Wednesday, August 25, 2021

                प्रश्न पदकांच्या गणतीचा नाही,

              भारतीयांच्या मानसिकतेचा आहे!

 आजपर्यंतच्या भारताच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला, तर प्रत्येक विकासबिंदू 'मानसिकता' या अडथळ्यावर आदळताना दिसतो. आपल्या भारत देशाने नुकतेच 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्याची पंचाहत्तरावी पहाट पाहिली. स्वातंत्र्यपूर्व भारत आणि आजचा भारत यांच्यात खरोखरच जमीन-अस्मानाचा फरक आहे. मात्र तरीही बहरलेल्या वृक्षावर असलेली कीड जशी वृक्षाचा विकास खुंटवते, तसेच भारताच्या बहरत चाललेल्या क्रीडाक्षेत्राला संकुचित मानसिकतेची कीड मागे खेचत आहे. ऑलिम्पिक स्पर्धांचा थोडक्यात इतिहास असा की सुरुवातीला ग्रीसमधील 'ऑलिम्पिया' या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन केले जायचे. कालांतराने ग्रीसच्या ऱ्हासाबरोबर या स्पर्धा बंद पडल्या. मात्र, त्यानंतर फ्रेंच क्रीडापटू 'बॅरन क्यूबर्टीन' यांनी स्पर्धा सुरू केल्या व त्यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली. आज या स्पर्धेत दोनशेहून अधिक देश सहभाग घेतात. हल्लीच टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने एक सुवर्णपदक, तर दोन रौप्य व चार कांस्य पदक मिळवीत यश संपादन केले आहे. यासाठी अनेक भारतीयांनी कौतुक व्यक्त केले असले तरी दुसरीकडे अनेकांनी 'क्रीडा क्षेत्रात अजूनही तितकीशी प्रगती झाली नाही', 'पदकांची संख्या फारच कमी आहे', 'भारतातील खेळाडू पदके मिळवण्यात मागे राहत आहेत' अशा टीका केल्या. त्यांचे असे म्हणणे अगदीच चुकीचे नाही. मात्र, क्रीडा क्षेत्र विकसित करायचे असेल, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये यश संपादन करायचे असेल तर जनता व सरकार दोघांनीही आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. भारत हा अजूनही विकसनशील देश म्हणून गणला जातो. अजूनही भारताचे लक्ष पायाभूत सुविधांकडेच आहे. जनतेच्या आर्थिक स्थितीचा विचार केला तर अजूनही 'खेळ' आपल्याला 'कीर्ती व पैसा' मिळवून देईल हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झालेला नाही. आपल्या भारतामध्ये युवापिढीला असलेले क्रिकेटचे वेड जगजाहीरच आहे आणि यात काही वावगे असण्याचे कारणही नाही. परंतु, क्रिकेटसोबत अजून अनेक खेळ आहेत ज्याबद्दल तितकीशी जागृती झालेली नाही.  

