Tuesday, July 26, 2022

संत नामदेव महाराज



आई-वडिलांच्या सेवेत गुंग असणाऱ्या पुंडलिकाच्या दारी साक्षात परब्रम्ह भेटीस आले होते. परंतु पुंडलिकाने त्यांना सांगून टाकले की, "जोपर्यंत माझ्या आई-वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुला भेटू शकणार नाही. " पुंडलिकाने त्याला एक वीट देऊन साक्षात परब्रह्मास सांगितले की मी येईपर्यंत तू माझी वाट बघ. परंतु या परब्रम्हाचे दर्शन संपूर्ण विश्वाला व्हावे म्हणून पुंडलिक कधी परत आलाच नाही. असा हा पांडुरंग युगे अठ्ठावीस कडेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि जिथे तो उभा आहे त्या गावचे नाव पंढरपूर. आज या पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी असीम भक्त येत असतात. आणि याच पावनभूमीत एक देवखुळा देववेडा भक्त राहून गेला. ज्यांनी असंख्य अभंग रचलीत. ज्यांनी त्यांच्या वाणीतून भागवत धर्माचा प्रसार केला.जे पांडुरंगाच्या पायथ्याशी समाधीस्थ झालेत. असे संत शिरोमणी नामदेव महाराज. दामशेट आणि गोणाई या दांपत्याच्या घरी   जन्मलेला हा पुत्र. जनाईच्या प्रेमाच्या सावलीत वाढलेला हा लहानगा नामदेव अगदी लहानपणापासूनच पांडुरंगाच्या भक्तीत रंगून जायचा. याच्या संपूर्ण मनाने कधी पांडुरंगाकडे धाव घेतली हे कोणाला  समजलेच नाही. एकदा लहानगा नामदेव नैवेद्य घेऊन पांडुरंगाकडे गेला माझा नैवेद्य पांडुरंग का खात नाही, तो का जेवत नाही म्हणून तो तिथे रडू लागला. हट्ट करू लागला की हे पांडुरंगा मी आणलेले जेवण तू जेव. त्याचा हा भोळा भाव त्याचा हा भोळा हट्ट पाहून साक्षात पांडुरंग तिथे प्रकट झाले आणि त्यांनी नामदेवांनी आणलेले जेवण जेवले. आणि त्यानंतर नामदेवांची आणि पांडुरंगाची मैत्री झाली.  

 आठव्या वर्षी नामदेवाचे लग्न झालं परंतु नामदेव काही प्रपंचात  लक्ष देईनात. दिवस-रात्र ते रावळात राहून पांडुरंगाची सेवा करायचे त्याच्या भक्तीमध्ये गढून  जायचे. सुरुवातीला नामदेव फक्त मूर्तीपूजामध्ये विश्वास ठेवायचे त्यांना वाटायचं की मूर्तितच देव आहे. जात वंश धर्मभेद मानणाऱ्या नामदेवांचा अजून ब्रह्मज्ञानी होण्याकडेचा  प्रवास सुरु व्हायचा होता. आणि अशातच त्यांची भेट  संत ज्ञानेश्वर, सोपाननाथ, निवृत्तीनाथ, मुक्ताई, गोरा कुंभार यांच्याशी झाली. आणि त्यांची भेट झाली आणि नामदेवांना कळले की अजूनही आपण खऱ्या भक्ती मार्गावर नाही आहोत. आत्मज्ञानासाठी, आत्मसुखासाठी, ज्ञानमुद्रेसाठी आपल्याला कोणा एका गुरुची गरज आहे हे लक्षात येतातच. त्यांनी विसोबा खेचर यांच्याकडे धाव घेतली. 
 
     परिसाच्या संगे लोह होय सुवर्ण | तैसा भेटे नारायण सतसंगे || 

नामदेवांनी त्यांच्या या अभंगातूनच सांगितलेला आहे की , जसे परिसाच्या सानिध्यात लोखंड येते तेव्हा त्या लोखंडाचे सोने होते तसेच आपण एका गुरुच्या सानिध्यात गेलो तर आपणही ज्ञानी होतो. संत नामदेव यांनी विसोबा खेचर यांना आपले गुरु मानले. आणि अशाच प्रकारे विसोबा खेचर यांच्यामुळे संत नामदेवांच्या जीवनात खूप क्रांती घडली. देव फक्त मूर्तीत  नाही तर तो  सर्वत्र आहे देव हा माणसात आहे देव हा पशु पक्षांमध्येही आहे. तो चराचरात आहे. हे त्यांना समजले. जात, धर्म, वंश  यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही. सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत आणि त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. त्यांच्या या शिकवणीमुळे आजतागायतही माणुसकीचे नवे धडे गिरवले जात आहेत.
 
