशाच्या सीमा ओलांडूनही पाहावं लागतं. अफगाणिस्तानातील परिस्थिती याचंच एक अस्वस्थ करणारं उदाहरण आहे. तालिबानच्या सत्तेनंतर मुली आणि महिलांच्या शिक्षणावर कठोर निर्बंध लादले. सहावीनंतर मुलींना माध्यमिक शिक्षण घेण्यास बंदी घालण्यात आली. नोव्हेंबर २०२६ पर्यंत २६ लाखांहून अधिक मुलींना माध्यमिक शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं.

या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे पाहिलं तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणवते की भारतात मुलींना शाळेत जाण्याचा आणि आपल्या आवडीचं शिक्षण निवडण्याचा संविधानात्मक मूलभूत अधिकार आहे. अर्थात, हा अधिकार कागदावर असणं आणि प्रत्येक मुलापर्यंत प्रत्यक्षात पोहोचणं यात अजूनही अंतर आहे. तरीही, शिकण्याचा अधिकार मान्य करणारी आणि तो विस्तारण्याचा प्रयत्न करणारी लोकशाही व्यवस्था आपल्याकडे आहे.

अफगाणिस्तानातील मुलींची बंद झालेली वर्गखोली आपल्याला शिक्षणाचं मूल्य समजावते; पण भारतातील उघड्या वर्गखोल्या आपल्याला त्याहून मोठी जबाबदारी देतात. कारण, शिक्षण उपलब्ध असणं आणि शिक्षणातून खऱ्या अर्थाने सुशिक्षित समाज निर्माण होणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि कदाचित याच दोन गोष्टींमधील अंतर समजून घेणं हीच राष्ट्रीय शिक्षण दिनाची खरी सुरुवात असावी.

आज भारतीय शिक्षणव्यवस्थेसमोर अनेक मूलभूत आव्हानं आहेत. शिक्षणातील आर्थिक आणि सामाजिक विषमता, ग्रामीण-शहरी दरी, शिक्षणाचं वाढतं व्यापारीकरण, महागडं खाजगी शिक्षण आणि NEET-UG आणि UGC-NET सारख्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरव्यवस्थापनाच्या घटनांनी परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

मात्र, या सगळ्यांपेक्षा मोठा प्रश्न असा आहे की शिक्षणाचा विस्तार होत असताना त्यातून विकसित होणारी विचारक्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक संवेदनशीलता यांचाही तितकाच विकास होत आहे का?

शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या शैक्षणिक विचारांपासून ते गांधी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या सर्वसमावेशक शिक्षणदृष्टीपर्यंतचा प्रवास समजून घेत असताना यांच्या शिक्षणविषयक विचारांकडे पुन्हा पाहिलं तर त्यांच्या विचारांमध्ये एक समान धागा दिसतो. तो म्हणजे, "शिक्षण हे माणसाला अधिक स्वतंत्र बनवणारं माध्यम आहे." त्यांच्या काळातील संघर्ष वेगळे होते; पण त्यांनी संकल्पित केलेल्या शिक्षित भारताची गरज आजही संपलेली नाही.

आपल्याला फिनलॅंड किंवा सिंगापूरची शिक्षणव्यवस्था जशीच्या तशी स्वीकारण्याची गरज नाही. भारताची सामाजिक, भाषिक आणि आर्थिक विविधता लक्षात घेऊन समान संधी आणि विद्यार्थ्यांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवणारी व्यवस्था उभी करणं आवश्यक आहे. धोरणं तयार करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकीच ती प्रामाणिकपणे राबवणं आणि त्यासाठी संस्थांना उत्तरदायी धरणंही महत्त्वाचं आहे.

राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करताना, आपण केवळ किती शाळा उघडल्या हे लक्षात घेत असताना, त्यासह शिक्षणातून किती स्वतंत्र विचार करणारे नागरिक घडले आणि किती विद्यार्थ्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य मिळवलं, हेही लक्षात घ्यायला हवं.

कदाचित शिक्षणाची खरी क्रांती तेव्हा घडेल, जेव्हा ते केवळ व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यास सक्षम करणार नाही, तर त्या यशाला मानवी मूल्यांची जोड देणारी संवेदनशील व्यक्ती आणि समाजाप्रती कर्तव्यदक्ष नागरिकही घडवेल.


- उत्कर्षा निगडे

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय शिक्षण दिन : शिक्षणाच्या स्वप्नापासून वास्तवापर्यंत

  ११ नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस, म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा द...