मागच्या दहा वर्षांमध्ये वळून पाहिले तर सांघिक खेळांसोबत आता टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, भालाफेक यांसारखे वैयक्तिक खेळ आपले स्थान निर्माण करत आहेत. मात्र, यापलीकडे व्हॉलीबॉल, तायक्वांदो, रग्बी, धनुर्विद्या यांसारखे अनेक खेळ आहेत ज्यामध्ये भारताला यश संपादन करता आलेले नाही. यासाठी अनेक कारणे आहेत. सद्य परिस्थितीचा विचार केला तर 'कोरोना'चे सावट क्रीडाक्षेत्रावर सुद्धा पडले आहे. यावर्षी अनेक खेळाडूंना कित्येक स्पर्धा तसेच ट्रेनींग्सना मुकावे लागले. मात्र हे यावर्षीचे झाले, परंतु याहीव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्राला आपण करिअर म्हणून किती गंभीरपणे पाहतो, आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या खेळांमध्ये भविष्य घडवण्यासाठी किती प्रोत्साहन देतो तसेच सरकार भारतीय खेळाडूंसाठी काय आणि कशी व्यवस्था करते, ह्या सर्वच गोष्टी विचार करायला भाग पडणाऱ्या आहेत. कितीही नाकारले तरी खेळाडूंकडे होणारे दुर्लक्ष, अपुरा निधी, भ्रष्टाचार, क्रीडासामग्रीचा अभाव या गोष्टी अजूनही भारतामध्ये क्रीडा क्षेत्रातील उज्वल भविष्याला बाधा आणत आहेत. सांघिक खेळांना येणारा खर्च जास्त असतो. मात्र, अशावेळी 'स्पॉन्सरशीप' चा मुद्दा डोके वर काढतो. भ्रष्टाचारामुळे नवीन व प्रतिभावान चेहरे समोरच येत नाही आणि मग उत्कृष्ट खेळणारा खेळाडू सुद्धा प्रसिद्धीपासून मागे राहतो. स्त्री-पुरुष यांना मिळणारे मानधन यामध्ये सुद्धा बरीच तफावत आढळते. तसेच अनेकदा स्त्री खेळाडूंना लैंगिक शोषण, मानसिक छळ सहन करावा लागतो. यामुळे स्त्री वर्गाची क्रीडा क्षेत्रातील संख्या कमी दिसते. एक भारतीय खेळाडू एखाद्या लहान गावातून त्याच्यामध्ये असलेल्या प्रतिभेमुळे आपली ओळख निर्माण करतो, तोपर्यंत त्या गावामध्ये ना विकास झालेला असतो ना पुरेश्या जगण्याच्या सोयी. अर्थातच, क्रीडाक्षेत्रासंबंधी जागृती असणे फारच दूरची गोष्ट आहे. आपल्याच देशातील काही लोक उठून जेव्हा स्त्रियांना बंधने घालू पाहतात, तेव्हा लाखांतील एक 'हमारी छोरिया छोरोंसे कम नहीं' असं म्हणतो. सध्या अनेक खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक्स येत आहेत. त्यातूनही कुठे ना कुठे समाजाची क्रीडाक्षेत्राबद्दल असलेली संकुचित वृत्ती दिसते. मात्र, सगळाच समाज असा नसतो हेही तितकंच खरं!

 एकंदरीत पाहिलं, तर माझा मुलगा किव्वा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर व्हावी, परंतु एक खेळाडू नको असंच बहुतेकांना वाटतं आणि ते गैरही नाही. कारण भारतात 'स्पोर्ट्स' मध्ये करिअर तेव्हाच घडतं, जेव्हा खेळाडूला स्वतःची ओळख निर्माण करता येते. प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट असेल, असं नक्कीच असणार नाही आणि अशांसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होणं जास्त गरजेचं आहे. आपल्या भारतामध्ये शाळा-कॉलेजांमध्ये खेळाच्या तासाला महत्व कमी दिलं जात असेल आणि असं असतानाही देशाला जास्त पदकांची अपेक्षा असेल, तर या चित्रांमध्ये खूपच विसंगती आहे. अनेक खेळाडू जेव्हा सुरुवातीला स्पर्धा-प्रशिक्षणे करतात, तेव्हा बऱ्याचदा इतका खर्च करण्याची त्यांची आर्थिक स्थिती नसते. अशावेळी त्यांना वेळेवर अनुदान मिळते का आणि हे अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. समाजामध्ये अजूनही शिक्षण व क्रीडा यामध्ये क्रीडाक्षेत्राला शेवटचे स्थान मिळते, किंबहूना मिळतच नाही. परंतु जेव्हा भारतीय संघाचा सामना टीव्हीवर लागतो, तेव्हा आणि त्या वेळेपुरताच आपल्यातला खेळाडू आणि समर्थक जागा होतो. ही परिस्थिती हळूहळू का होईना परंतु बदलणे गरजेचे आहे. जनता व सरकार दोघांनीही मानसिकता बदलायला हवी. क्रीडाक्षेत्र हा देखील करिअरचा उत्तम मार्ग आहे, हे पालकांनी व मुलांनी लक्षात घ्यायला हवे आणि सरकारनेही क्रीडाक्षेत्र अजून कसे विकसित होईल याकडे लक्ष द्यायला हवे! 

