Tuesday, June 4, 2024

आता प्रश्न मोगलीच्या कुटुंबाचा आहे...

लहानपणापासूनच मोगली हा जीवा-भावाचा विषय. त्याचे सिनेमे, पुस्तकं याचं जणू पारायणच केलेलं, पण जेव्हा आज रशिया - युक्रेन, इस्राएल - पॅलेस्टाईन यात पृथ्वी नष्ट होताना दिसते, दिल्ली चं तापमान ५०शी गाठतं तेंव्हा मनी एकच प्रश्न सतावतो आता जर मोगली आला तर तो राहणार तर राहील कुठे? अमेझॉन च्या खोऱ्यात ते पण आगीत खाक झालेलं, की आमचा सह्याद्रीत की अजून कुठे .? पण जेव्हा हा कुतुहल असणारा कल्पक प्राणी पर्यावरणाला मोकळा श्वास घेऊ देत नाहीये, निसर्गाकडे हॉलिडे स्पॉट म्हणून बघतोय, हेच कशाला 

             जिथे कधी होते गोकुळ 

             तिथे आज झाली दशा 

            म्हणे वसुंधरा तुला मानव

             कुठली ही चढली नशा....

जेव्हा या ओळी समोर येतात तेव्हा यक्ष प्रश्न समोर येतो तो म्हणजे, आता प्रश्न मोगलीच्या कुटुंबाचा  ...!


           आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. इथे धर्म, भाषा, सण, परंपरा, खाद्यपदार्थ यांचं जे वैविध्य आहे; तसं जगात कुठल्याच देशात नाही. हे आता इथे लिहिण्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी शिकवताना एक गोष्ट मात्र कायमची आपल्याला सांगायची राहून गेलीये. किंबहुना ती गोष्ट या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची, उल्लेख करण्याजोगी आहे हेच कुणाला कधी वाटलं नाहीये आणि हेच आपलं दुर्दैव आहे. ही गोष्ट म्हणजे आपल्या जगण्याला खरा अर्थ देणारी आपली जैवविविधता.

          आपला देश जैवविविधतेच्या बाबतीत जगातील टॉप 17 देशांत येतो. पण तरीही मोगली कशाला तर साधे पक्षी, प्राणी यांना निवारा नाही.नाही म्हणजे आधी च्या काळी असलेलं त्यांचं अधिराज्य संपुष्टात येऊ लागलंय..आज पिंडाला शिवायला कावळा नाही अशी वेळ ...एक काळ असा होता की जिकडे तिकडे चिमण्यांची शाळा भरलेली दिसायची, राष्ट्रीय प्राणी आणि पक्षी संपुष्टात आलेले नव्हते , 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' अशी वृत्ती होती , झाडे लावा झाडे जगवा असा नारा देण्याची गरजच नव्हती कारण माणूस अप्पलपोटी होऊन स्वतःच्या गरजा भागवत नव्हता.

          खरं तर निसर्ग आपल्याला त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे बागडू देत आलाय. त्याचा सगळा खजिना त्यानं आपल्याला खुला केलाय. पण, आपण त्यालाच बोचकारतोय. त्यामुळे, निसर्गही कोपलाय. त्यानं काही छोटे मोठे धक्के देऊन इशारा दिलाय. तरिही आपल्याला जाणीव नाहीये. निसर्गानं आता माणसाशी युद्ध पुकारलंय. पुढच्या काही वर्षांत न भुतो न भविष्यती असं संकट माणसासमोर उभं ठाकणार आहे. कोरोनाच्या संकटापासून सुरक्षित राहायला आपल्याकडे घर तरी होतं. पण, आताच आपण निसर्गावरचा अत्याचार थांबवला नाही तर भविष्यात येणाऱ्या संकटापासून वाचायला डोक्यावरचं छत आणि पायाखालची जमीनही नसेल. आता कित्येक लोकं हा अंदाज वर्तवत तर आहेतच की काही हजारो वर्षांनी पृथ्वी संपूर्ण जलमय होईल पण खर तर याची सुरुवात आपणच केलीये, प्रगतीच्या नावाखाली निसर्गात ढवळा-ढवळ करून.

          गेल्या काही वर्षांत जगानं तापमान वाढ, दुष्काळ, महापूर, सुनामी, चक्रीवादळ, भूस्खलन, अशी संकटं अनुभवली आहेत. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोरोना काळात  माणसाचा निसर्गातील हस्तक्षेप कमी झाला आणि निसर्गाचे थक्क करणारे चमत्कार दिसू लागले. चंदीगढमधून दिसणारा हिमालय, मुंबईच्या समुद्रात बऱ्याच वर्षांनी दिसलेले डॉल्फिन, मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांत थोडी फार अनुभवायला मिळणारी शुद्ध हवा याचं आपल्याला मोठं कौतुक वाटतंय. पण, तरीही या गोष्टी कायम राहाव्यात यासाठी आपण कणभरही प्रयत्न करत नाही. एवढं होऊन सुद्धा पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या कल्पक प्राण्याने सुविधा करता करता पुन्हा हानी ही सुरूच केली. मग ते रस्ते बांधणीत लाखोंनी झाडें तोडणे असो किंवा पुन्हा नद्या,नाले, समुद्र यांच्या जवळ घर बांधणी असो. प्लास्टिक, प्रदूषण या गोष्टी तर बोलण्याच्या पलीकडे निघून गेल्यात. श्वास घ्यायला सुद्धा कही वर्षात 'प्रायव्हेट झाड' अशी संकल्पना यायला वेळ  लागणार नाही. 

         या वर उपाय एकच, मानवाला जितका निसर्गात हस्तक्षेप कमी करता येईल तितका कमी करणं , पर्यावरण पूरक गोष्टीच वापरणं. यामुळे हानी कमी होईल अशी आशा, कारण आपल्या चुका महाकाय रुप घेऊन आपल्यावर येऊन धडकत आहेत. आपण स्वतः जागे होणे व इतरांना, ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे त्यांना, गदागदा हलवून जागे करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचे उत्पादन व वापर थांबवणे, तशा गोष्टींचे नवीन शोध न लावणे, पृथ्वीवर जंगलांचे क्षेत्रफळ वाढवणे, जलप्रदूषण, वायुप्रदूषण कमी करणे, अपारंपारिक उर्जास्रोतांचा वापर करणे अशा अनेक गोष्टी आपल्याला सहजच करण्यासारख्या आहेत. अगदीच काही नाही तर प्लॅस्टिकचा वापर कायमस्वरूपी थांबवणे, आठवड्यातून एक दिवस कुठलेही वाहन न वापरणे व पर्यावरणपूरक एक झाड लावणे, जोपासणे व वाढवणे हे तर आपल्याला नक्कीच करता येईल. हे सगळं तर बालवाडी पासून पुस्तकात शिकतोय फक्त ते आमलात आणता आलं पाहिजे,ह्या गोष्टींची जर आपल्याला सवय झाली तर पर्यावरण रक्षिणे व ते वृद्धिंगत होणे हे आपले श्वास घेण्यासारखे नित्यकर्म होईल व प्रत्येक दिवसच पर्यावरण दिवस होईल. त्यासाठी वेगळा दिवस साजरा करायची गरजच पडणार नाही. आणि मोगलीच्या जीवनाचाही प्रश्न सुटेल,नाही का?

- Tanvi Chitale 

No comments:

Post a Comment

Are We Still Stuck in the Past? Ancient Ideals and the Modern Man

It is estimated that Homo sapiens (today’s humans) emerged around 300,000 years ago in Africa. Homo sapiens was the most intelligent race am...