नमस्कार!
आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
खरंतर खेळ आणि आपलं अगदी लहानपणापासूनच घट्ट जोडलेलं असतं. आपण सगळेचजण लहानपणापासूनच वेगवेगळे खेळ खेळत असतो पण असे ही काही जण असतात ज्यांच्यासाठी खेळ हा फक्त स्वतःच्या आनंदासाठी खेळण्याचं साधन नसून तो खेळ ही त्यांची करिअरची वाट बनून जाते. आणि त्यातूनच नवनवीन खेळाडू तयार होत असतात जे क्रीडाक्षेत्रात स्वतःचं मोलाचं योगदान देतात. हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी मला आठवतात,
कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती,
कोशिश करने वालों की हार नहीं होती!
आणि ह्या ओळींना सार्थ ठरवणारी कामगिरी भारताच्या क्रीडापटूंनी करून दाखवली. ह्यावर्षीच्या म्हणजेच २०२४ ऑलिंपिक्स मध्ये आत्तापर्यंत भारतीय क्रिडापटूंनी आपले सर्वस्व पणाला लावून ६ पदकं आपल्या नावावर केली आहेत. आणि म्हणूनच आजचा दिवस हा 'ऑलिंपिकवीरांची' म्हणजेच अशा क्रीडापटूंची आठवण काढल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ज्यांनी भारताचे नाव जगभरात उंचावले आणि म्हणूनच त्यांच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न!
राष्ट्रीय क्रीडा दिवस हा दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी भारतामध्ये साजरा केला जातो. हा दिवस १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या ह्या अलौकिक कार्यासाठी त्यांना येणाऱ्या पिढ्यांनी ही कायम लक्षात ठेवावे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भविष्यात ही अनेक क्रीडापटू असे घडावेत असा ह्या मागचा उद्देश आहे. आता ऑलिंपिक स्पर्धा आणि भारत यांचं नेहमीच एकमेकांशी गहिरं नातं राहिलेलं आहे. भारतात अनेकांच्या डोळ्यांत ऑलिंपिक्स च्या सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचं स्वप्न आजही दिसतं. भारताला ऑलिंपिक्स मध्ये सर्वात पहिल्यांदा म्हणजेच १९५२ साली कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव ह्यांनी पुरुषांच्या फ्रीस्टाइल बँटमवेट प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले. तसंच २००० साल च्या ऑलिंपिक खेळांमध्ये, कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला ठरली. तेव्हापासून जी परंपरा सुरू ती अगदी आजतागायत टिकली आहे. नीरज चोप्रा, मीराबाई चानू, पि.व्ही. सिंधू ते अगदी आत्ता याच वर्षी पार पडलेल्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये मनू भाकर, सरबजोत सिंग, स्वप्नील कुसळे, इत्यादी क्रीडापटूंनी हा समृद्ध वारसा सुरू ठेवल्याचे पहायला मिळते.
भारतामध्ये खेळासाठीची जिद्द आपल्याला अनेकांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळेच पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारतातील विविध खेळाडू आपल्याला उमेदीने सहभागी होताना दिसतात. मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०२४ हे वर्ष तर क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरलेली आहे. ऑलिंपिक्स मधील कामगिरी सोबतच भारताने क्रिकेटच्या दुनियेतला एक महत्वपूर्ण किताब म्हणजे ' टी-ट्वेंटी विश्वकप' देखील आपल्या नावे केला आणि हे सुवर्णक्षण आजही प्रत्येकाला आनंदून टाकतात.
आज क्रीडा दिनाच्या दिवशी ह्या साऱ्याचा आढावा घेताना असं लक्षात येतं की भारताला खेळाची एक समृद्ध पार्श्वभूमी लाभलेली आहे. इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खेळ खेळायला, पहायला, त्याचा आनंद लुटायला आवडतो आणि हेच येणाऱ्या पिढ्यांना खेळांची गोडी लावतोय. इथे सचिन तेंडुलकर , विराट कोहली , महेंद्र सिंह धोनी, पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल हे भारतीय खेळाडूच नाहीत तर मेस्सी, रोनाल्डो, गेल असे अनेक भारताबाहेरील खेळाडू देखील त्यांच्या खेळातील प्राविण्याने भुरळ पाडतात. इथे खेळाच्या दुनियेतल्या अनेक उच्च किताबांना गवसणी घालण्याचं स्वप्नं, ध्येय अनेकांच्या मनात आहे फक्त त्यांना गरज आहे प्रोत्साहनाची. प्रत्येक खेळाडूला त्याचा विश्वास वाढवणारा एक प्रोत्साहनाचा हात त्यांच्या पाठीवर हवा असतो आणि तोच विश्वास आपण आपल्या भारत देशासाठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर दाखवला तर येणाऱ्या काळात असे अनेकानेक खेळाडू घडतील. यशस्वी खेळाडू जे मेडल प्राप्त करतात अशांची आपण दखल घेतोच पण त्यापलीकडे जाऊन इच्छा, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर ऑलिंपिक सारख्या मोठ्या प्लॅटफाॅर्मवर जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पण काही कारणाने मेडल हुकलेल्या ही प्रत्येक खेळाडूचं कौतुक आपण करू शकलो तर यश आणि अपयशाच्या चौकटीपलीकडे जाऊन आपण खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडू ला मान प्राप्त होईल. ज्याने त्यांना धीर मिळेल, त्यांची उमेद वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि येणाऱ्या काळात क्रीडाक्षेत्र उत्तरोत्तर समृध्द होत जाईल. त्यामुळे आपल्यातल्या ही खेळाडू ला नेहमी जीवंत ठेऊयात आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देऊन आपलं क्रीडाक्षेत्र प्रतीचं महत्वाचे योगदान नोंदवूयात !
-Manali Deshpande