संत नामदेवांनी असंख्य अभंग रचलीत. त्यांच्या या अभंगावाणीतूनच त्यांनी लोकांना माणुसकीचा, भक्तीचा लोककल्याणाचा नवा मार्ग दाखविला. त्यांचे अभंग अतिशय सोपे रसाळ व प्रासादिक आहेत. शुक्र, नारद महादेव, श्रीकृष्ण कुणालाही नामदेवांनी अभंगात वगळलं नाही. पांडुरंगाची आरती कोणाची जर अतिशय प्रसिद्ध असेल तर ती संत नामदेवांची.

           युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
            वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा 
            पुंडलिका भेटी परब्रह्म आलें गा 
            चरणी वाहे भीमा उद्धरी जगा  || 
             जय देव जय देव जय पांडुरंगा 
      रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ||

 एकदा संत ज्ञानेश्वरांनी संत नामदेवांकडे तीर्थयात्रा करण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांच्या या इच्छेचा आदर करत संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांनी एकत्र तीर्थयात्रा केली. नाशिक, त्र्यंबक, हरिश्चंद्र पर्वत असं एकेक पहात ते दोघे पश्चिमेकडे वळले द्वारका, प्रयाग इत्यादी तीर्थ त्यांनी पाहिली नरसी मेहता सारख्या गुजराती भाषिक संत मंडळींच्या त्यांच्या भेटी झाल्या.  तिथून ते दोघे राजस्थानात वळले सिद्धपूर, अबूतपर्वत, एकलिंगजी अशा ठिकाणी त्यांनी भेटी घेतल्या. संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सानिध्यात बराच काळ एकत्र घालविला.        

 तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली. नंतर सोपाननाथांनीही समाधी घेतली. आणि त्यानंतर एका प्रचंड वादळात होणाऱ्या  एका विजेच्या कल्लोळाबरोबर मुक्ताईसुद्धा गुप्त झाली. त्र्यंबकेश्वर मध्ये निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. 
   या चारही भावंडांचा आपल्या जीवनात नसण्याच्या दुःखामुळे संत नामदेव अगदी खचून गेले. संत ज्ञानेश्वर यांच्यासोबत घालविलेला काळ संत नामदेवांना सतत आठवू लागला. तो काळ त्यांच्यासाठी अतिशय अवघड काळ होता. 
   नामदेवांची पंजाब यात्रा कोणास ठाऊक नाही. संत नामदेवांनी पंजाब मध्ये भागवत धर्माचा प्रसार केला. तिथली ती साधी भोळी माणसं त्यांना आवडली त्यांच्यासाठी ते हिंदीत अभंग रचू लागले. 

     उत्तम नरतनु  पाया रे भाई | गाफील  क्यों हुआ दीवाने जू||  

 याचा अर्थ ' अरे , हा उत्तम नरदेह मिळाला आहे त्याचे काही सार्थक करा असे गाफील का झाला आहात ? 
  असे पंजाब वर हिंडता फिरता नामदेव गुरुदासपूर जिल्ह्यात आले तिथे घुमान नावाचं गाव ते त्या गावी रमले जवळजवळ वीस वर्ष संत नामदेव हे घुमान गावातच राहिलेत. गुरुसाहेब ग्रंथात संत नामदेव यांच्या अनेक अभंगांचा समावेश आहे.  
  संत नामदेव आपल्या वृद्धापकाळपर्यंत पंजाब मध्ये राहिलेत. त्यानंतर इंद्रियातलं बळ  उनावू लागलं आणि मग त्यांना पंढरपुराचे स्मरण झालं. शरीर ठेवायचं ते पांडुरंगाच्या पायापाशी अशी त्यांची इच्छा होती. आणि मग ते परत पंढरपुराला निघून आले.   संत नामदेव रावळाच्या ओसरी मध्ये पांडुरंगाच्या चरणी बसले. शरीर त्यागायचं ते पांडुरंगाच्या रावळाच्या पायरीपाशीच. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या संत जनांच्या पायाची धूळ त्यावर उडेल. म्हणून ते ओसरीतून उठले. चालता येत नव्हते तरीही ते पायऱ्यांकडे जात होते. एकेक पायरी उतरत होते शेवटची पायरी आली आणि शरीरातलं बळ हरपल संत नामदेव खचून खाली बसले त्यांनी पायरीवर मस्तक ठेवलं आणि त्यांचे प्राण शरीर सोडून निघून गेल   पांडुरंगाच्या भेटीसाठी.  