- सायली निलकंठ रानडे

Wednesday, August 18, 2021

    ऑलिंपिक मधिल दुर्लक्षित खेळांची भारताला साद

         परवा भारताला निरज चोप्राने गोल्ड मेडल मिळवून दिल्याची बातमी आली, आणि 1920 साली नॉरमन प्रिटचर्ड ने पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल खेळात भारतासाठी मिळवलेल्या पहिल्या मेडल इतकाच आनंद भारतीयांना झाल्याचे दिसले. तो क्षण आपल्या भारतीयांसाठी खूप आनंदाचा होता. पण काहीतरी राहत असल्याचे शल्य मनात आले. आज पर्यंत भारताला फक्त 10 गोल्ड मेडल मिळाली. या वर्षीही एकच गोल्ड मेडल, दोन रौप्य आणि चारच कास्यपदक मिळाली, जी बाकी देशांच्या कितीतरी पटीने कमी आहेत. असा निराशेचा सूर लागला पण निराशेचा विचार करताना जाणवलं , खरंतर आपल्या भारतात बराचसा लोकसमूह हा क्रिकेट,फुटबॉल, कबड्डी ह्यासारख्या सांघिक खेळांकडे आकर्षित झाला आहे. आज आपल्याला घराघरांत कोहली आणि पी. व्ही. सिंधू सहज दिसतात पण कमतरता जाणवते ती नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची. त्यामुळे सध्या भारताला अशा नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची गरज आहे, जे कराटे, तायक्वांदो, फेंन्सिंग, स्विमिंग, जुडो, जिम्नॅस्टिक, इक्वेस्टियन यांसारख्या दुर्लक्षित वैयक्तिक खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देतील.

       परंतु मग अशा चांगल्या परिणामांसाठी आपण आपल्या चाकोरीबद्ध जीवनातून वैयक्तिक खेळांना किती वेळ आणि महत्त्व देतो? बहुआयामी विकासाबरोबर क्रीडा क्षेत्राच्या विकासास किती प्राधान्य देऊ शकतो? ज्याप्रमाणे सरकार सांघिक खेळांना प्रोत्साहन देते त्याप्रमाणे वैयक्तिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आपली आणि सरकारची भूमिका काय असावी? शिवाय सर्व स्तरांतील खेळाडूंना अशा स्पर्धांमध्ये सामावून घेण्यासाठी काय करता येईल? अशा एक ना दोन हजारो प्रश्नांनी माझ्या मेंदूत शिरकाव केला. यंदाच्या ऑलम्पिक स्पर्धेतही आपले एकूण 127 स्पर्धक गेले होते. त्यातही इक्वेस्टियन,ट्रायथलॉन, सर्फिंग, सायकलिंग, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक अशा वैयक्तिक खेळात भारतातील फक्त एकाने आणि काही खेळात तर खेळाडू पात्रच न झाल्याने एकालाही सहभागी होता आले नाही, याचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सायना नेहवाल, दीपा करमरकर आणि हिमा दास ह्यां या वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र होऊ शकल्या नाहीत. तर काही खेळांचा विचारच केला गेला नाही. मग अशा वेळी आपण कुठे कमी पडतोय या प्रश्नाची कारणमीमांसा करताना माझ्या असे लक्षात आले की, आपल्या देशात अलीकडे आपण वैयक्तिक खेळांना महत्त्व देतोय पण ते तितके पुरेसे नाहीये. यंदा तर त्यात कोरोना आणि त्यामुळे आलेल्या अडथळ्यांची भर पडली. पण असे असले तरी भविष्यासाठी आपणांस आत्तापासूनच अनेक उपाय करणे शक्य आहे. आज भारतात जवळपास 80 टक्के कुटुंब ही मध्यमवर्गीय आहे. मग या घरातील मुलांना फेन्सिंग, तायक्वांदो, ट्रायथलॉन अशा खेळांचे साहित्य आणि प्रशिक्षण हे घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. म्हणजेच असं म्हटलं तर आता हेच पहा ना की, मनिका बत्रा, हिमा दास यांसारखे असंख्य खेळाडूं योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने किंवा आर्थिक दृष्ट्या अडचणी आल्याने पुढे जाऊ शकत. त्यामुळे अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने क्रीडा आयोग व शाळांच्या सहयोगाने उपाययोजना केल्या पाहिजेत. तसं बघता आज शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये देखील खेळांचे महत्त्व वाढू लागले आहे परंतु वैयक्तिक खेळांना प्रोत्साहन मिळत नाही. येणाऱ्या पिढीला तंत्रज्ञानाच्या जगात अद्ययावत करण्याबरोबर शारीरिक दृष्ट्या सक्षम करणेही गरजेचे आहे. त्यासाठी शाळेतूनच सांघिक खेळांबरोबर वैयक्तिक खेळांचेही प्रशिक्षण दिले पाहिजे. तसेच या स्पर्धांमधून उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबरोबर प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंनाही आर्थिक व मानसिक दृष्ट्या आधार देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते इतर गोष्टींची तमा न बाळगता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील.

