Wednesday, April 24, 2024

अनुदिनी


दिलीप प्रभावळकर एक उत्कृष्ट सीने अभिनेते, दिग्दर्शक तसंच एक लेखक सुद्धा आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप फक्त मराठी इंडस्ट्रीतच नव्हे, तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील यशस्वीरित्या उमटवली आहे.  'झपाटलेला' तील तात्या विंचू तर 'धरलं तर चावतय' मधील टोणग्या या त्यांच्या काही लोकप्रिय भूमिका आहेत. याचबरोबर त्यांनी 'तू तू मैं मैं ' सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्येही विशेष भूमिका साकारून हिंदी इंडस्ट्री गाजवली आहे. दिलीप जी एक उत्कृष्ट अभिनेते व दिग्दर्शक तर आहेतच, शिवाय ते तितकेच गुणवान लेखक आहेत. त्यांचे अवतीभवती, गुगली, कागदी बाण, चूक भूल द्यावी घ्यावी, बोक्या सातबंडे हे लेखन प्रसिद्ध! ' बोक्या सातबंडे ' या पुस्तकासाठी 'बालसाहित्य पुरस्कार' संगीत नाटक अकादमीचा 'राष्ट्रीय पुरस्कार' देखील प्राप्त झाला आहे. त्यांच्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तकावर मराठी चित्रपट व 'अनुदिनी' या पुस्तकावर मराठी मालिका चित्रित करण्यात आले आहे.

मुळात अनुदिनी हे वास्तविक एक पुस्तक नसून एका डायरीचे स्वरूप वाटते! याचे कारण म्हणजे दिलीप जींचे मार्मिक, सोप्प, नाकासारखं सरळ व त्यांच्या एवढेच निर्मळ लेखन. त्यांनी अनुदिनी पुस्तकात खरोखर वैचारिक पात्रांची निर्मिती करून त्यांची रोजनिशी लिहिलेली आहे. आपापल्या परीने वाजवी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब डायरी लिहिते, अशी कल्पना करून, त्यांच्या टीकाटिप्पणी मधून दिलीप जींने वर्षभरातल्या घटनांचा घेतलेला वेध म्हणजे अनुदिनी! तसं पाहिलं तर आजच्या काळात वासरी लेखन व पुस्तकात किंवा पुस्तकांच्या द्वारे डायरी लेखन म्हणजे दुर्मिळच! यावा श्री लेखनासाठी दिलीप प्रभावळकरांनी स्वप्नातून विचारात व विचारातून कागदावर (नंतर कागदावरून छोट्या पडद्यावर) उतरवलेले कुटुंब म्हणजे टिपरे कुटुंब. हा एक 'हम दो हमारे दो' वाला चौकोनी परिवारात आहे; पण त्याला साज चढवते त्यांच्या कुटुंबातील आश्चर्य 'आबा!' टिपरे परिवारात स्वतः आबा व त्यांचा मुलगा-सून व दोन नातवंड (एक नात , एक नातू) गुण्या - गोविंदाने नांदतात असे वाचकाला स्पष्ट होते. या पुस्तकात त्यांनी प्रत्येक पात्राची वेगळी रोजनिशी लिहिलेली आहे;  भले ते  वयोवृद्ध आबांचे पात्र म्हणून अथवा तरुण नातवाचे पात्र म्हणून असो.

दिलीप प्रभावळकरांनी स्वतः एका मुलाखतीत म्हटले होते की ते स्वतःला त्या पात्राच्या जागी ठेवून त्याच्याबद्दल लिहायचे रादर त्याच्याबद्दलचे लिहायचे. पुढे ते म्हणतात की त्यांना स्वतःला मुलगी आणि बहिण नसल्यामुळे त्या स्वतःलाच एक सून, एक बायको, एक मुलगी, एक बहीण.... समजून स्त्रीपात्रांबद्दलचे लिहायचे. डायरी लेखनात शक्यतो दिलीप जी प्रत्येक पात्राला होणाऱ्या त्रासाबद्दल, अडचणींबद्दल, स्तुती बद्दल, स्पर्धेबद्दल, लिहायचे ज्यामुळे वाचक वर्गाच्या काळजात घर केलं जायचं. ते पात्र समाजातील प्रत्येक घटकाचे उत्तरदायित्व करून स्वतःबद्दल बोलायचे ज्यामुळे वाचकाला त्याचं म्हणणं पटेल आणि वाचकाला 'आपल्या सोबतही असंच घडतं!' ही भावना निर्माण होईल.

उदा., आबांची डायरी लिहिताना सीनियर सिटीजनला होणारे त्रास, वाटणारी भीती, सहवास, त्यांच्यासोबत असलेला सुनेचा- मुलाचा व्यवहार....... अशा गोष्टी ते अधोरेखित करीत. तसंच मुलगा या भूमिकेबद्दल लिहिताना ते पुरुषांवरील कुटुंबाची जबाबदारी, बॉसची कटकट, वाढीव खर्च, मुलांचे हट्ट, बायको - वडिलांच्या मागण्या, बाप म्हणून मुलीबद्दल वाटणारी काळजी...... या गोष्टींचे समर्थन केले जायचे. सून बनून जेव्हा दिलीप जी लिहायचे तेव्हा ते महागाई, शेजारणींशी गप्पा - टप्पा, गृहकृत्यदक्षपणा, सासर्‍याला वडिलांसम मान देणे, नवऱ्याचा राग झेलणे, मुलांच्या आवडीनिवडी जपणे आणि त्यांचे मूळ सांभाळणे, कामवाल्या मावशिंसोबतचे संवाद, सासऱ्यांचे पथ्यपाणी सांभाळणे.... अशा गोष्टी नमूद करत. नातवंडांचे डायरी लिहिताना त्यांना वाटणारे आकर्षण, शाळा कॉलेजचे किस्से, कुमार वयात वाटणारे न्यूनगंड या बाबींचा आवर्जून उल्लेख करायचे. या पात्र वैशिष्ट्यांमुळे ' अनुदिनी 'लोकांच्या पसंतीस पडले. 

हे पुस्तक इतके प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले की २०००च्या काळात केदार शिंदे (सुप्रसिद्ध दिग्दर्शक) यांना यावर एक मालिका बनवावीशी वाटली. त्यांनी याबद्दल दिलीप जींची परवानगी घेतली आणि २००१ साली अनुदिनीवर आधारित मालिका प्रसारित झाली ज्याचे नाव होते श्रीयुत गंगाधर टिपरे. यातील मजेदार किस्सा हा की केदार शिंदे यांनी दिलीप जींना त्यांनीच लिहिलेली आबांची भूमिका साकारण्यास विनंती केली आणि दिलीप जींनी होकार भरला. मग आबांना केंद्रस्थानी ठेवून मालिका बनवली आणि या मालिकेलाही प्रेक्षकांचे चिरंतन आशीर्वाद व प्रेम मिळाले. 

- Aaryan Padhye

No comments:

Post a Comment

Where Presence Becomes the Journey

  One of my most surreal experiences has been standing in front of the Ganga on a quiet evening, where the water keeps moving, bells ring in...