आज त्यांच्या पुण्यतिथी दिवशी भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांना मी विनम्र अभिवादन करते.
  धन्यवाद
                              - संस्कृती पाटील
                                 वादसभा सदस्य

संत जनाबाई

 संत जनाबाई ( १२५८ - १३५० ) या तेराव्या शतकातील महान व थोर कवयित्री होत्या.  त्यांचा विठ्ठलाप्रती असलेला भक्तिभाव नेहमीच सर्वांसाठी आदर्श ठरला आहे.

        संत जनाबाईंचा जन्म परभणीमधील गंगाखेड येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर काही वर्षांतच त्यांची आई निधन पावली. तेव्हा त्यांचे वडील त्यांना दामाशेट यांच्याकडे पंढरपूराला घेऊन गेले. दामाशेट, म्हणजेच संत नामदेव महाराजांचे वडील, यांनी जनाबाईंना आश्रय दिला. तेथे जनाबाई घरातील सर्व कामे करू लागल्या.  दामाशेट यांच्या घरी सतत अभंग, कीर्तन - जागर होत असत. त्यामुळे जनाबाईंचे मन खूप लहानपणापासूनच पांडुरंगाच्या भजन - कीर्तनामध्ये रमू लागले. संत नामदेव महाराजांचे निरूपणही त्यांना नेहमी ऐकायला मिळायचे. त्यामुळे संत नामदेव महाराजांना जनाबाईंनी त्यांचा पारमार्थिक गुरू मानले होते. 
           जनाबाईंनी भाव - भक्ती, बालक्रिडा, प्रल्हादचरित्र अशा अनेक विषयांवर अभंग लिहिले आहेत. जनाबाईंचे अभंग साध्या - सोप्या भाषेत असल्यामुळे सर्वसामान्यांना सहज समजतील असे आणि सर्वांच्याच हृदयाचा ठाव घेणारे असत. 
            जनाबाईंनी विठ्ठल - भक्तीत स्वतःला समर्पित केले होते. त्या कोणत्याच मोहपाषात अडकल्या नव्हत्या. कोणतेही काम करताना त्यांच्या मुखात सतत पांडुरंगाचेच नामस्मरण चालू असे.





एकदा गोवऱ्या थापत असताना तेथे एक स्त्री त्यांच्याशी भांडू लागली की या सर्व गोवऱ्या तिच्या आहेत. तेव्हा संत जनाबाई म्हणाल्या की, "ज्या गोवरीमधून 'विठ्ठल - विठ्ठल' असा आवाज येईल ती गोवरी माझी आणि ज्यातून येणार नाही ती तुझी. कारण गोवऱ्या थापताना मी विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते." मला असे वाटते की या प्रसंगातून जनाबाईंचा स्वतःवर आणि स्वतःच्या भक्तीवर दृढ आत्मविश्वास होता हे समजते. त्या स्त्रीसमोर त्यांनी त्यांचा खरेपणा सिद्ध केला. नामस्मरणात आणि एकनिष्ठ भक्तीमध्ये किती शक्ती असते याची ग्वाही देणारा हा प्रसंग आहे. 
             जनाबाईंचे अभंग ऐकताना मला नेहमी असं जाणवतं की त्यांचे अभंग हे सजग भक्ती कशी असावी, परमेश्वराशी एकरूपता कशी आणि भगवंताचे थोर आत्मज्ञान कसे अंगिकारावे हे अगदी सहज - सोप्या शब्दांत उलगडून सांगतात. त्यांच्या अभंगामध्ये इतकी आत्मीयता आणि उत्कटता आहे की ते ऐकताना आपणही परमेश्वराशी एकरूप होऊन जातो. 
              अशा या थोर संत कवयित्री जनाबाई सन १३५० रोजी आषाढ कृष्ण त्रयोदशीला पंढरपूर तीर्थक्षेत्री समाधीस्थ झाल्या. त्यांच्या एका काव्यरचनेची एक सुंदर ओळ अशी आहे - 
        "एक ना, अवघे सार । वरकड अवघड ते असार ।
          नाम फुकट चोखट ।  नाम घेता न ये वीट ।।"