‌ एकंदरीतच बदलत्या काळानुसार आपण खेळांकडे छंद आणि व्यवसाय म्हणून बघण्यापेक्षा क्रीडा संस्कृती आणि त्याचे जतन करणे या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. आपल्याकडे क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी लागणाऱ्या साधनांची आणि सुविधांची कमतरता नाही परंतु कमतरता आहे ती त्याच्या योग्य अंमलबजावणीची. त्यामुळे हे शक्य झाले तर पर्यायाने आपल्या भारताच्या क्रीडा संस्कृतीचे जतन होईल आणि ऑलिम्पिक खेळात आपला सहभाग आणि पदकांची संख्या यात निश्चितच वाढ होईल. शेवटी मला असे लिहावेसे वाटते की,

‌अभ्यासासम क्रीडेस महत्त्व जेथे, 

मन, मेंदू, मनगटे सक्षम तेथे, 

खेळ-खेळाडूंचा सन्मान ज्यांच्या दृष्टिकोनाशी, 

बलवान राष्ट्र म्हणावे त्यांसी!

 

 - आकांक्षा दिपक जावडेकर

Tuesday, August 10, 2021

 १ ऑगस्ट एक अविस्मरणीय अनुभव


तारीख १२जुलै २०२१, वादसभेच्या नवनिर्वाचित सचिवांनी पहिली मीटिंग घेतली आणि १ऑगस्ट रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या टिळक स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. त्या क्षणापासून या कार्यक्रमाची  उत्सुकता निर्माण झाली होती. याचे अतिशय प्रमुख कारण म्हणजे, मागील संपूर्ण वर्ष   मग ते शैक्षणिक असो वा सांस्कृतिक हे ऑनलाईन पद्धतीने काढावं लागलं. त्यातही याच वर्षी जानेवारी महिन्यात डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच महाविद्यालयात आणि वादसभेत ऑफलाईन उपस्थित राहण्याची संधी मिळाली, तो अतिशय आनंददायी अनुभव हाताशी असल्यामुळे पुन्हा कधी महाविद्यालयात जायला मिळेल ह्या संधीची वाट बघत होतो, आणि या  निमित्ताने ती संधी मिळेल हे कळताच उत्साह द्विगुणित झाला, व परीक्षा संपताच थेट पुण्यात आलो. नवीन सचिवांबरोबर असलेला हा पहिलाच कार्यक्रम म्हणून एक वेगळा आनंद होता. ज्यांच्या एक शब्दाखातर महाविद्यालयास हा प्रचंड आवार मिळाला असे   लोकमान्य टिळक ह्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालय दरवर्षी हा लोकमान्य टिळक स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करतं , व त्याचबरोबर  हा दिवस महाविद्यालयातील अभ्यासेत्तर उपक्रमांची नांदी म्हणून ओळखला जातो याची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच उत्साहाबरोबर जबाबदारीची देखील जाणीव होती. प्रथमतः कार्यक्रम कोणत्या माध्यमातून होईल, कुठे आयोजित केला जाऊ शकतो, प्रमुख पाहुणे कोण असतील या सर्व गोष्टींपुढे एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. कॉलेज मधील कार्यक्रमाच्या तयारी साठीचे पहिले दोन दिवस हे या सर्व गोष्टींची पुष्टी करण्यात गेले. पण दुसऱ्या दिवसा आखेर हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मानाच्या अशा रमाबाई सभागृहात घेण्याची, व अंशतः ऑफलाईन पद्धतीने घेण्याची परवानगी मिळाली आणि कामांना वेग आला. पण ऑफलाईन कार्यक्रम हे एक वेगळं आव्हान होते. कारण वादसभेतील बहुतांश मुलांनी 1 ऑगस्ट चा ऑफलाईन कार्यक्रम पाहिला नव्हता, आणि कार्यक्रम एवढ्या मोठ्या सभागृहात सर्वांच्या नजरेत चांगला दिसेल का? आणि कोविडच्या नियमांचे पालन करून करायचा हे एक वेगळे दडपण होते. पण संघप्रमुख खंबीर असल्यावर प्रत्येकाला विश्वास वाटतो की आपण हे आव्हान सहज पार करू. त्याचप्रमाणे देवणे सर, अरुंधती मॅम, तसेच सचिव या सगळ्यांचा त्यांच्या Juniors आणि सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास होता म्हणून हे शक्य झाले. 

