Saturday, August 17, 2024

"नीट" चा निकाल नीटनेटका ?


तारीख जून,२०२४ - भारताचं पुढील ५ वर्षाच्या भविष्याचे चित्र उभं राहील, जेव्हा लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला. पण त्याच दिवशी लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात हरवलं, जेव्हा त्यांचा एक अनपेक्षित NEET UG परिक्षेचा निकाल लागला. हा. निकाल अनपेक्षितच होता. म्हणजे ज्या परीक्षेला कधीतरी पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी मुलं असायची, तिथे ह्या वर्षी चक्क एक-दोन नव्हे, तर 67 मुलांना पैकीच्या पैकीच गुण मिळाले. एकाच परिक्षा केंद्रांत 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, काही मुल उशिरा पोहोचली म्हणून त्यांना ग्रेस मार्क्स देणं, बिहार पेपर चोरीची घटना घडणं, सगळंच अगदी अनपेक्षित, आश्चर्यकारक !!

त्यानंतर काही विद्यार्थी सुप्रीम कोर्टात गेले, २५ हुन अधिक लोकांना पकडण्यात आलं, आपल्या राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात ह्या घोटाळ्याचा उल्लेख केला, पण काही फरक पडलेला दिसत नाही.  दोन आठवड्यांपूर्वी प्राध्यापक पदासाठी घेण्या घेण्यात येणारी NET परीक्षा पेपर झाल्या नंतर त्याच्यात सुद्धा अनियमितता आढळून आली म्हणून रद्द करण्यात आली. त्यानंतर घेण्यात येणारी NEET PG परिक्षा सुद्धा रद्द केली, ती पण परिक्षेला २४ तास पण राहिले नसताना. ह्या सगळ्या परीक्षा होतात  National Testing Agency (NTA) या सरकारी संस्थेच्या देखरेखी खाली. हा प्रकार काही पहिल्यांदा घडत नाहीये. मागच्या ७ वर्षात पेपरफुटीची ७० प्रकरणं झाली आहेत, ज्या मध्ये १.७  कोटीहून जास्ती युवकांचं भविष्य असंच अंधारात हरवलं आहे. 

ह्या सगळ्याचा त्रास होतोय तो त्या मेहनती आणि योग्य विद्यार्थ्यांना, जे आपले कित्येक महिने, वर्ष घालवतात, त्यांची स्वप्ने पूर्ण करायला,  पण पदरी येते, ती निराशाच. चूक त्यांची नाहिये, मेहनत घेण्यात ते कुठेही कमी पडले नाहिये, चूक आहे ती ह्या व्यवस्थेची, जी पैसे खाऊन बसली आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेचा जर सगळ्यात जास्ती कोणाला फायदा होतो, तर ते परिक्षांसाठीचं कोचिंग क्लासेसचे व्यावसायिक,  जे ह्याच मुलांच्या पालकांकडून अमाप पैसे घेतात. हे अक्षरशः एक मार्केट झालं आहे जिथे यशाचं आमिष दाखवून मुलांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षित केलं जातं, स्वतःच्या 'कंपनी' कडे.  हे पालक आणि मुलं या क्लासेस कडे आकर्षित होतात, ते वाढलेल्या स्पर्धेमुळे. मुलांना शाळेत असल्या पासूनच अमूक कोचिंग तमुक क्लास लावले जातात, बऱ्याच वेळेला त्या मुलांची इच्छा नसताना सुद्धा त्या मुलांना बऱ्याच वेळेला माहीत सुद्धा नसतं, की त्यांना काय करायचय, काय बनायचय, पण ह्या वाढलेल्या स्पर्धमुळे त्यांना बळजबरीने ह्या परीक्षांच्या फेऱ्यात ढकललं जातं. आणि मग ह्याचा फायदा उचलतात हे कोचिंग क्लासेस, जे ह्या परिक्षांचा, आणि पर्यायाने शिक्षणाचा बाजार मांडतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी ह्या परिक्षा देतात,पण सीट, काही हजारच असतात. मग प्रवेश मिळण्याच्या भीती पोटी हे पालक आणि मुलं फसतात ह्या कोचिंग क्लासेस च्या 'गॅरंटिड सक्सेस' च्या आमिषा मध्ये. कोटा सारखी शहरं फॅक्टरी बनले आहेत, जिथे विद्यार्थ्यांमधील गुण न हेरता, त्यांचं एखाद्या असेंब्ली लाइन वर मास प्रोडक्शन चालू आहे,  त्यांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी.