आज, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, संत जनाबाई व त्यांच्या अतुल्य भक्तीला सादर वंदन!

                  - चैत्राली तुळजापूरकर
वादसभा सदस्य

Wednesday, July 13, 2022

गुरूच्या पलीकडील गुरू कसा जाणावा?

   किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन च ।

    दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम् ॥

      गुरुशिवाय जीवनाला अर्थ नाही हे खरेच आहे, मात्र गुरू कोणाला म्हणावं आणि गुरूचा आदर कसा करावा या दोन गोष्टी लक्षात आल्या की माझ्यामते गुरुपौर्णिमेचं महत्त्व समजायला फार वेळ लागणार नाही. अगदी लहानपणापासून आपल्या आजूबाजूला अनेकजण वावरत असताना त्यातला प्रत्येक जण काही ना काही शिकवत असतो. अगदी आईने टाकायला शिकवलेलं पहिलं पाऊल आणि बालवाडीत बाजूच्या मुलाने पेन्सिलीला शार्प कसं करायचं हे शिकवणं, तिथपासून जो प्रवास सुरु होतो तो कधीच एका टप्प्यावर येऊन थांबत नाही. प्रत्येक दिवसाला नवीन गुरू सापडत राहतो आणि या गुरुमय व्यक्तींचा आपल्या मनामध्ये एक संच होतो. केवळ याच दिवशी गुरुबद्दल आदर व्यक्त केला तरच खरी गुरुदक्षिणा असे अजिबात नाही, तर अगदी रोजच्या बोलण्यात, वागण्यात, शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत गुरुबद्दल श्रद्धा ठेवणं आणि शिष्याची मर्यादा पाळणं हे खरं गुरुतत्त्व ठरू शकेल.

      आता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकवणारे सारे जरी गुरू असले, तरी हेतू आणि साधन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कधीतरी चुकीची गोष्ट शिकवली जाते आणि हल्लीच्या काळात मुलं अश्या मित्रांना आपला जवळचा मित्र मानतात. आपण आपल्या मित्राला जरी गुरू मानायचे संस्कार देत असलो, तरी ज्या व्यक्तीचा हेतू चांगला नाही, तो गुरू असूच शकत नाही. गुरू शिष्याला पुढे नेतो, त्याला मार्गदर्शन करतो, त्याला दिशा देतो. त्याचं साधन हे विद्या असतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट शिकताना आज समोरच्याची पारख करणं गरजेचं झालेलं आहे. हे झालं गुरुबद्दल! पु.ल. म्हणतात, केवळ गुरूला पारखून उपयोग नाही तर शिष्याला सुद्धा पारखण गरजेचं आहे. भगवद्गीता ही पाच पांडवांपैकी कुणालाही सांगता आली असती, मात्र श्रीकृष्णानी ती अर्जुनालाच संबोधित केली. इथे गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याचा कस लागतो. व.पु. म्हणतात, तुमचा अनुभव हाच खरा गुरू. कारण प्रचिती आल्याशिवाय माणसाला आजवर जगणं कळलेलं नाही. या दिवसाचं जितकं अध्यात्मिक महत्व आहे तितकंच प्रत्येकाच्या आकलनाप्रमाणे गुरू-शिष्याचा आवाका आहे. 

दाविला मार्ग, खरा गुरू तोचि झाला,

ज्ञानाच्या पात्रा शिष्य अखंडी न्हाला||


सायली रानडे 

वादसभा सदस्य

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व स...