तांत्रिक बाजूबद्दल बोलायचे तर कार्यक्रमाच्या आधीचे सात दिवस हे संपूर्ण Trial and error चे होते. सभागृहातील कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ऑनलाईन दाखवण्याची सोय करणे हे प्रमुख उद्दिष्ट होतं. DSLR कॅमेरा वापरून कार्यक्रम stream करायची कल्पना असल्याने त्याचा सराव सुरू तर केला पण मी स्वतः या आधी कधीच कॅमेरा हाताळला नव्हता त्यामुळे या कार्यक्रमाची एवढी महत्वपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे आणि हे आपण करू शकू की नाही अशी शंका येऊ लागली. पण, आपण आपले प्रयत्न शंभर टक्के करायचे परिणामांबाबत आत्ताच वाईट विचार करून काहीही साध्य होत नाही हा माजी सचिवांनी दिलेला कानमंत्र२ त्यावेळी कामी आला. त्याचबरोबर असेही लक्षात आले की आपल्याला बाहेरून कॅमेरा आणण्याची गरज आहे पण तो ही कॅमेरा जेव्हा सॉफ्टवेअरने डिटेक्ट केला नाही तेव्हा थोडीशी चिंता वाटू लागली करण सामग्रीसह पूर्ण तयारी होती. पण दृश्यच जर दिसले नाहीतर stream काय करणार. पण सिनिअर्स चा सल्ला घेऊन थोडी शोध मोहीम करत अशाप्रकारे २ दिवस आधी मार्ग निघाला आणि camcorder भाड्याने घेत कार्यक्रम लाईव्ह करायचं हे निश्चित झाले. आणि मग नव्याने उत्साह संचारला. या सर्व खटाटोपासाठी टेकनिकल टीम चं कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