मग ह्या स्पर्धेच्या जगात जर एखाधा परिक्षेत अपयश आलं; तर त्या अपयशाच्या भीतीने आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. आता तर ह्या वाढलेल्या स्पर्धेचा ताण अगदी शाळकरी मुलांवर दिसायला लागलाय. म्हणूनच की काय आपल्या सरकारने शालेय विद्यार्थ्यांचं ओझ कमी करण्यासाठी सगळे विषय एकाच पुस्तकात समाविष्ट केले आहेत, ज्याने करून त्यांची दप्तरं हलकी होतील. पण त्याने त्यांच्या मनावरचा ताण आणि भीती कमी होणार आहे का? ते आपल्याला मोजता यायचं नाही, कारण, जसं थ्री इंडियटस् मधला रँचो म्हणतो तसं, दुदैवाने मेंदुवरचं प्रेशर मोजण्याचं यंत्र आपल्याला बनवता आलेलं नाही. बालपण, हे निरागसतेचं प्रतिक असतं, आणि बालपणाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शाळा. पण आता मात्र याच निरागस मुलांची शाळा ही शिक्षणातल्या गैरप्रकारांची बाराखडी गिरवते आहे. मुलांच विकास करण्याऐवजी ह्या शाळा, ज्यांना राजकारण्यांनी, व्यवसायिकांनी फक्त त्यांच्या उत्पन्नाचं स्त्रोत बनवून ठेवलय, शाळेच नाव मोठं करण्यावर लक्ष देतात, आणि त्यासाठी ते चुकीच्या पद्धतींचा वापर करत आहेत. पैसे घेऊन मुलांना पास करणं, पबलिसिठी साठी बोर्डाच्या परिक्ष मध्ये गैरप्रकार असतील, आणि अजून किती तरी, ज्याची आपल्याला कल्पना सुध्दा नसेल. दुसऱ्या बाजूला, काही शाळा मुलांकडे बिलकुल लक्ष देत नाहीत त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून देतात.  मुलांना काय करावं, कसं करावं काहीच समजत नाही. आणि ह्या अश्या दोन्ही वातावरणांमध्ये वाढलेली मुलं बऱ्याच वेळा पुढे जाऊन ह्या घोटाळ्यांमध्ये, गैरप्रकारां मध्ये सामील होतात किंवा त्याला बळी पडतात.

विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल अश्या ह्या वातावरणामध्ये जेव्हा हे असे घोटाळे घडतील, तेव्हा ह्या सगळ्यांतून वाट काढणाऱ्या त्या मेहनती मुलांनी काय करायचं? आणि NEET सारख्या परिक्षा, ज्या ह्या देशाचे डॉक्टर घडवतात, त्यात जर असे घोटाळे झाले, तर हे देशाची आरोग्यव्यवस्था पोकळ नाही का करणार? येणाऱ्या काळात अश्या परिक्षांमध्ये पेपरफुटी, घोटाळे ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी कडक कायदे व त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. असं नाही झालं, तर ह्या येणाऱ्या अपयशामुळे वाढणाऱ्या नैराश्याला आणि आत्महत्यांना जबाबदार कोण? ही व्यव्यवस्था, हे कोचिंग क्लासेस की ही स्पर्धा?

-Ashmit Gupte 

No comments:

Post a Comment

जागतिक नदी दिवस: एक पाऊल नदी संवर्धनाच्या दिशेने

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा 'जागतिक नदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. महत्वाचे म्हणजे आपल्या देशात अनेक नद्यांचे वाढदिवस दे...