भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान देणाऱ्या असीमा चॅटर्जी असोत किंवा लढाऊ विमान एकट्याने चालवणाऱ्या अवनी चतुर्वेदी असोत, आता असे एकही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी आपल्या कामगिरीची छाप पाडलेली नाही. महिलांना यशस्वी होण्यासाठी आणि पंख पसरून उडण्यासाठी आभाळ खुले करून देणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतातील स्त्रियांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत पेटवली.
माणूस हा जगातील एकमेव विचार करणारा प्राणी आहे. परंतु माणसाच्या बुद्धीला ज्ञानाची सांगड नसेल तर तो माणूस म्हणून ओळखला जाऊ शकतो का? असा प्रश्न सावित्रीबाई फुले आपल्या "त्यास मानव म्हणावे का?" या कवितेतून विचारतात. त्या म्हणतात:
ज्ञान नाही, विद्या नाही
ते घेण्याची गोडी नाही
बुद्धी असूनही चालत नाही
त्यास मानव म्हणावे का?
या ओळींतून स्पष्ट होते की माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी जर काही उपयोगी असेल, तर तो विद्या-धर्म आहे. विद्या देणारा आणि विद्या घेणारा यांच्या एकत्रिकरणातूनच एक चांगला माणूस घडतो. विद्या देणारा हा धैर्यशील असतो, तर विद्या घेणारा शक्तिशाली व शहाणा बनतो. हा विचार समाजाला पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म शिक्षणाच्या अभावाच्या काळात ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. शिक्षणाच्या प्रकाशाचा अभाव असलेल्या त्या काळात सावित्रीबाईंनी भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण बऱ्याचदा म्हणतो, "आम्ही सावित्रीच्या लेकी, सावित्रीची मुलं," परंतु खरोखरच आपण सावित्रीबाईंच्या विचारांवर चालतो का? आजच्या युवा पिढीतील प्रयत्नांची आणि संयमाची कमतरता पाहता असे वाटते की संघर्षाच्या भीतीने जर सावित्रीबाईंनी त्यांचे ध्येय अर्धवट सोडले असते, तर आज आपल्या घरात शिक्षणाची गंगा वाहिलीच नसती. त्या काळात मुलींचा जन्म नकोसा वाटत असताना सावित्रीबाईंनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्त्रियांना सक्षम आणि स्वावलंबी बनवले. पण आजही काही लोक शिक्षणाप्रती असलेल्या बेजबाबदारपणामुळे आणि समाजातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाटते की सावित्रीबाईंच्या कष्टांची आणि त्यागाची आपल्याला खरोखर जाणीव आहे का?
तरीही, सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कमलादेवी चट्टोपाध्याय, मेधा पाटकर, चित्रा नाईक, शाहीन मिस्त्री यांसारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्तींनी समाजातील दुष्ट रूढी-परंपरांना नाकारले आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील अनेकांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदावर पोहोचल्या आणि गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक झाल्या, तसेच मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही कार्यरत राहिल्या. सावित्रीबाईंच्या विचारांनीच आज मी माझे विचार लेखणीद्वारे मुक्तपणे मांडू शकते. त्यामुळे असं वाटतं:
सावित्रीचा घेऊनी वसा, गाठतो आम्ही उंच शिखरे
दुष्ट परंपरेचा पिंजरा तोडूनी, मुक्त झाली पाखरे
ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला वंदन आणि शतकोटी प्रणाम!
- श्रुती शिंदे