पण हा सगळा कार्यक्रमाच्या पूर्वीचा आणि लांबचा भाग झाला. खरंच आव्हान कोणाला होते तर ते आपल्या स्टेज, हॉल आणि हॉस्पिटॅलिटी टीमला. कारण हा कार्यक्रम वादसभेला आयोजित करण्याची संधी मिळाली ती वादसभेच्या शिस्तीमुळे. तिच शिस्त, नीटनेटकेपणा हा याही कार्यक्रमात दाखवण्याची आणि हा कार्यक्रम रमाबाई सभागृहात आणि ऑफलाईन होण्यासाठी सचिव व वादसभाप्रमुखांनी घेतलेली मेहनत, या सगळ्यांचे चीज करण्याची जबाबदारी या कमिटींवर होती आणि ही जबाबदारी त्यांनी लीलया पेलली यात काहीच शंका नाही. उपस्थिती कितीही असली तरी आपले नियोजन आणि त्याची अंमलबजावणी ही चोखच असली पाहिजे हे तत्व हॉल कमिटीने पाळले आणि त्याप्रमाणे कोविड नियमांचे पालन करत क्रॉस मार्क्स लावणे असेल किंवा टेकनिकल कमिटी ला सहकार्य करत त्यांच्या गरजा पाहून त्याप्रमाणे काम करणे असेल आणि त्याहूनही पुढे आपले काम संपले म्हणून आयते न बसता मनुष्यबळाची कमी लक्षात घेत अतिशय नम्रपणे हॉल कमिटीच्या सदस्यांनी इतर कामात देखील हातभार लावला व तीही कामं उत्तम प्रकारे पार पाडली. स्टेज कमितीबद्दल जितके लिहावे तेवढे कमीच आहे; कारण कार्यक्रमाचा अतिशय महत्वाचा भाग हा या कमिटीच्या हाती होता. कारण इथे झालेल्या एका चुकीचे पडसाद संपूर्ण कार्यक्रमाच्या यशावर उमटले असते. पण सर्व ताण बाजूला ठेवत कार्यक्रमाच्या दोनच दिवस आधी येऊन देखील उत्कृष्ट नियोजन आणि एकमेकांशी असलेला उत्तम ताळमेळ ह्या जोरावर त्यांनी संपूर्ण स्टेज कार्यक्रमासाठी तयार केलाच पण कार्यक्रमाच्या रुपरेषेत आयत्यावेळी बदल होऊन देखील कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होऊ देता तीही परिस्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट अशी हॉस्पिटॅलिटी कमिटी. आलेले प्रमुख अतिथी, विशेष सन्मानार्थी आणि पाहुणे हे मोठी  पदेभूषविलेले , आणि त्याहुनी महत्वाचे म्हणजे महाविद्यालयाचे आणि वादसभेचे माजी विद्यार्थी आहेत, म्हणूनच त्यांच्या मनात  नियोजन , कामाचा उरक ह्या सर्व गोष्टी आजच्या वादसभेच्या  विद्यार्थ्यांना बघताना असतील याची कल्पना असल्याने त्याचे थोडेसे दडपण या सर्वांच्या मनात असणे सहाजिकच होते . पण ह्या सर्व गोष्टी दुय्यम मानत अतिशय अगत्याने त्यांनी पाहुण्यांचं स्वागत व पाहुणचार केला व काही अडचणी आल्या असता प्रसंगावधान राखून त्या दूर केल्या . इतकंच नव्हे तर वादसभेतील प्रत्येक सदस्याला नाष्टा, किंवा जे काही हवं आहे ते वेळेत मिळतंय ना ह्याची सुद्धा खबरदारी त्यांनी घेतली. खरोखर हा कार्यक्रम फक्त कार्यक्रम नव्हता तर एक मोठी शिकवण होती , की गोष्टी यशस्वी करून दाखवायच्या असतील तर नुसता अनुभव गाठीशी असून चालत नाही , तर बदलत्या परिस्थितीबरोबर घेतलेले निर्णय देखील बदलावे लागतात , शंभर अडचणी , थोडे मतभेद , वाद , रुसवे फुगवे ह्या सगळ्यावर मात करत संघ म्हणून एकत्र येत एकमेकांवरचा विश्वास बळकट करत जर ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल केली तर यश नक्की मिळते , आणि हे आमचं यश म्हणजे सर्व मान्यवर , वादसभेचे सर्व आजी - माजी सदस्य , तसच सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व प्रेक्षकांकडून आलेली शाबासकीची थाप , आणि ही थाप एकट्या दुकट्या साठी नसून संपूर्ण वादसभेसाठी आहे . आणि म्हणूनच हा कार्यक्रम म्हणजे अशाच अनेक यशांची मग ते स्पर्धांमधून असो वा अशा उपक्रमांमधून सर्व प्रकारच्या प्रगतीची नांदी आहे असे मला वाटते. पुढे असे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित होतीलच पण महामारीनंतरचा पहिला ऑफलाईन कार्यक्रम आणि पुनःश्च हरिओम म्हणत पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठीचा हा प्रयत्न म्हणून हा कार्यक्रम अविस्मरणीय आहे!

                                                                                  

-वरद सहस्रबुद्धे

(वादसभा सदस्य)




                                                                     

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व स...