Tuesday, April 23, 2024

पडघवलीच्या वाटेवर...

       




काही पुस्तकं वाचताना आपण त्यातले शब्द वाचून आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर डोळ्यासमोर ती चित्र रंगवत असतो पण काही पुस्तकं अशी असतात जी वाचकाला स्वतः मध्ये ओढूनच घेतात. आपण सुद्धा त्या कथेचे एक पात्र म्हणून जगत राहतो. वर्णन केलेले दृश्य जणू कोपऱ्यातून पाहत राहतो. असंच काहीसं होतं गो. नि. दांडेकर यांचे पडघवली हे पुस्तक वाचताना. 

     पुस्तक का भावलं या आधी आप्पा म्हणजे गो. नि. दांडेकर का भावतात हे लिहिणं महत्त्वाचं वाटतं. आपल्या प्रवासावर, प्रवासात भेटलेल्या माणसांवर, आलेल्या अनुभवांवर अगदी मनाचा ठाव घेणाऱ्या शब्दात लिहिणारे हे एक प्रकारे साहित्य क्षेत्रातील मला अवलिया वाटतात. त्यांच्या मी वाचलेल्या पुस्तकांमधून कायम ते फक्त एखादी गोष्ट नव्हे तर सत्य परिस्थिती आणि आयुष्याचे सार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे वाटत राहते. अर्थात म्हणून ती गोष्ट कंटाळवाणी होते का किंवा समजण्यास क्लिष्ट वाटते का तर अजिबात नाही. 

      आपण अनोळखी ठिकाणी फिरायला जातो तेव्हा तिथली माणसं जशी आपल्याला त्या ठिकाणा बद्दल सांगत जातात तसंच काहीसं पडघवली या पुस्तकाबद्दल आहे. शीर्षकाबद्दल म्हणावं तर पडघवली हे महाराष्ट्राच्या कोकण प्रांतांतील दाभोळ जवळील एक गाव. त्या गावातील माणसं, त्यांचा इतिहास, त्या गावचा इतिहास, निसर्ग, प्रसंग अशा अनेक बाबींवर आधारलेले हे पुस्तक तुम्ही जन्मतः शहरात वाढलेले असलात, गाव म्हणजे नेमकं काय असं विचारणारे असलात तरी सुद्धा तुम्हाला एका खेडेगावाची सैर घडवून आणण्याची ताकद ठेवते. पुस्तकात नेमकं काय आहे हे आणखी सांगावं म्हटलं तर अख्खं पुस्तक सांगितल्या सारखं व्हावं त्यामुळे पुस्तक वाचून आपल्याला काय मिळतं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. 

       २५६ पानांची ही कादंबरी अंबा नावाच्या एका पात्राने एखादी गोष्ट सांगावी अशा स्वरूपात लिहिलेली आहे त्यामुळे हमखास हे पुस्तक वाचताना आपल्या आजीआजोबांनी आपल्याला एखादी त्यांच्या काळातील गोष्ट सांगावी आणि आपण त्यात रमून जावं असे भास होत राहतात. १९५५ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक मुळात तेव्हाची गावं, आत्ताची गावं, बदलणारं स्वरूप अशा साऱ्यावर मौन भाष्य करून जातं असं मला वाटतं. कोकणात राहणाऱ्या, गावाकडल्या लोकांना आपलंस वाटावं असं हे पुस्तक "हल्ली बदललंय हो सगळं" असं म्हणणाऱ्यांच्या या बोलांचे साक्षीदार ठरतं. 

        कोकणातील समुद्रालगतची गावं सोडता इतर गावांची गाव म्हणून ओळख अजूनही टिकून आहे पण पैसापाण्यासाठी बाहेर गावी राहणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत जाते आहे. आपल्या आजी, आजोबा, काका, बाबा, आत्या यांच्याकडे त्यांच्या लहानपणीच्या आपल्या गावाबद्दलच्या आठवणी अनेक आहेत पण आपल्याकडे मोजून एक सुद्धा नाही. गावाचा देव नेमका कुठे हेच काय तर म्हणजे काय हे सुद्धा आम्हांला माहिती नाही. आमच्या आमच्या चार खोल्यांच्या फ्लॅट मध्ये आम्ही दोन माणसं राहतो त्यामुळे खालच्या आळीत राहणारे आणि मधल्या आळीत राहणारे कोण, त्यांचा आपला संबंध काय, त्यांच्याशी माणुसकीने राहणं म्हणजे काय हे आमच्या गावीच नाही. अशा कोरड्या जगात जगणारे आपण सगळे आणि अशावेळी माणसामाणसातील आत्मीयता किंवा काही प्रसंगी उद्भवणाऱ्या छोट्या मोठ्या कुरबुरी दाखवत, कोकणातल्या निसर्गाची आपल्यावर मुक्त उधळण करत पडघवली काही क्षणांपुरता तरी आपलं जग भावनांनी गजबजवून टाकते. 

         पडघवलीची वाट मी जरा उशीराच धरली पण मनाने तिथून परतले नाही. सिमेंटच्या जगात हरवलेले आपण हल्ली अशा सुंदर साहित्यापासून सुद्धा दुरावलेले आहोत याची खंत वाटते त्यामुळे पुस्तक समिक्षा अशी नव्हे पण हा लेख आणखी किमान ५ जणांसाठी पडघवलीच्या वाटेवरचा वाटाड्या ठरेल इतकीच छोटी आशा.

- Maitreyee Sunkale

No comments:

Post a Comment

Polymers of Our Progress

On this auspicious occasion of World Environment Day, let’s take a moment to delve in one of the strangest “Evolutionary” headlines you coul...